दोन एकर कोबीवर शेतकऱ्याने फिरवला रोटाव्हेटर

बागलाण तालुक्यातील सटाणा येथील शेतकऱ्याने कोबीचे दर कोसळल्याने दोन एकर कोबीवर रोटाव्हेटर फिरविला. एकीकडे लागवड खर्च वाया गेला आणि दुसरीकडे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही या शेतकऱ्याला पाणी सोडावे लागले.

Update: 2021-08-28 07:54 GMT

नाशिक :भाजीपाला उत्पादनात नाशिक जिल्ह्यात आघाडीवर असलेल्या बागलाण तालुक्यातील सटाणा येथील शेतकऱ्याने कोबीचे दर कोसळल्याने दोन एकर कोबीवर रोटाव्हेटर फिरविला. एकीकडे लागवड खर्च वाया गेला आणि दुसरीकडे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही या शेतकऱ्याला पाणी सोडावे लागले. दुर्दैव म्हणजे हीच परिस्थिती तालुक्यातील अन्य भाजीपाला उत्पादकांवरही येऊन ठेपली आहे.

सटाणा येथील रवींद्र नंदाळे यांनी दोन एकर क्षेत्रात कोबीची लागवड केली.अर्थातच त्यासाठी रोपे, लागवड,खतखाद्य असे सुरुवातीला हजारो रुपयांचा लागवड खर्च केला. नंतर वेळोवेळी रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी केली, अगदी निंदनीवर काही हजार रुपये खर्च झाले. परंतु बाजारात कोबीचे दर प्रचंड कोसळले. त्यामुळे अगदी मजुरी खर्च देखील मिळणं अवघड झालं. त्यामुळे नंदाळे यांनी आपल्या दोन एकर पिकावर रोटावेटर फिरवला.

पोटच्या लेकरासारख्या वाढविलेल्या पिकावर नांगर फिरवून मातीआड करतांना साहजिकच या शेतकऱ्याच्या हृदयातील कालवा कालव त्याच्याच जीवाला माहित! दुर्देव म्हणजे चालू वर्षी सगळ्याच प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाट्याला हाच प्रसंग ओढवला आहे.

त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे निदान लागवड खर्चा एवढी तरी आर्थिक मिळावी अशी मागणी होत आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक गणितं बिघडलेली असताना आणि खतं बियाणांच्या किंमती गगनाला भिडल्या असताना अशा प्रकारे संकट कोसळल्याने शेती करावी तरी कशी असा सवाल शेतरी विचारत आहे.

Tags:    

Similar News