कांद्याचे हेही दुष्टचक्र निघून जाईल...

बाजारात सध्या कांद्याचे दर पडले आहेत.. ऑक्टोबरपासून पुढे तुटवड्याची परिस्थती येईल, परंतु पुरवठावाढ किंवा पुरवठा तुटीमध्ये संतुलन साधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा क्रमप्राप्त ठरतो.. AI माध्यमातून भविष्यात कांद्यातली चढण आणि मार्केटमधील चढ-उतार ओळखता येतीलअसं सांगताहेत शेतीमाल बाजार विश्लेषक दीपक चव्हाण..

Update: 2023-06-13 03:20 GMT


यंत्राअभावी कांदा लागणी (जानेवारी) लेट होतात, पुढे तापमानवाढीत, अवकाळीत, गारपीटीत सापडतात, टिकवण क्षमता घटते... ह्याच मालाची पॅनिक सेलिंग होते...छोट्या अवधीत मागणीपेक्षा पुरवठा वाढतो आणि भाव पडतात, असे दुष्टचक्र आहे...बाजारभाव ही एकाकी प्रक्रिया नाही...परस्पर अवलंबित्व आहे. शास्त्रज्ञांच्या मते जानेवारीतील उन्हाळ लागणी टाळल्या पाहिजेत. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये लागणी करायच्या असतील तर त्यासाठी यंत्रे हवीत.



 


काही वर्षांत कांद्याची शेती ही यंत्र व तंत्र आधारित असेल, उदाहरणार्थ - कांदा लागवड यंंत्राला मागणी वाढतेय. अंतापूर-सटाणा येथील शेतकरी अनिकेत सोनवणे यांनी कांदा फवारणीसाठी ड्रोन तंत्राची यशस्वी ट्रायल घेतली आहे. कांदा काढणी मशिनवर देखिल काम सुरू आहे, असे सौरभ कदम (देवळाली प्रवरा) यांनी कळवले आहे... याबरोबर - कांदा ग्रेडींगसाठी क्षितिज ठाकूर (चाकण) यांच्या स्टार्टअपने काही व्यावसायिक प्रात्यक्षिके पार पाडली आहेत. ही सर्व मंडळी आपल्याच आसपासची आहेत, आपल्यासारखीच कौटुंबिक पार्श्वभूमी असलेली. थोडक्यात, कांदा लागण, फवारणी, काढणी, ग्रेडींग अशी कामे यंत्राकडे वळतील होतील, ज्यात ७० टक्के वेळ व मानवी श्रम (लेबर) कमी होईल. दहा वर्षापूर्वी आपण अशा पद्धतीने काम करू शकू असे वाटत नव्हते. खूप वेगाने बदल घडतोय.



 


कृत्रिम बुद्धीमत्ता (AI), रोबोटिक्स, मशिन लर्गिंग सारख्या नव्या तंत्राच्या मदतीने शेती यंत्रे विकसित होत आहेत...पूर्वी ड्रोन फवारणीत दहा पंधरा फुट अडथळ्याचे सेन्सिंग होत नव्हते, आता ती अडचण दूर करणारे तंत्र विकसित झाले आहे. एखादे झाड, भिंत कंपाऊंड आदींच्या अगदी जवळून ड्रोन फिरू शकतील. ड्रोन ऑपरेटर्सशिवाय फवारणी होवू शकेल असे प्रोग्रॅमिंग विकसित झाले आहे, होत आहे. ग्रेडिंगमध्ये सुद्धा एआय, मशिन लर्गिंगनुसार अचूक काम होत आहे, अगदी कांद्याच्या आतमधील सडन सुद्धा ट्रॅक होवून तो कांदा बाजूला पडेल...



 


सध्या AI सारखे तंत्रज्ञान अचंबित करणाऱ्या वेगाने विकसित होत आहे आणि या बदलात एक शेतकरी म्हणून आपले स्थान कुठे आहे, एक कास्तकार समूह म्हणून आपण मागे पडायला नको, काहीही करून नवे बदल स्वत: शिकून इतरांना शिकवण्यासाठी सर्वांनाच युद्ध पातळीवर काम करावे लागणार आहे.


 


या विषयाला आणखी एक जोड देता येईल ती हवामान सजगतेबाबत. कांदा उत्पादक व हवामान अभ्यासक विजय जायभावे -सिन्नर, बीएन फंड पाटील -पारनेर हे पाऊसमानाचा कल लक्षात घेवू कांद्याची शेती करताहेत. त्यांचे अनुभव इतरांसाठी मदतकारक आहेत. एक मुद्दा आपण लक्षात घ्या, की यंदाच्या कांदा नुकसानीत निसर्गनिर्मित व मानवनिर्मित भाग किती असे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. लवांडे यांना विचारले तेव्हा त्यांनी सत्तर : तीस असे उत्तर दिले. तीस टक्के मानवनिर्मित आहे, कारण जानेवारीच्या मध्यानंतरच्या लागणी या सध्या हमखास कोणत्या ना कोणत्या संकटात सापडतात. तेव्हा डिसेंबरच्या आत शास्त्रीय शिफारशीनुसार कांदा लागणी आटोपणे हा एकमेव मार्ग उरतो. अशा वेळी हवामानाचा अभ्यास आणि डिसेंबरवरील लागणींचा भार कमी कऱण्यासाठी यंत्राची मदत असे पर्याय आपल्या समोर आहेत. बाकी क्रॉप प्रोटेक्शन (रोगकिडी नियंत्रण) क्रॉप न्युट्रिशन (पीकपोषण) आपण चांगल्या पद्धतीने करतोय. त्यात आणखी सुधारणा करू शकतो. काही करून यंदासारखी संकटे पुन्हा येऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक सावधानी आणि नव्या काळानुसार यंत्र-तंत्राची मदत घेवून पुढे जाऊ यात. अर्थात, एकटे दुकटे नव्हे, तर एकमेकांना मदत देत आधार देत. वाईट दिवसही निघून जातील. .


Tags:    

Similar News