गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यभरात धुमशान माजवलं आहे. मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुबार- तिबार पेरणी करून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच उत्पन्न पडणार नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्याची घोषणा केली. कृषी मंत्र्यांनी वेळेत मदत मिळेल असे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही सरकारची मदत मिळाली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा दिला आहे.