उन्हाळ्याची चाहूल लागताच विहीर, नद्या, तलाव यातला पाणीसाठा खालावतो, परिणामी पाण्यासाठी ग्रामीण भागातल्या नागरीकांची हालअपेष्टा होते, त्यात मराठवाड्याची परिस्थिती बघितल्यास याहीपेक्षा बिकट असते. मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पात एकुण २०.५९ पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाच्या तापमानात वाढ झाल्याकारणाने धरणातल्या पाणीसाठ्याचं प्रमाण कमी झालं आहे. यामुळे नागरिकांची भटकंती सुरू झाली असून ही परिस्थिती अतिशय भयंकर आहे. मराठवाड्यातील ५ जिल्ह्यामध्ये तब्बल ९७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणी पाण्याची नितांत आवश्यकता आहे त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन १३७५ खाजगी विहीरी अधिगृहित करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पाण्यासाठीची नागरिकांची भटकंती थांबविण्यात मदत होईल.
मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पाणीसाठा काही प्रमाणात शिल्लक आहे. परंतु इतर पाच जिल्ह्यातील ६३७ गावे १७८ वाड्यांत ९७९ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सध्या सुरू आहे.
जिल्ह्यानिहाय पाण्याच्या टँकरची संख्या किती ?
ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचे साठे पूर्णपणे संपले आहेत, आणि नागरिकांना पाण्यासाठी वनवन करत भटकंती करावी लागत आहे अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ४४३ टँकर, जालना जिल्हा ३२१, बीड जिल्हा १४४, लातूर ०८ तर धाराशीव जिल्ह्यात ६३ टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवण्यात येत आहे.
याव्यतिरिक्त १३७५ खाजगी विहीरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांतून सर्वसामान्य जनतेला पाणी पुरवण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात धरणातल्या पाण्याने तळ गाठलाय.
कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक ?
मराठवाड्यातील मोठ्या ११ धरणांत केवळ २५.४५ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. एकुण ७५ असलेल्या मध्यम प्रकल्पातील चार धरणे पूर्णपणे कोरडे झाले असून २६ धरणे जोत्याखाली आहेत. मध्यम प्रकल्पात एकुण १०.५८ टक्के पाणीसाठा आहे. ७५० लघु प्रकल्पातील ११३ प्रकल्प कोरडे आहेत; तर २८६ धरणे ही जोत्याखाली आहेत. या सर्व प्रकल्पांत एकुण सरासरी ११ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.
तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांत १३ टक्के तर गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांत २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील सर्व प्रकल्पांत फक्त २०.५९ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत पाणीटंचाईचं मोठं संकट उद्भवण्याची शक्यता आहे.
जायकवाडी धरणाची काय आहे सद्यस्थिती?
जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हे धरण आहे. मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. आशिया खंडातील 'मोठं मातीचं धरण' अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण. सध्या या धरणात १९ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. हे धरण खूप विस्तृत असून या धरणावर चार जिल्हे अवलंबून आहेत. पिण्याचे पाणी, सिंचन आणि उद्योगासाठी जायकवाडीवर मोठ्या प्रमाणावर भार आहे.
तसेच, येलदरी धरणात ३८ टक्के, सिध्देश्वर ११, मांजरा ७, उर्ध्व पैनगंगा ४९, निम्न तेरणा ३, निम्न मनार ३० तर, निम्न दुधना धरणात ०७ टक्के, असा धरणनिहाय पाणीसाठा आहे. माजलगाव आणि सिना कोळेगाव धरण कोरडे आहे. पुरेसे पाणी नसल्यामुळे गावोगावी पाण्यासाठी नागरीकांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. शिवाय, नदीच्या पात्रातले पाणी आटल्यामुळे शेळी, गाय, म्हैस या दुग्धजन्य पाळीव प्राण्यांसह अन्य डोंगरमाथ्यावर मुक्तपणे चरणाऱ्या हरिण व काळवीट हे मुके प्राणी व अन्य पशु-पक्षांच्या पिण्याच्या पाण्याचा सुध्दा प्रश्न गंभीर झाला आहे.