आपली कांदा निर्यातबंदी; फायदा परराष्ट्रांचा
देशांतर्गत ग्राहकांच्या हित साधण्यासाठी केलेल्या कांदा निर्यातबंदीनं देशी कांदा उत्पादकाचं अपरीमित नुकसान झालचं परंतू वर्षानुवर्षे कांदा निर्यातदार म्हणुन अव्वल असलेल्या भारताचं मार्केट परराष्ट्रांनी काबीज केलं असं सांगताहेत कृषी अभ्यासक दीपक चव्हाण...
गेल्या वर्षातील शिल्लक उन्हाळ कांद्याचा पुरवठारूपी दबाव कमी होताच, नव्या लाल मालाच्या बाजारभावाला चांगला आधार मिळाला आहे. आजपासून तीन-आठवडे - महिनाभरात जो माल काढणीला येईल, त्याचे उत्पादन कमी आहे. कारण, रोपे आणि लागणी खराब झाल्या होत्या.फेब्रुवारीच्या मध्यापासून पुढे जो लेट खरीपाचा माल येईल, त्याची प्रतिएकरी उत्पादकता सध्याच्या पाऊसमानावर अवलंबून आहे. क्षेत्र सुमारे दुपटीपर्यंत वाढलेय, पण पिकून येईल तेव्हा खरे म्हणायचे अशी स्थिती दिसतेय.
फेब्रुवारीपासून आठवडा दर आठवडा कांद्याचा पुरवठा सुधारत जाईल. लेट खरिपाचा (रांगडा) माल फेब्रुवारी-मार्चमध्ये बाजारात असेल. महाराष्ट्र कृषी खात्याकडील माहितीनुसार यंदा लेट खरीप कांद्याचे क्षेत्र दोन लाख 14 हजार हेक्टरवर पोचले. गेल्या वर्षी लेट खरिपाचे क्षेत्र 78 हजार हेक्टर होते. यंदा 174 टक्क्यांनी क्षेत्र वाढले. मार्चपासूनच आगाप उन्हाळ (रब्बी) कांद्याचा पुरवठा सुरू होईल. गेल्या डिसेंबरअखेरीस उन्हाळ कांद्याने 2 लाख 44 हजार हेक्टर क्षेत्र व्यापलेय. चालू जानेवारी-फेब्रुवारीत अजून निम्या लागणी व्हायच्या आहेत. गेल्या वर्षी 4.9 लाख हेक्टरवर उन्हाळ लागणी झाल्या होत्या. सर्वसाधारणपणे - देशाच्या एकूण कांदा लागणीत महाराष्ट्राचा वाटा 50 टक्क्यापर्यंत जातोय.
फेब्रुवारी-मार्चमध्ये जर पुरवठा वाढला तर नैसर्गिकरित्या भारतीय कांद्याच्या निर्यातीसाठी चांगली पडतळ मिळेल. एकूण दैनंदिन मागणीच्या तुलनेत पुरवठा संतुलित राहिला तरच बाजार किफायती राहतो. जास्तीचा पुरवठा झाला तर बाजार नरमाईत राहतो. पुढील दीड-दोन महिन्यातील पाऊसमानावर पुरवठ्याचे
गणित अवलंबून असेल. एक जानेवारीला कांदा निर्यातबंदी उठली. पहिल्या आठवड्यात परदेशातून मागणी नव्हती. गेल्या वर्षी 14 सप्टेंबरनंतर साडेतीन महिने स्पर्धक देशांना आपण मार्केट खुले करून दिले. टर्की, इजिप्त, हॉलंड आदी देशांनी संधी साधली. श्रीलंकेत 700 हजार तर फिलीपाईन्समध्ये 2000 कंटेनर्स स्पर्धक देशांनी पाठवलेत.
- दीपक चव्हाण
#कांदानोंदी2021