पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत ; खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्या
नांदेड जुलैच्या पाहिल्या आठवड्यात 6.16. मिलिमीटर पाऊस झाला व केवळ 4.78 टक्केच पेरणी झाली आहे. पेरणीसाठी 75 ते 100 मिमी पावसाची आवश्यकता असताना पावसाला अधिक उशीर झाल्यास खरीप हंगाम धोक्यात आले आहे.;
नांदेड जिल्ह्यात जुनच्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपातील पेरणी करण्यास सुरु केली होती. मात्र, मागील आठ दिवसांपासून पावसाने हूलकावणी दिल्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यात 27 हजार 831 हेक्टरनुसार केवळ 4.78 टक्के क्षेत्रावरच पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. नांदेड जिल्ह्यात खरिपाची सर्वसाधारण पेरणी क्षेत्र सात लाख 66 हजार 806 हेक्टर आहे. यात सर्वाधीक साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित आहे. दरम्यान, यंदा जून नंतर चांगला पाऊस पडणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले होते. यानुसार जिल्ह्यातील काही भागात पावसाचे आगमनही झाले. यामुळे शेतकर्यांनी पावसाच्या आशेवर खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मुग, ज्वारी, हळद आदी पिकांची पेरणी केली. जून महीन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दोन दिवस चांगला पाऊस झाला असला तरी परत पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.