कांद्याचा पुन्हा वांदा होणार का?

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कांदा पीकाची आगामी वर्षात लागवड वाढणार असली तरी उत्पादनवाढीबाबत खात्री देता येत नाही. नुकतचं केंद्रसरकारने खुल्या केलेल्या कांदा निर्यातीचा नेमका काय परिणाम होत आहे, याचे विश्लेषण केले आहे कृषी अभ्यासक दीपक चव्हाण यांनी...;

Update: 2021-01-02 04:22 GMT

गुजरात राज्यात ता. 23 डिसेंबरपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार 53 हजार हेक्टरवर रब्बी कांदा लागणी झाल्या आहेत. गुजरात कृषी खात्याकडील माहितीनुसार गेल्या वर्षी याच कालावधीत 33 हजार हेक्टरवर लागणी होत्या. म्हणजे 20 हजार हेक्टरने किंवा 60 टक्क्यांनी लागणी वाढल्या आहेत. महाराष्ट्रात डिसेंबरअखेपर्यंत किती लागणी वाढल्यात हे लवकरच कळेल. पंचवार्षिक सरासरीच्या तुलनेत 2021 मध्ये रब्बी कांदा लागणी देशभरात नवा बेंचमार्क सेट करतील.

देशाच्या एकूण रब्बी क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा 50 टक्के आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत कांदा लागणी सुरू राहतील. मार्चच्या मध्यास महाराष्ट्रात आणि देशभरात कांदा लागणींत किती वाढ झाली ते कळेल. अर्थात, चालू तिमाहीत पाऊसमान, हवामान किती अनुकूल - प्रतिकूल राहते, यावर उत्पादकतेचे गणित अवलंबून आहे. लागणी वाढल्या म्हणून उत्पादन वाढतेच, हा समज गेल्या वर्षाने चुकीचा ठरवला आहे. भूजल उपलब्धतेमुळे महाराष्ट्रासह अन्य कांदा उत्पादक राज्यांत लागणींचे क्षेत्र वाढत आहे. आणि गुजरातच्या आकडेवारीवरून त्याचे एक कन्फर्मेशन मिळाले आहे.

देशात सर्वसाधारण खरीप हंगामात दोन लाख हेक्टरवर कांदा लागण होते. ऑक्टोबर - डिसेंबर या तिमाहीत वरील लागणींच्या मालाची आवक होत असते. यंदा अतिपावसामुळे खरीप लागणीच्या रोपवाटिका खराब झाल्या. शिवाय, बहुतांश लागणी पाऊस व रोगराईने नष्ट झाल्याचे रिपोर्ट्स आहेत. जानेवारी ते मार्च 2021 - या तिमाहीत लेट खरीप कांद्याचा पुरवठा असतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रामुख्याने लेट खरीपाच्या लागणी होतात. लेट खरीपाच्या रोपवाटिका व लागणींबाबतही चित्र खराब आहे.

1. सर्वसाधारणपणे 1 नोव्हेंबरपासून रब्बी हंगामातील कांद्याच्या लागणी सुरू होतात, फेब्रुवारीअखेरपर्यंत सुरू राहतात.

2. देशात गेल्या हंगामात उच्चांकी 9.9 लाख हेक्टरवर रब्बी कांदा लागणी होत्या.

3. गेल्या हंगामात देशातील रब्बी कांदा लागणीत महाराष्ट्राचा वाटा 49.4 टक्के होता, महाराष्ट्रात 4.9 लाख हेक्टरवर रब्बी (उन्हाळ) लागणी झाल्या होत्या.

या वर्षी देशात रब्बी (उन्हाळ) कांदा बियाण्याचा अभूतपूर्व तुटवडा आहे. त्यामुळे किती लाख हेक्टरवर लागणी होतील आणि त्याची उत्पादकता काय राहिल या दोन्ही गोष्टींबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. 20-21 मध्ये किमान सात लाख हेक्टरवर रब्बी लागणी झाल्या पाहिजेत आणि त्यातून चांगल्या टिकवण क्षमतेची हेक्टरी 2.5 टन सरासरी राष्ट्रीय उत्पादकता मिळणे क्रमप्राप्त ठरेल.

गेल्या हंगामात सुमारे दहा लाख हेक्टरवर कांदा लागणी होवून आणि उन्हाळ हंगामात आजवरचे उच्चांकी 213 लाख टन उत्पादन मिळूनही आजघडीला कांद्याचा तुटवडा आहे. त्याचे कारण, चाळीतल्या कांद्यात अनपेक्षित 50 टक्क्यापर्यंत घट आणि नव्या खरीप हंगामातील नव्या लागणींचे अतिपावसामुळे मोठे नुकसान होय. सलग दुसऱ्या वर्षी खरीप कांदा उत्पादनात निचांकी घट अनुमानित आहे.

कृषी पत्रकार अशोक तुपे म्हणाले, यंदा कांद्याला पांढरी सडं हा रोग आला आहे. त्यामुळे उत्पादन राज्यभर ५० टक्क्यांनी घटणार आहे. लागवडीसाठी १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर हा काळ योग्य असतो, अगदी जानेवारी व फेब्रुवारीमध्ये लागवडी होतील. पाऊस असल्याने रोपे ( उळे ) उशिरा टाकण्यात आली.त्यात जमीन तयार करायला वेळ गेला. एकाच वेळी लागवडी झाल्या. त्यामुळे मजूर मिळाले नाही. उशिरा लागवडीने उत्पादन घटणार, त्यात उशिरच्या लागवडीला गारपीट, पाऊस यांचा धोका आहेच.

वरिष्ठ कांदा शास्त्रज्ञ आणि माजी कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांचे निरीक्षण इथे देतोय. डॉ. लवांडे सांगतात, " यंदा माझ्या गेल्या 45 वर्षांच्या करिअरमध्ये चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्यात एवढी घट निदर्शनास नव्हती. तसेच पावसाळी (खरीप) हंगामात कांदा उत्पादक विभागात रोगराईचा एवढा प्रकोप कधी दिसला नव्हता. अतिपाऊस, उष्णता, अति आर्द्रता हे घटक रोगराई वाढण्यास कारणीभूत ठरलेत. 

Tags:    

Similar News