सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ कासेगावात कोसळली द्राक्षे बाग
कासेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षे बागांचे क्षेत्र असून या गावातील शेतकरी नामदेव नवले यांची येत्या आठ दिवसात काढणीला आलेली द्राक्ष बाग अवकाळी पाऊसामुळे जमिनीवर कोसळली आहे. यामध्ये या शेतकऱ्याचे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्याने कर्ज काढून बाग उभी केली होती. परंतु अवकाळी पावसामुळे बागेचे नुकसान झाले असून शासनाने मदत देण्याची मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्याने केली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट....;
सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून जिल्ह्यातील विविध भागात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा फटका अक्कलकोट, मोहोळ,पंढरपूर, सांगोला या तालुक्यांना बसला आहे. अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसाच्या वादळ वाऱ्यात पत्रे उडाल्याने ते दुरुस्त करत असताना विजेच्या शॉक लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याच तालुक्यात वादळ वाऱ्यात शॉर्ट सर्किट होऊन ऑईल मिलला आग लागून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने दिलासा जरी दिला असला तरी सांगोल्यात अवकाळी पावसाने पिकांना हानी पोहचवली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात या पावसाने कांदा पिकाची तसेच सोयाबीन पिकाची हानी झाली आहे. मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे वीज पडून तीन गाई मरण पावल्या आहेत.
जिल्ह्यात बेदाणा रॅकवर टाकण्यात आला असून त्यावर अवकाळी पावसाचे पाणी पडल्याने तो काळा पडला आहे. अवकाळी पावसाने पंढरपूर तालुक्यालाही झोडपून काढले आहे. या तालुक्यातील कासेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षे बागांचे क्षेत्र असून या गावातील शेतकरी नामदेव नवले यांची येत्या आठ दिवसात काढणीला आलेली द्राक्ष बाग अवकाळी पाऊसामुळे जमिनीवर कोसळली आहे. यामध्ये या शेतकऱ्याचे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्याने कर्ज काढून बाग उभी केली होती. परंतु अवकाळी पावसामुळे बागेचे नुकसान झाले असून शासनाने मदत देण्याची मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.
यापूर्वी ही अवकाळी पावसाने जिल्ह्यात केले नुकसान
सोलापूर जिल्ह्याचे तापमान 43 अंश सेल्सिअसच्या आसपास गेले असून वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थंडावा मिळाला आहे. मात्र शेती पिकांचे नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात ऐन ज्वारीच्या आणि गहू काढणीच्या हंगामात अवकाळी पावसाने हजेरी लावून या पिकांचे नुकसान केले होते. हातातोंडाला आलेला घास निसर्गाकडून हिरावला जात असल्याने शेतकरी निराश झाला होता. याच हंगामात द्राक्षेचे पीक बाजारात विकण्यासाठी काढले जात होते, या अवकाळी पावसाचा आणि वादळ वाऱ्यांचा बागांवर परिणाम होऊन काही ठिकाणी बागा जमिनीवर कोसळल्या होत्या. यामध्ये बार्शी तालुक्यातील इर्लेवाडी आणि पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील बागांचा समावेश होता. इर्लेवाडी येथील शेतकऱ्याची बाग जमिनीवर कोसळल्याने त्या शेतकऱ्याचे 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्याची काढणीला आलेली 2 एकर बाग जमीनध्वस्त झाली होती. तर याच काळात पंढरपूर तालुक्यातील खर्डी या गावातील 2 एकर द्राक्षे बाग कोसळून येथील शेतकऱ्याचे 20 ते 22 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या बागेतील द्राक्षे आठ दिवसाच्या अंतराने विक्रीसाठी उतरवली जाणार होती. पण अचानक आलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात ही द्राक्ष बाग जमिनीवर कोसळली होती. या दोन्ही शेतकऱ्यानी कर्ज काढून बागा उभारल्या होत्या. असे बोलताना त्या शेतकऱ्यांनी सांगितले होते. तसेच अवकाळी पावसाने सांगोला तालुक्यातील दोडक्याच्या बागेला ही हानी पोहचवली होती. सध्या झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील शेतकरी नामदेव नवले यांची बाग काहीशा प्रमाणात कोसळली असल्याने त्यांचे सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
बाग उभारणीसाठी 10 लाख रुपयांच्या आसपास आला होता खर्च
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी नामदेव नवले यांनी सांगितले, की रात्रीच्या अकरा ते बारा वाजता वारे सुरू झाले. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास वाऱ्याचा वेग वाढल्याने शेतात बागेची पहाणी करण्यासाठी 5:30 वाजता गेलो. त्यावेळी बाग सुस्थितीत होती. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बागेकडे गेलो तर बाग कोसळली होती. या बागेच्या उभारणीसाठी सुमारे 10 दहा लाख रुपयांचे कर्ज काढले आहे. बागेचे असे नुकसान झाल्याने वाईट वाटले. या बागेची वर्षभरात चांगली जोपासना केली. महागडी औषधे फवारली. लोकांकडून 10 टक्के रुपयांनी कर्ज काढले आहे. 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याने पडलेला द्राक्षेचा माल कोणी विकत घेऊन जाण्यास तयार नाहीत. याचा बेदाणाही तयार करता येत नाही. लोकांकडून जे कर्ज काढले आहे,ते कसे माघारी द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पडलेला द्राक्षेचा माल मार्केटमध्ये 50 रुपये किलोने विकला गेला असता. या बागेत 8 ते 9 टन माल निघाला असता. पडलेल्या बागेचे फाउंडेशन पुन्हा उभा करण्यासाठी 4 लाख रुपयांच्या आसपास खर्च येणार आहे. पडलेली द्राक्षेला माल व्यापारी घेऊन जात नाहीत. याचा बेदाणा ही तयार करता येत नाही. बागेचा पंचनामा तलाठ्याने केला असून कृषी अधिकारी व गावातील नागरिकांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
बाग पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न
शेतकरी नामदेव नवले यांच्या बागेला दीड ते दोन किलोचे घड असून द्राक्ष बागेचे झाड घडानी लखडले आहे. घडांचे जास्त वजन झाल्याने बाग वाऱ्यात कोसळली आहे. असे येथील शेतकऱ्यांना वाटत आहे. पडलेल्या बागेतील द्राक्ष पिकाचे नुकसान होऊ नये,यासाठी बागेला लाकडांचा आधार देऊन उभी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण बाग उभी राहत नसल्याने शेतकरी निराश झाला आहे. बाग जमिनीवर पडल्याने द्राक्ष अस्ताव्यस्त झाली आहे. पडलेल्या द्राक्षचे काहीच करता येत नसल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
सध्या जिल्ह्यात अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू आहे. यात अवकाळी पावसामुळे गारपीट झाल्यास द्राक्ष बागांचे मोठया प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अवकाळी पावसात वाऱ्याचा वेग ही जास्त असतो. त्याचा परिणाम या बागांवर होतो. वाऱ्यात बागा पडण्याचा जास्त धोका असतो तर गारपिटीमुळे पूर्ण द्राक्षेचा माल खराब होऊ शकतो. याला व्यापारी विकत ही घेत नाहीत आणि याचा बेदाणा ही करता येत नाही. त्यामुळे अवकाळी पाऊस येऊच नये,असे शेतकऱ्यांना वाटत आहे