शेतकरी आंदोलन : संसदेवरील मोर्चाही रद्द

देशाच्या राजधानी दिल्लीत शासकीय पथसंचलनानंतर शेतकऱ्यांच्या ‘ट्रॅक्टर मोर्चा’ला हिंसक वळण लागल्यानंतर दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली असून, शेतकऱ्यांचा १ फेब्रुवारीचा संसदेवरील नियोजित मोर्चाही रद्द करण्यात आला आहे.

Update: 2021-01-28 06:57 GMT

संसदेचे अर्थसंकल्पीय आधिवेशन सुरु होणार आहे. अर्थसंकल्पदिनी म्हणजे १ फेब्रुवारीला संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता. मात्र, मंगळवारच्या हिंसाचारामुळे हा मोर्चा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय किसान मजदूर संघटना आणि भारतीय किसान युनियन (भानू गट) या दोन संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली आहे.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या समन्वयक पदावरूनही व्ही. एम. सिंग यांची हकालपट्टी करण्यात आली होती आणि २५ नोव्हेंबरपासून सिंग यांच्या संघटनेने स्वतंत्रपणे आंदोलन केले होते. त्यांनी दिल्लीच्या सीमेवर न थांबता केंद्र सरकारने निश्चित केलेल्या बुराडी मदानावर जाणे पसंत केले होते. या दोन संघटनांनी माघार घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चातील नेत्याने केला. तसेच आंदोलन कायम राहणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी सांगितले.कृषी कायदे रद्द करावेत व किमान आधारभूत मूल्यास कायद्याची हमी द्या, या प्रमुख दोन मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत.

त्यांच्या केंद्र सरकारशी ११ बठका झाल्या असून, त्या निष्फळ ठरल्या आहेत.सिंघू, टिकरी व गाझीपूर सीमेवरून पूर्वनियोजित मार्गावरून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास दिल्ली पोलिसांनी सशर्त परवानगी दिली होती. मात्र, तिन्ही सीमांवरील ट्रॅक्टर मोर्चातील आंदोलकांनी विनापरवानगी थेट दिल्ली गाठली. त्यानंतर लाल किल्ला ताब्यात घेऊन शीख धर्माचा ध्वज फडकवण्यात आला. तसेच, आयटीओ व नांगलोईमध्येही िहसाचार झाला, त्यात एका आंदोलकाचा मृत्यू झाला. या िहसक घटनांमध्ये आंदोलक व पोलीस यांच्यात झालेल्या संघर्षांत सुमारे ३०० पोलीस जखमी झाले असून, या प्रकरणी वेगवेगळे २२ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

लाल किल्ला, आयटीओ तसेच अन्य ठिकाणी मंगळवारी आंदोलकांनी केलेल्या िहसाचारप्रकरणी ३७ शेतकरी नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हे नोंदवले. त्यात योगेंद्र यादव, मेधा पाटकर, राकेश टिकैत, दर्शन पाल, बुटा सिंग, सतनाम पन्नू, कविता कुरुगंटी अशा प्रमुख शेतकरी संघटनांच्या नेत्यांचा समावेश आहे.

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत हिंसाचारात सुमारे ४०० पोलीस जखमी झाले. या हिंसाचारप्रकरणी १९ जणांना अटक करण्यात आली. तसेच आणखी ५० जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी सांगितले.

Tags:    

Similar News