नफ्याची शेती जगभरात कुठं केली जाते का?
लेखाचं शिर्षक वाचून जरा गोंधळला असाल, शेतकरी असाल तर उत्तरही माहिती असेल... मात्र, तरीही शेती खरंच नफ्याची असते का? जगभरातील शेतकऱ्यांना शेती परवडते का? वाचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांचा लेख;
निव्वळ शेती करून कोणतंही कुटूंब केवळ जगू शकतं. शेतीमधून फायदा मिळवणं शक्य नाही. केवळ भारतातच नव्हे तर युरोप, अमेरिका, चीन वा ऑस्ट्रेलियातही. मोठे शेतकरी-छोटे शेतकरी हा वाद खोटा आहे. ऑस्ट्रेलिया वा अमेरिकेत कमाल जमीन धारणा कायदा नाही. दर एकरी उत्पादन कितीही अधिक असलं तरीही या सर्व देशांमध्ये शेतकरी सरकारी अनुदानावरच जगतो. शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या एक-दोन टक्के असेल तर अनुदान देणं परवडतं एवढंच. म्हणजे या देशांमध्येही शेती नफ्यात नाही.
अर्थव्यवस्था भांडवलशाहीची असो की, वित्तीय भांडवलशाहीची वा साम्यवादी (चीन), शेती नफ्यात चालू शकत नाही. भारतात निदान शेती माणसांना जगवते. घरातला एक माणूस बिगरशेती क्षेत्रात असेल तर त्याला निदान तांदूळ, गहू, ज्वारी, डाळी यावर खर्च करावा लागत नाही. आसमसारख्या राज्यात वर्षभराचं धान, परसातला भाजीपाला, तळ्यातले मासे यावर गुजराण करता येते.
फार्म टू फोर्क वा बाजारकेंद्री वा मागणीप्रधान शेती इत्यादी सर्व मांडणी विविध उद्योगांच्या वाढीला पोषक आहे. बियाणं, खतं, विविधं औषधं, प्रक्रिया उद्योग, इत्यादींसाठी. शेतकऱ्याला त्यातून फारसा फायदा मिळत नाहीच उलटा तोटाच होतो.
शेती उत्पादनांना किमान उत्पन्नाची हमी मिळणं हाच एकमेव मुद्दा आहे. ही हमी भांडवलशाही, वित्त भांडवलशाही वा समाजवाद यापैकी कोणत्याही व्यवस्थेने द्यावी.
सात ते दहा हजार टन ऊसाचं गाळप एका दिवशी करण्याची क्षमता असणारे साखर कारखाने आहेत. गाळपक्षमता वाढवण्यासाठी यंत्रांमध्ये गुंतवणूक करावी लागते, माणसांमध्ये नाही.
कोणत्याही शेती प्रक्रिया उद्योगाचं यश यंत्र-तंत्रामध्ये किती गुंतवणूक केली आहे. यावरच असतं. शेतीच्या यंत्र-तंत्रात कितीही गुंतवणूक केली तरीही दर दिवसाला सात ते दहा हजार टन उत्पादन होऊ शकत नाही. एकरी शंभर वा दोनशे टन ऊसाचं उत्पादन घेण्यासाठी किमान एक वर्ष लागतं.
त्यामुळे शेतकर्याचं शोषण करणं, त्याची नाडवणूक करणं याशिवाय आधुनिक समाज वा अर्थव्यवस्थेपुढे अन्य पर्याय नसतो.
या हंगामात कांद्याचे दर कोसळले तर पुढच्या हंगामात दामदुम्मट किंमत मिळते. वा मिळेल या अनुभवावर आणि आशेवर लोक शेती करतात. त्याशिवाय कुटुंबातले अन्य सदस्य बिगर-शेती क्षेत्रात उपजिविका शोधतात. म्हणून शेती चालते आणि जग पोसलं जातं.
भारतात सुमारे ५० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. तोट्यात चालणार्या, बेभरवशी उपजिविकेवर अवलंबून असणारी ही माणसं नास्तिक, फुले-आंबेडकरवादी, समाजवादी वा अब्राह्मणी होतील वा व्हावीत ही आशा, अपेक्षा, आग्रह मूर्खपणाचा आहे. ही माणसं हिंदुत्ववादीही नाहीत परंतु परंपरावादी आहेत. कारण त्यामुळे त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो.
आजचं जग भांडवल व तंत्रज्ञानकेंद्री आहे. जग माणूसकेंद्री बनवण्यासाठी धडपडणारी माणसं माझ्यासाठी वंदनीय आहेत. या माणसांमुळे शेतीवर आधारित लोकांचं जीवन समृद्ध होणार नाही परंतु सुसह्य होईल.