टोमॅटोला मिळतोय कवडीमोल भाव
टोमॅटोला कवडीमोल भाव , तरूण टोमॅटो उत्पादक शेतकर्याने व्यक्त केला संताप;
काही महिन्यांपूर्वी टोमॅटोने उच्चांकी बाजारभाव गाठले होते. अनेक टोमॅटो उत्पादक शेतकरी अक्षरशः मालामाल झाले होते. मात्र आता अकलापूर (ता.संगमनेर) येथील गणेश आभाळे या तरूण शेतकर्याने पिकविलेल्या टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्याने टोमॅटो तोडणे बंद केले असून कुणीही या टोमॅटो फुकट घेऊन जा अशी म्हणयाची वेळ तरूण शेतकर्यावर आली आहे.
अकलापूर येथील गणेश सीताराम आभाळे या तरूण शेतकऱ्याने टोमॅटोला चांगले बाजारभाव मिळतील म्हणून पहिल्यांदाच जवळपास एक एकर क्षेत्रात मल्चिंग पेपरवर टोमॅटो रोपांची लागवड केली आहे. खते, औषधे, मजुरी, डाम, काठी असा एकूण सत्तर हजार रूपयांच्यावर खर्च आला आहे. सध्या टोमॅटो तोडणी सुरू झाली असून पहिल्याच तोड्यात साठ क्रेट टोमॅटो निघाले. मात्र त्याला प्रत्येक क्रेटला साठ रूपयांचा बाजारभाव मिळाला. त्यामुळे वाहतुकीचा खर्चही अंगलट आला. सध्या टोमॅटोचा बाग संपूर्ण लाल झाला आहे. पण बाजारभाव नसल्याने या तरूण शेतकर्याने टोमॅटो तोडण्याचे बंद केले आहे.
कुणीही या टोमॅटो फुकट घेऊन जा अशी म्हणयाची वेळ या तरूण शेतकर्यावर आली आहे. ज्याला वाटेल ते टोमॅटोच्या शेतात येवून टोमॅटो तोडून घेऊन जात आहे. काही महिन्यांपूर्वी शेतकर्यांना टोमॅटोला उच्चांकी भाव मिळाला होता म्हणून आपणही आयुष्यात पहिल्यांदाच टोमॅटोचे पीक घेतले. मात्र बाजारभाव कोसळले आणि सोन्यासारख्या टोमॅटोला कवडीमोल भाव मिळू लागला आहे. त्यामुळे टोमॅटोसाठी झालेला सर्व खर्च अंगलट आला आहे. म्हणून टोमॅटो खराब होण्यापेक्षा कुणीही या टोमॅटो फुकट घेऊन जा अशा पद्धतीने गावातील लोकांना सांगितले आहे, अशी व्यथाही गणेश आभाळे या तरूण शेतकर्याने मांडली आहे.