सांगली जिल्ह्यातील पूर्वभागाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. या पवासात शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचं उत्पादन घेतलं जातं. या अवकाळी पावसात या भागातील द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
गेल्या वर्षी 2020 ला कोरोना ने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. तर 2019 ला आलेल्या महापुरात शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं. या सर्व संकटात हैरान झालेला शेतकरी आता कुठे सावरताना दिसतो आहे. त्यात 17 फेब्रुवारीला झालेल्या अवकाळी पाऊसाने सांगली जिल्ह्यातील पूर्वभागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गेल्या वर्षभरापासून पोटच्या मुलासारखं स्वतःच्या पिकांना जपत असलेला शेतकरी काल मध्यरात्री अचानक आलेल्या पावसाने पूर्णपणे ढासळला आहे.
तासगाव तालुक्यातील तरुण शेतकरी प्रकाश पवार सांगतात...
काल झालेल्या अवकाळी पावसाने माझ्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पाण्याच्या अभावामुळं मी बाग तोडून टाकली होती. गेल्या दोन वर्षात या बागेला देखील फळ नव्हतं. यावर्षी चांगलं समाधानकारक पीक आलं होतं. पण निसर्गाच्या प्रकोपामुळं ते पण माझ्या हातचं गेलंलं आहे. मी या बागेसाठी 4 लाख रुपये खर्च केला आहे. यातून मला 7 ते 8 लाख रुपये मिळतील अशी अशा होती. मात्र, तरी पण निसर्गाच्या या संकटामुळं हातात आलेला पीक निसर्गानं माझ्या हातातून हिरावून घेतलं आहे. मी हतबल झालो आहे. माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. शासनाच्या तुटपुंज्या मदतीनं काही फायदा होत नाही. शासनाने तरीही आमच्या शेतकऱ्यांची दखल घेऊन काहीतरी मदत द्यावी अशी मी अशा करतो.
डोंगरसोनी शेतकरी झांबरे सांगतात....
अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. रात्री झालेल्या वादळी पावसात आमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. माझी पूर्ण बाग आडवी झाली आहे. तीन वर्ष कष्ठ करुन वावर तयार करुन बाग तयार केली. यासाठी मला 10 ते 15 लाख रुपये खर्च आला. रात्री आलेल्या वादळी पावसानं माझं पूर्ण नुकसान झालेलं आहे. यामध्ये माझं कमीत कमी 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे. शासकीय पातळीवर जी मदत केली जाते. ती तुटपूंजी आहे. या आपत्ती नं शेतकऱ्याचं जगणं मुश्कील झालं आहे.
असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
तासगाव भागात झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. या संदर्भात आम्ही तहसिलदार कल्पना ढवळे यांच्याशी बातचित केली असता...
त्यांनी तासगाव तालुक्यात फार नुकसान झालेलं नाही. वाऱ्याने पीक पडली आहेत. 6 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. वादळं होतं. यावर झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनामे केले जाणार आहेत का? यावर तहसिलदार कल्पन ढवळे यांनी अद्यापपर्यंत तसे काहीही आदेश आलेले नाहीत. तसे आदेश आल्यास तात्काळ पंचनामे करण्यात येतील.
या संदर्भात आमदार गोपिचंद पडळकर यांनी माध्यमांनी मॅक्समहाराष्ट्रला दिली....
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. आमच्या भागात अनेक द्राक्षाच्या बागा आहेत. डाळिंबाच्या बागा आहेत. अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मुळात राज्यसरकारने अवकाळी पावसाने जे मागे नुकसान झालं होतं. तीच नुकसानभरपाई अद्यापपर्यंत दिलेली नाही. आणि आता पुन्हा एकदा अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. मी राज्यसरकारला विनंती करतो की, हे सगळे पंचनामे करुन ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यांना त्वरीत भरपाई करुन मदत द्यावी. शेतकऱ्यांची बाजू या सरकारने घ्यावी. शेतकऱ्यांना मदत करावी. अशी मागणी मॅक्समहाराष्ट्रच्या माध्यमातून सरकारला केली आहे.
राज्यात 'या' जिल्ह्यात अवकाळी पाऊस...
औरंगाबाद
राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला असून या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी सोयगाव तालुक्यातल्या काही भागात गारपीट झाली तर काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली.
बुलडाणा
बुलडाणा जिल्हयात देखील मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला या पावसात तांदूळवाडी इथं अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
सांगली
सांगली जिल्हयात झालेल्या वादळी पावसात विजांच्या कडकडाटांसह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
जालना
जालना जिल्हयात भोकरदन इथं अर्धातास ते पाऊन तास अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात हरभरा आणि गहू या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.
नाशिक
नाशिक जिल्हयात त्र्यंबकेश्वर इथं दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. बागलाण, सिन्नर तालुक्यासह त्र्यंबकेश्वर या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
परभणी
परभणी शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पाऊसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.
रायगड
रायगड जिल्ह्यातील सुधागड सह अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वादळ वारा व पाऊस झाला. गारांच्या पावसात पडत असल्याने हवेत गारवा पसरला आहे. अवकाळी पावसामुळे वाल पीक, तसेच आंबा पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. तसेच अचानक आलेल्या पावसाने वीटभट्टी व्यवसायाला फटका बसला आहे.
सातारा
सातारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने गहू, ज्वारी, कांदा या पिकासह आंब्याच्या मोहराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसात पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर पपई, गहू, ज्वारी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
एकंदरित राज्यात मराठवाड्यात, विदर्भात, कोकणात, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. पुणे वेधशाळेने पुढील दोन-तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भात मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात गारपिटीसह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, या पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं या झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.