काही दिवसांपुर्वी सोन्याचा भाव आलेला टोमॅटोचा तोडा आला अन् आता भाव कोसळला
भाव न मिळाल्यास लाल चिखल म्हणून गणल्या जाणाऱ्या टोमॅटोला काही दिवसांपुर्वी सोन्याचा भाव आला. शेतकरी कैवारी म्हणून आव आणणाऱ्या सरकारने महागाईच्या नावाखाली टोमॅटो आयात केला आणि बाजारातील आवकही वाढली. परिणामी १५ दिवसांतच १६० ते १८० रुपये किलोपर्यंत गेलेला टोमॅटो सध्या ८ ते १२ रुपये किलोवर आला आहे. भाव होता तेव्हा माल नव्हता आणि माल आला तर भाव कोसळले आहेत. टोमॅटोची तोडणी करण्यासह सध्याचा दर परवडत नसून भाव स्थिर राहण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी ८ ते १० वर्षांपासून टोमॅटोचे उत्पन्न घेणाऱ्या उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडीच्या गणेश नाईकनवरे या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.