चार लाखाच्या डाळिंबावर दरोडा
झाडावर लगडलेले डाळींब चोरल्यानं खळबळ, चार लाखांचा फटका; सोलापुरातल्या मोहोळमधील घटना;
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. झाडावर लगडलेले डाळींब (Pomegranate) चोरल्यानं खळबळ उडाली आहे. मोहोळ तालुक्यातील पोखरापूर इथे ही घटना घडली. शेतकऱ्याचे जवळपास चार लाख रुपयांचे (4Lakh) नुकसान झाले आहे. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोखरापूर येथील अमृत रामचंद्र पवार या शेतकऱ्याच्या शेतात ही चोरीची घटना घडली.
मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील अमृत रामचंद्र पवार यांनी स्वतःच्या शेतात अर्धा एकर डाळिंब आणि शेजारी असलेले दोन एकर शेत बटईने घेऊन त्यात डाळिंबाचे पीक घेतले होते. या दोन एकर बागेतील डाळिंब काढणीला आली होती. मात्र,रात्री अमृत पवार यांनी शेतातील डाळिंबाला पाणी दिले. पहाटे जेव्हा ते बागेत गेले तेव्हा डाळिंबाच्या झाडांना फळे दिसली नाहीत. म्हणून त्यांनी सगळीकडे पाहणी केली. त्यावेळी अडीच एकरावरील झाडांना डाळिंब दिसले नाहीत. भगव्या जातीचे तीन ते चार टन वजनाची सुमारे चार लाख रुपये किमतीची डाळिंब अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे स्पष्ट झाले आहे. हे डाळिंब काढणीस आले होते. म्हणजे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या संदर्भात मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सध्या डाळिंब काढणीला आले होते. अतिशय काबाड कष्ट करुन आम्ही हे पिकं पिकवलं होतं. साधरणत: चार टन डाळिंबाचा माल होता. तो चोरुन नेला आहे, यामध्ये माझे चार लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अमृत पवार यांनी सांगितली. त्यामुळे याप्रकरणी तात्काळ कारवाई करावी अशी माहिती शेतकरी अमृत पावर यांनी सांगितली. या डाळिंबातून कमीम कमी चार लाख रुपये झाले असते त्यामुळे प्रशासनानं लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकरी म्हणाले. ही सर्व डाळिंबाची बाग काढणीस आली होती. अशा अवस्थेतच चोरट्यांनी डाळिंबाच्या बागेवरील फळे चोरुन नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकरी अमृत पवार यांनी बसला आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता आरोपींना पोलीस केव्हा पकडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.