केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या पार्श्वभूमीवर ती कार्पोरेट क्षेत्रांमध्ये नवे बदल घडून येत आहेत. रिलायन्सने गुगुल, फेसबुकबरोबर स्ट्रॅटेजिक भागीदारी का केलीय, ते ही लक्षात घेण्यासारखे आहे. व्हॉट्सअपवरून ऑर्डर दिलेले वाणसामान जिओमार्टमधून मिळणार आहे...जिओमार्टला रिलायन्स फ्रेशमधून पुरवठा होणार आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या पुढे मोठे आव्हान आहे त्याचा आढावा घेतला आहे कृषी अभ्यासक दिपक चव्हाण यांनी...
- रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकी असलेली जिओमार्ट ही ऑनलाईन पद्धतीने किराणा, फळे-भाजीपाला आदी दैनंदिन गरजेच्या वस्तूंची विक्री करणारी कंपनी आहे. डिसेंबर 2019 मध्ये जिओमार्टची स्थापना झालीय. रिलायन्स रिटेल लिमिटेडचा ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्म म्हणजे जिओमार्ट होय. 1.6 लाख कोटींचा वार्षिक विक्री व्यवसाय असणारी रिलायन्स रिटेल ही देशातील रिटेल क्षेत्रातील क्रमांक एकची कंपनी आहे.
- जिओमार्ट देशातील किराणा दुकांनाबरोबर टाय-अप करत आहे. ग्राहक आपल्या जवळपासच्या किराणा दुकानात ऑनलाईन ऑर्डर देईल. किराणावाला थेट आपल्या घरी मालाची पोच करेल. जिओमार्ट भारतात नव्या पद्धतीचे ऑनलाईन टू ऑफलाईन (ओटूओ) पद्धतीचे मॉडेल विकसित करत आहे. अॅमेझॉन, वॉलमार्ट आदींसमोर एक देशी रिटेलर उभा राहताना दिसतोय.
- देशातील लहान ते मध्यम आकाराच्या शहरात रिलायन्स रिटेल्सचे 12000 स्टोअर्स आहेत. यासाठी लागणारा 80 टक्के फळे व भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातोय, असे मुकेश अंबानींनी रिलायन्सच्या 43 व्या सर्वसाधारण सभेत म्हटले आहे. रिलायन्स रिटेल कंपनीने 2006 पासून रिलायन्स फ्रेश सेवा सुरू केलीय. फार्म टू फोर्क मॉडेलनुसार काम चालते.
- गुगल, फेसबुकच्या गुंतवणुकीमुळे सध्या चर्चेत असलेली जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड ही कंपनी 5G सोल्यूशन्स पुरवण्यासाठी सज्ज आहे. सरकारी मान्यतेनंतर 5G नेटवर्क सुरू होईल, तेव्हा शेती सप्लाय चेनसह सर्वच क्षेत्रांच्या विकासाला गती मिळेल.
- शेतीसह एकूणच सप्लाय चेन व्यवस्था मजबूत करण्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन आदींचे महत्त्व आपण जाणतोच. अलिकडेच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या बैठकीतील एआय आणि शेती हा मुख्य विषय होता.
- 'रिलायन्स रिटेल - जिओमार्ट' यांच्या सप्लाय चेनमध्ये जिओ प्लॅटफॉर्मसह गुगुल + व्हॉट्सअपचे काय योगदान असेल ते वरील नोंदीवरून लक्षात येईल. रिलायन्सने गुगुल, फेसबुकबरोबर स्ट्रॅटेजिक भागीदारी का केलीय, ते ही लक्षात घेण्यासारखे आहे. व्हॉट्सअपवरून ऑर्डर दिलेले वाणसामान जिओमार्टमधून मिळणार आहे...जिओमार्टला रिलायन्स फ्रेशमधून पुरवठा होणार आहे.
- मागील तीन-चार वर्षांपासून मुकेश अंबानी शेती क्षेत्रातील अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणुक वाढवत होते. काही स्टार्टअप्स विकतही घेतले आहेत. देशात जागोजागी रिलायन्स फ्रेशचे भाजीपाला-फळे कलेक्शन सेंटर्स उभे राहताना आपण पाहत होतो. दुसरीकडे मुंबईसारख्या शहरात हजारो किराणा दुकाने जिओमार्टशी जोडली जात होती.
- आज, लॉकडाऊन व आर्थिक मंदीतही जिओ प्लॅटफॉर्म कंपनीत डोळे विस्फारणारी परकी गुंतवणुक झालीय. जिओ प्लॅटफॉर्ममधील 25 टक्के हिस्सा 1 लाख 18 हजार कोटींना विकला गेलाय.
रिलायन्स, फेसबुकसारखे कॉर्पोरेट्स एकत्र येऊन आपल्या ताकदीचा गुणाकार करत आहेत. वेगाने बदलणाऱ्या तंत्रप्रगत व्यवस्थेत आपण काय व्हॅल्यू क्रिएट करू शकतो, याबाबत फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्यांना आता प्राधान्याने विचार करावा लागणार आहे.
- दीपक चव्हाण