कांद्याच्या दरात चढ उतार सुरू असल्याने शेतकऱ्यांनी नेमका कुठला निर्णय घ्यावा याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. या मुद्द्यांच्या आधारे सत्य स्थिती आणि भविष्य मधील बाजार चढ-उतारांचे गणित मांडले आहे सहा मुद्द्यांच्या आधारे कृषी विश्लेषक दीपक चव्हाण यांनी..
1. देशातील कांद्याचे कोठार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत अव्यवहार्य स्टॉक लिमिटला विरोध म्हणून आठवडाभर मार्केट्स बंद ठेवले होते. सणासुदीच्या काळात मार्केटमध्ये रोजच्या रोज आवकेचा निपटारा होणे गरजेचे असते. ज्या मालाची टिकवण क्षमता संपत आलीय, त्यासाठी रोजच्या रोज बाजार सुरू असणे किती गरजेचे असते, याचा प्रत्यय आता येतोय. कुठल्याही शेतमालाच्या बाजारभावात जर नैसर्गिक संतुलित ठेवायची असेल, तर पुरवठ्याची पाईपलाईन सातत्यपूर्ण असली पाहिजे. म्हणजे बाजार समित्या सुरू राहिल्या पाहिजेत.
2. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी आहे, हे मान्य. पण, तुटवड्याची नेमकी तीव्रता कुणालाच माहित नाही. तुटवड्याचे तीन प्रकार करू यात 1. सौम्य, 2.मध्यम, 3. तीव्र. या तिन्ही कॅटेगिरीजचे मोजमाप करणारी शास्त्रीय यंत्रणा आज भारतात नाही. (अमेरिकेत वरीलप्रकारे स्टॅंडिंग पिकांचे उत्पादन मोजण्याची पद्धत तेथील कृषी खात्याने विकसित केली आहे.) वरील तीन पैकी यंदा भारतीय कांद्याचा तुटवडा कोणत्या कॅटेगिरीत आहे, हे कुणालाही माहित नाही.
3. कांद्याबाबत विशिष्ट कालावधीत मागणी-पुरवठ्याचा शास्त्रीय डाटा उपलब्ध नसतानाही बाजारात विशिष्ट उंच रेट्स देणे संयुक्तिक वाटत नाही. आपल्या मालाची टिकवण क्षमता लक्षात घेत दर आठवड्याला थोडा थोडा माल विकत राहणे, या शिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. "बाजारात विशिष्ट उंच धारणा ठेऊन अनावश्यकरित्या माल होल्ड करणे नेहमीच बरोबर ठरेल असे नाही."
4. मुद्दा क्रमांक 2 पुन्हा वाचावा, ही विनंती.
5. सरकारने यावर्षी कांदा बाजारभाव दबावतंत्र - हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये सातत्य राखले. सप्टेंबरच्या मध्यापासून दर चार दिवसांनी एक - एक बातमी पेरत बाजारावर सायकॉलॉजिकल दबाव कायम ठेवला. तुटवड्यामुळे अपेक्षित असा 'सेंटिमेंटल प्रिमियम' जास्त काळ मिळू दिला नाही. सप्टेंबरच्या मध्यापासूनचे दर चार दिवसांचे हेडिंग्ज पहा - कांद्यावर निर्यातबंदी, खासगी कांदा आयातीचे निर्बंध केले शिथिल, एमएमटीसी - नाफेडद्वारे कांदा आय़ात होणार, कांद्यावर स्टॉक लिमिट जारी, कांदा व्यापाऱ्यांवर आयकराच्या धाडी, कांदा व्यापाऱ्यांचा संप, वाणिज्यमंत्र्यांचे भाव रोखण्याबाबत नियमित स्टेटमेंट्स.
6. आगामी दिवसांत तेजी असेल की नरमाई असा कुठलाही अर्थ वरील पोस्टमधून काढू नये. "नोव्हेंबरमध्ये देशात नेमका किती लाख टन कांदा कॅरिफॉरवर्ड झालाय आणि डिसेंबरअखेरपर्यंत नव्या आवकेचे प्रमाण नेमके किती राहील? कॅरिफॉरवर्ड व नवी आवक मिळून डिसेंबरपर्यंत एकूण पुरवठा किती असेल? डिसेंबरअखेपर्यंत एकूण मागणीच्या तुलनेत किती टक्के पुरवठा घट आहे," याबाबत जर आपल्याकडे ठोस माहिती, डाटा असेल, तर पोस्टमधील आशयाकडे दुर्लक्ष करावे.