कांदा उत्पादक शेतकऱ्याने पाठवले ISRO च्या शास्त्रज्ञांना कांदे
: भारताचे चंद्रयान चंद्रावर पोचल्यामुळे देशभर जल्लोष सुरू असताना केंद्र सरकारने 40% आयात मूल्य लावून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. चांद्रयान मोहिमेतील शास्त्रज्ञांचं मनापासून अभिनंदन करत एका शेतकऱ्याने प्रतिकात्मक कांद्याचे थैली इस्रो (ISRO) शास्त्रज्ञांना पाठवली आहे;
कांद्याच्या पहिली सोबत शेतकऱ्याने ISRO शास्त्रज्ञांना लिहिलेले पत्र जसेच्या तसे,..
प्रति
मा चेअरमन
आणि चांद्रयान मोहिमेतील समस्त शास्त्रज्ञ
भारतीय अंतराळ संशोधन केंद्र
आपण इस्रो च्या शास्त्रज्ञांनी अथक परिश्रम करून रात्रंदिन कष्ट करून संशोधन अंती चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जगात सर्वप्रथम चंद्रयान 3 यशस्वी उतरवून अंतराळ संशोधनात भारताचे जगात नवीन किर्तीमान स्थापित केले आहे. याचा प्रत्येक भारतीयांना अभिमान आहे. अशा वेळी वैज्ञानिकांचा गौरव करणे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे.
आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील शेतकरी किसान सभेच्या माध्यमातून ही कांद्याची थैली पाठवत आहोत कदाचित याचे बाजारातील मूल्य व किंमत नगण्य असेल. या कांद्यावर केंद्र शासनाने 40% निर्यात कर लावल्याने दुबई च्या अलिशान हॉटेल मधील डिश मध्ये पोहोचण्या ऐवजी आमच्या अडीला सडावे लागेल.
परंतु या कांद्याच्या उत्पादनात आमचे रक्त आटले आहे
या कांद्याच्या उत्पादनासाठी माझ्या सारख्या काही जणांनी तुमच्या सारखे शास्त्रज्ञ बनण्याची स्वप्ने बघणाऱ्या स्वतःच्या मुलाची फीस व पुस्तकांची रक्कम खतावरील कर वाढविल्याने वाढलेल्या किमतीसाठी खर्ची टाकली असेल.
कदचित अश्या कोण्या मुलाच्या वडिलांना कांद्याला पाणी देताना रात्रीच्या वेळी साप चावून जीव गमवावा लागला असेल.
या कांद्याच्या उत्पादनात आमचा घाम आहे. आपल्याशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्हा सर्व शेतकऱ्यांचे रक्त आणि घाम यातून निर्माण केलेले उत्पादन आपणास समर्पित करीत आहोत. महाराष्ट्रातील हतबल शेतकऱ्यांची भेट स्विकारावी ही अंतराळ संशोधकांना नम्र विनंती.
शेतकरी समुदायातील एक प्रातिनिधिक शेतकरी
ओमकार पवार
किसान सभा
मु खळी ता गंगाखेड जि परभणी