दोन वर्षांपासून पदरात काही नाही : डाळींब उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा
सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुका डाळींब उत्पादनासाठी अग्रेसर आहे.डाळींब फळावर पडलेल्या तेल्या व कुजकट रोगामुळे तालुक्यातील शेतकरी पुरता हैराण झाला असून त्यात अवकाळी पावसाने जोरदार हजर लावल्याने डाळींब फळबाग उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सांगोला तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या डाळींब फळबागांचे पंचनामे करून त्वरित मदताचा मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट....
दुष्काळी भागात केली जातेय डाळींबाची शेती
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याला दुष्काळी म्हणून ओळखले जाते; परंतु हा तालुका आता प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकताना दिसत आहे.या तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात डाळींबाची लागवड करून डाळींब उत्पादनाची चांगली बाजार पेठ निर्माण केली आहे.सांगोला तालुका डाळींब पिकाचे हब असून येथील निम्यापेक्षा जास्त शेतीक्षेत्रावर डाळींबाच्या फळबागा आहेत. येथे डाळींबाची मोठी बाजारपेठ आहे.येथील मार्केट मधून बाहेर राज्यात डाळींब एक्स्पोर्ट केले जाते.
अवकाळी पावसाने डाळींबाची फुले गळाली
सांगोला तालुक्यातील बामणी गावच्या परिसरातील शेतकरी पांडुरंग माने त्यांच्या उमदीच्या काळात डाळींब संघाचे संचालक होते.त्यांचेकडे गेल्या अनेक वर्षांपासून डाळींबाची बाग आहे.सांगोला परिसरात जम्बो भगवा,गणेश आणि भगवा या डाळींबाच्या जातीची लागवड केली जाते.मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी पांडुरंग माने यांनी सांगितले की,अवकाळी पावसामुळे फुले गळून गेली आहेत. तेल्या व कुजकट रोग डाळींबावर पडला आहे.औषध फवारणीसाठी भरपूर खर्च झाला आहे.आमच्या पदरात काही पडेना गेले आहे.आमच्या बागांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले असून पंचनामे करून शासनाने मदत द्यावी.रोगामुळे बागा सपाट होऊ लागल्या आहेत.दोन दिवसाला फवारणी करत आहोत.बँकांचे भरपूर कर्ज झाले असून आम्हाला नफा पडेना मिळेना गेला आहे.
अवकाळी पावसामुळे फवारण्या मातीत जात आहेत
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना युवा शेतकरी नवनाथ माने यांनी सांगितले की, अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे डाळींबाच्या मुळात पाणी साठून राहिले आहे.ते पाणी वर जाऊन मुळ्या कुजू लागल्या आहेत.मुळातून बारीक किडा झाडावर चढू लागल्याने झाडे जळू लागली आहेत.तेल्या रोगाने डाळींब बागांचे नुकसान होऊ लागले आहे.या रोगामुळे डाळींब फुटल्याने खाली गळून पडली आहेत.डाळींब बागेच्या संवर्धनासाठी आम्ही 7 महिने कष्ट केले असून या 7 महिन्यात आम्ही सर्व फवारण्या केल्या आहेत.दोन ते तीन दिवसाला औषध फवारणी करत होतो.परंतु त्या फवारण्या अवकाळी पावसाने मातीत गेल्या आहेत.
गेल्या वर्षी दीड ते दोन लाख रुपयांचा आर्थिक तोटा
गेल्या वर्षी आम्ही जेवढा खर्च केला होता.त्याच्या निम्मा खर्च यावर्षी अवकाळी पावसामुळे निघाला नाही.शासनाने थोडीफार नुकसान भरपाई द्यावी.आम्ही तिघेजण भाऊ-बहीण असून आमच्या तिघांच्या शिक्षणाचा खर्च वडिलांना झेपवत नाही.त्यासाठी वडिलांनी कर्ज काढले आहे.गेल्या वर्षी व्यापाऱ्याने डाळींबाचा माल नेहला होता.त्यावेळेस व्यापाऱ्याने डाळींबाचे पैसे दिले नसल्याने दीड ते दोन लाख रुपयाला मातीत गेलो आहोत.असे शेतकरी नवनाथ माने याने मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.
शेती कर्ज माफ करण्यात यावे
अवकाळी पावसाने डाळींब बागेचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी व शेती कर्ज माफ करावे. डाळींब बागेचे थोडेफार पैसे मिळाले पाहिजेत.बागेच्या कामासाठी आम्ही मजूर लावले नाहीत.आभाळामुळे डाळींबाच्या झाडांना कळी लागली नाही.जे डाळींब तयार झाले आहे;ते अवकाळी पावसामुळे गळून पडले आहेत.त्यामुळे मार्केटला जास्त डाळींब गेले नाही. गेल्या वर्षी जे नुकसान झाले होते.त्याची थोडीफार नुकसान भरपाई मिळाली आहे.असे माने याने सांगितले.
अवकाळी पावसामुळे मेहनत वाया
अवकाळी पावसामुळे आमची मेहनत वाया गेली आहे.बागेत पावसाचे पाणी साठून राहिल्याने झाडे जळू लागली आहेत.डाळींबासाठी सांगोला शहर प्रसिद्ध असून पावसामुळे डाळींबाचा सर्वनाश होऊ लागला आहे.त्याची थोडीफार नुकसान भरपाई शासनाने द्यावी.एवढेच सरकारला सांगणे आहे. आम्ही जे डाळींब लावले आहे. ते भगवा जातीचे डाळींब आहे.या डाळींबाला मार्केटमध्ये 85 रुपये भाव आहे. पण अवकाळी पावसामुळे डाळींबावर डाग पडले आहेत. त्यामुळे भाव पडले असून 25 ते 30 रुपये विक्री चालू आहे. पावसामुळे बागेत चिखल झाल्याने औषध फवारता येत नाही.त्यामुळे फवारणीसाठी ट्रॅक्टर व माणसांनाही बागेत जाता येत नाही.डाळींब फळावर पावसाचे पाणी साचून राहिले असून उन्हाच्या उष्णतेमुळे पाणी खोलवर जाऊन डाळींब काळे पडू लागली आहेत.असे शेतकरी माने यांनी सांगितले.
शेती तज्ज्ञांच्या मते डाळींब बागांवर शॉट होल बोरर हा रोग पसरू लागला आहे.या रोगातील किडा प्रौढ मादी,झाडाचे खोड,फांदी आणि मुळाच्या उघड्या भागावर छिद्र पाडतात.खोडाच्या आतील भागावर तसेच बाह्य भागावर टाचणीच्या आकाराची लहान छिद्रे आढळून आल्यास तो मुखत्वे शॉट होल बोररचा प्रादुर्भाव समजावा.भुंगेर्यांनी पाडलेल्या छिद्रामध्ये बारीक पिठासारखा भुसा आढळून येतो.मुळे, खोड व फांद्यावरती भुंगेर्यांनी पाडलेल्या छिद्रामुळे झाड सुरुवातीस पिवळे पडते व शेवटी झाड वाळून मृत पावते.
डाळींब पिकांवरील शॉर्ट होल बोरर या रोगावरील उपाय योजना
मर रोग,अति अवर्षणाचा ताण,अति पाऊस,अन्न द्रव्याची कमतरता इत्यादी कारणामुळे झाड कमजोर होते.अशा झाडावर शॉर्ट होल बोररचा प्रादुर्भाव होतो म्हणून डाळींब बाग निरोगी ठेवावी.पोषणतत्वाची स्पर्धा टाळण्यासाठी डाळींब बाग सतत तणमुक्त ठेवावी.प्रादूर्भावास बळी पडलेल्या तसेच वाळलेल्या फांद्या शोधून जाळून टाकाव्यात.म्हणजे भुंगेर्याचा पुढील प्रसार रोखला जाईल.झाड मोठ्या प्रमाणात प्रादुर्भावास बळी पडले असेल तर पूर्णपणे उपटून जाळून टाकावे.फळबागेच्या आत किंवा जवळ प्रादुर्भावित उपटलेल्या झाडांचे ढिग करू नयेत.ते तात्काळ जाळून टाकावेत नाहीतर अशा ढिगाऱ्यात भुंगेर्यांची पैदास होते व ते जवळच्या डाळींब बागेवर हल्ला चढवतात.स्वयंचलित सौर इलेक्ट्रीक प्रकाश सापळे प्रति हेक्टरी 1 अशा प्रमाणात लावावेत.प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ईमामेक्टीन बेंझोयट 5 टक्के (एस.जी.) झाडाचे खोड व फांद्यावरील मोकळ्या भागावर फवारावे.खोडाला लेप देणे (स्टेम पेस्टींग) झाडाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर बहार येण्यापूर्वी व बहार आल्यानंतर झाडाच्या तळापासून 2 फुटापर्यंत खोड व फांद्यावरील मोकळ्या भागावरील पाणी - 10 लिटर + लाल माती - 4 किलो + ईमामेक्टीन बेंझोयट 5 टक्के 20 मिली + कॉपर ऑक्सिक्लाराईड 50 डब्लु पी 25 ग्रॅम
उपचारात्मक उपाययोजना
पहिली ड्रेचिंग - ईमामेक्टीन बेंझोयट 5 (एस.जी.) + प्रॉपकोनँझोल 10 टक्के (एस.सी.) आळवणी - ( 2 ग्रॅम प्रति लिटर + 2 मिली प्रति लिटर पाणी)
दुसरी ड्रेचिंग - पहिल्या ड्रेचिंगनंतर 15 दिवसांनी ईमामेक्टीन बेंझोयट 5 (एस.जी.) + कार्बेडेझम 50 टक्के (डब्लू पी) ( 2 ग्रॅम + 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी ) गोलाकार पद्धतीने 5 ते 10 लिटर द्रावण प्रति झाड
तिसरी ड्रेचिंग - दुसऱ्या ड्रेचिंगनंतर 15 दिवसाची पहिल्या ड्रेचिंगची रसायने घेऊन प्रादूर्भावाची तीव्रता असेल तर तिसरी ड्रेचिंग करावी.
खोड व फांद्यावरती फवारणी (स्टेम स्प्रे) थामोक्झम 25 टक्के डब्लू.पी. 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून खोड व फांद्यांच्या मोकळ्या भागावर फवारणी करावी.