दर पडल्याने शेतकऱ्याने तीन एकर केळीच्या बागेवर चालवली कुऱ्हाड
एकापाठोपाठ येणाऱ्या संकटाने शेतकऱ्यांची पुरती अर्थव्यवस्था कोलमडली असून आता टोमॅटो पाठोपाठ दर नसल्यामुळे केळीच्या बागावर कुऱ्हाड चालवावी लागत असल्याचा प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट..;
सोलापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अचानक लॉकडाऊन लागू केल्याने जनजीवन ठप्प झाले होते.या कालावधीत शेतकऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.लॉकडाऊनमुळे वाहतूक व मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांचा माल शेतातच पडून होता.त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.लॉकडाऊनमुळे हतबल झालेल्या सर्वसामान्य नागरिकांची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असताना शेतकऱ्यांची वाताहत थांबेना गेली आहे.त्याच्या मालाला कवडी मोल किंमत येऊ लागली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी टोमॅटोला कवडीलमोल किंमत होती.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिली होते.सध्या केळी या पिकाची बिकट अवस्था झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.या पिकावर अवकाळी पावसाचा व वाढत्या थंडीचा परिणाम झाला असून केळी बाजारात कमी दराने विकली जात आहे.या पडलेल्या दराला वैतागून पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरुली या गावातील शेतकऱ्याने 3 एकर केळीच्या बागेवर कुऱ्हाड चालवली आहे.त्यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मार्केटला एक टन ही माल गेला नाही
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी अमोल नाईकनवरे यांनी सांगितले की, 3 ते 4 वर्षांपूर्वी केळीच्या बागेची लागवड केली होती.यासाठी दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च आला होता.परंतु लॉकडाऊनमुळे माल मार्केटला गेला नसल्याने मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला.मागील दोन महिन्यात केळीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.12 ते 15 रुपये दर असणारा 1 ते 2 रुपयांवर आला आहे.एक टन सुद्धा माल मार्केटला गेला नाही.त्यामुळे उत्पादन खर्च निघणे ही दूर आहे.तीन एकरमध्ये 3600 रोपांची लागवड केली होती.या बागेच्या लागवडीसाठी 72 हजार रुपये खर्च आला होता.वर्षभरात बांधणी,ड्रीप,औषध फवारणी यासाठी दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च आला होता.त्यामुळे एकरी 30 ते 35 टन माल निघणे अपेक्षित होते.यातून वर्षाकाठी 10 ते 15 लाख रुपयांचा आर्थिक फायदा व्हायला पाहिजे होता.परंतु मागील दोन महिन्यांपासून केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे केळी मार्केटला नेहण्याचा खर्च देखील निघत नाही.यामुळे 3 एकर केळीवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतला.
व्यापाऱ्यांना फोन केला पण केळी खरेदीला कोणीच आले नाही
केळीची बाग तोडण्यामागचे नेमके कारण म्हणजे केळीचे पडलेले दर आहेत. बाकीच्या पिकांना बऱ्यापैकी हमीभाव मिळत आहे.पण फळबागांना कुठल्याही प्रकारचा हमीभाव मिळत नाही.केळीचे भाव एक रुपये,दोन रुपयांच्या खाली आले आहेत. बऱ्याच व्यापाऱ्यांना केळी घेऊन जाण्यासाठी फोन केला पण त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.बऱ्याच व्यापाऱ्यांनी पुढे मंदी आहे.थंडी असल्याने मालाला मागणी नाही. अशी बरीचशी कारणे दिली.त्यामुळे केळीचा माल बागेत तसाच पडून होता.निम्मा अर्धा खराब झाला होता.त्यामुळे बागेवर नाइलाजास्तव कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घ्यावा लागला असे शेतकरी अमोल नाईकनवरे यांनी सांगितले.
लॉकडाऊन,कोरोना, हमीभाव यामुळे शेतकरी हतबल
आमचे गाव भीमा नदी काठी असून या भागातील बरेच क्षेत्र ऊस पट्ट्याखाली आहे.या भागातील शेतकरी थोडासा बदल म्हणून केळी, द्राक्षे,डाळींब या पिकांकडे वळला आहे.पण हमीभाव,कोरोना,लॉकडाऊन या सगळ्या परस्थितीमुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे.त्यात पुन्हा अवकाळी पावसाचे नवीन संकट उभे राहिले आहे.अवकाळी पाऊस पडल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.या सगळ्यांचा विचार केला तर निसर्गाचा सुद्धा शेतकऱ्यांच्या नुकसानीत हातभार आहे.असे शेतकरी नाईकनवरे यांचे म्हणणे आहे.
अधून मधून जास्त थंडी, कधी जास्त उन्ह तर कधी जास्त आभाळ याचा केळी पिकावर परिणाम
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर अशी वेळ आली आहे.कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांच्या द्राक्ष,डाळींब,केळी याचे खूप नुकसान झाले आहे.कोरोनामुळे छोटे-मोठे उद्योग बंद झाले आहेत.लॉकडाऊनमुळे ही सर्व परस्थिती ओढवली आहे.पाठीमागच्या सहा ते सात महिन्यापासून थोडेसे सुरळीत झालेले होते.पण आता अवकाळी पाऊस व थंडीमुळे बाकीच्या पिकांपेक्षा केळी पिकाची वाईट अवस्था झाली आहे.केळीचे एकदम दर पडले असून मागणी घटली आहे.त्यामुळे व्यापारी केळीच्या खरेदीला प्रतिसाद देईना गेले आहेत.केळीचे दर पडले असल्याने शेतकऱ्यांवर वाईट वेळ आली आहे.माझ्याकडे मागील 4 ते 5 वर्षांपासून बाग असून जशी केळी लावली आहे.तशी केळीवर नवं-नवीन संकटे आली आहेत.दोन वर्षांपासून लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे.असे शेतकरी अमोल नाईकनवरे यांनी सांगितले.
थंडीच्या दिवसात केळीची वाढ खुंटते
जळगाव येथील केळी उत्पादन तज्ञ वडगुजर यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की, थंडीच्या दिवसांमध्ये तापमान जर खाली गेले तर केळीचा अन्नद्रव्य शोषण वेग कमी होतो व वाढ मंदावते.पाने वाढण्याचा वेग कमी होऊन थंडीच्या काळात झाडांची व फळांची वाढ सुद्धा हळुवार होते.केळीचा घड निसावल्यापासून ते कापेपर्यंत केळीला वाढीसाठी साधारणपणे 90 ते 95 दिवसाचा कालावधी लागतो.हिवाळ्यामध्ये हाच कालावधी वाढून 15 ते 20 दिवस जास्त लागतो.केळीच्या लागवडीपासून फळ निसावण्यासाठी सात महिन्याचा कालावधी लागतो.केळी निसावल्यानंतर केळी मार्केटला जायला जवळ-जवळ तीन ते साडेतीन महिन्याचा कालावधी लागतो.म्हणजे केळी फळ मार्केटला जायला वर्षभराचा वेळ लागतो.आपल्याकडे केळीच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या केळीचे उत्पादन घेतले जाते.केळीची पहिली लागवड जास्त प्रमाणात पावसाळ्यात केली जाते.तर दुसरी लागवड ऑक्टोबर महिन्यात केली जाते.ज्या प्रदेशात वारा व पाणी जास्त आहे त्या प्रदेशात साधारणपणे मार्च महिन्यात केळीची लागवड केली जाते.केळीच्या पिकाला पाण्याची सोय ड्रीपने केली जाते.केळीच्या पिकात आंतरपीक घेता येते परंतु घेऊ नये.यात आंतरपीक म्हणून भुईमूग किंवा चवळीची पिके घेता येतात.पावसाळ्यात पाऊस जास्त पडतो.त्यामुळे वेळेवर तण काढता येत नाही.केळीच्या पिकावर साधरणपणे फवारणी केली जात नाही.केळीवर रोग पडलाच तर फवारणी आवश्यक असते.केळीवर रोग पडल्यास बुरशीनाशकांची फवारणी केली जाते.चांगले व्यवस्थापन असेल तर केळीवर रोगाचे प्रमाण पण कमीच असते.आशा प्रकारे व्यवस्थापण करून चांगले उत्पादन घेता येते असे वडगुजर यांनी सांगितले.