सोयाबीन झाले मातीमोल
सोयाबीन पिकावर यलो मोझॅकचा प्रादुर्भाव, शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ;
बार्शी तालुक्यातील आगळगाव - मळेगाव परिसरात सोयाबीन पिकावर 'यलो मोझॅक' रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सोयाबीन पीक संकटात सापडले आहे. सोयाबीन पीक कापणीसाठी एक महिना असताना या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. या रोगामुळे उत्पन्नात कमालीची घट येणार आहे.
एक महिना पावसाच्या खंडामुळे आणि आत्ता यलो मोझॅक रोगामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. येणाऱ्या काळात आर्थिक तजवीज करून रब्बी हंगामाची कशी तयारी करायची, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.येणारी दिवाळीदेखील शेतकऱ्यांसाठी कडू ठरण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. पीकविमा कंपनीची अग्रिम रक्कम अजून शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.