नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करुन एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात आर्थिक मदत वितरित करण्यात येईल." अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.;
राज्यातील अधिवृष्टी आणि गारपिट संकटानंतर अयोध्या दौऱ्यावरून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्यक्ष शेतावर जाऊन भेट दिली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी करण्याचे आदेश दिले. वनकुटे मधील पडझड झालेल्या २२ कुटुंबाना शबरी घरकुल योजनेमधून तत्काळ पक्की घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
पावसाने वनकुटे गावातील घरांची पडझड झाली आहे . कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांसह मका, घास ही चारा पिके जमीनदोस्त झाली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. त्यांच्याशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. त्यानंतर शेतकरी बबनराव रामभाऊ काळे, भागा पायगुडे, बबन मुसळे व बाबाजी मुसळे यांच्या शेतीमधील कांदा, मिरची यासह डाळिंब, संत्रा, आंबे, या फळपिकांच्या नुकसानाची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पहाणी करून झालेल्या नुकसानाची माहिती जाणून घेतली.
वनकुटे ग्रामदैवत मंदिरात शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. सतत पाच दिवस १० मिलीमीटर पर्यंत पडणारा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून समजण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेत आता शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजारांची मदत देण्यात येत आहे. एक रूपयांत पीक विमा काढण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत १० हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. यापुढेही मदत देण्यात येईल.
तातडीने पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने करावे. कांदा पिकांची सातबारावर नोंद नसली, तरी पंचनाम्यात नोंद घेऊन नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी प्रशासनास दिल्या.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबातील दोघांना प्रत्येकी १० किलो गहू व तांदळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी वाटप करण्यात आले.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांनीही यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.
मोर्डा, वाडी बामणी येथे शेतकऱ्यांशी संवाद
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील श्रीमती सीताबाई उत्तम सुरवसे आणि उत्तम सुरवसे या शेतकरी दाम्पत्याच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. दोन एकर क्षेत्रावरील द्राक्ष बाग वादळी पावसाने भुईसपाट झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरवसे दांपत्याची आपुलकीने विचारपूस केली. त्यांना धीर दिला. राज्य शासन आपल्या पाठिशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. सुरवसे यांच्या भुईसपाट झालेल्या द्राक्ष बागेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नुकसानाची पाहणी केली.
धाराशिव तालुक्यातील वाडी बामणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथील बाबासाहेब उंबरदंड आणि साधना उंबरदंड या शेतकरी दाम्पत्याच्या कलिंगड आणि ड्रॅगन फ्रूट बागेच्या नुकसानीची पाहणी केली.