नील देशमुख : आश्वासक युवासंशोधक
सोळाव्या वर्षी त्याने विचार केला नी आज तो त्यावर काम करतोय.."जगाच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या प्रत्येक मानवाला चांगलं आयुष्य जगता येईल, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून हे जग बदलणं हे माझं स्वप्न आहे, मला हा बदल घडवायचा आहे." हे वाक्य आहे नील नितीन देशमुख या युवासंशोधकाचं, डावकिनाचा रिचा यांनी केलेलं व्यक्ती चित्रण...;
सोळाव्या वर्षी त्याने विचार केला नी आज तो त्यावर काम करतोय.."जगाच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या प्रत्येक मानवाला चांगलं आयुष्य जगता येईल, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून हे जग बदलणं हे माझं स्वप्न आहे, मला हा बदल घडवायचा आहे." हे वाक्य आहे नील नितीन देशमुख या युवासंशोधकाचं, डावकिनाचा रिचा यांनी केलेलं व्यक्ती चित्रण...
हे वाक्य त्यानं उच्चारले तेव्हा त्याचं वय होतं अवघं सोळा वर्षं. किशोरवयीन मुलांमध्ये हा नेहमीचा समज असतो की "जेव्हा जेव्हा पृथ्वीवर काही संकट येतं, तेव्हा मानवाला वाचवायला कोणी सुपरहिरो किंवा दैवीशक्ती समोर येत असते." मात्र याच वयोगटातील नील देशमुखला हे ठाऊक असतं की आजच्या संगणकयुगात कोणती दैवीशक्ती असेल तर ती आहे 'कृत्रिम प्रज्ञा'.
मानवाच्या प्रत्येक अवघड, किचकट कामांमध्ये आपण कृत्रिम प्रज्ञेचा वापर केला पाहिजे यासाठी नील आग्रही असतो. आज नील प्लांटम कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रातील उद्योजक आणि तज्ज्ञ व्याख्याता तर आहेच, याशिवाय त्याचं स्वतंत्र संशोधनदेखील सुरू आहे. आजच्या तरुण पिढी पुढं नील सारखे आदर्श मांडले पाहिजेत.. थेरगाव क्वीनच्या फालतू संवादाचे व्हिडिओ मोठ्ठ्या संख्येने व्हायरल होतात, हिंदुस्तानी भाऊ सारख्या उपट सुंभाला लक्षावधी अनुयायी असतात. कारण या नव्या पिढीपर्यंत चांगले आदर्श पोचले जात नाहीत. खरी हिरोगिरी सोशल मीडियावर धूर काढण्यात नाही… तर आयुष्यात विधायक काही करून दाखवण्यात आहे.
२०१६ मध्ये एक पंधरा वर्षाचा मुलगा अमेरिकेतून भारतात आपल्या आजोबांना भेटायला येतो, आजोबांच्या शेतात पिकावर पडलेली कीड पाहून, आणि त्याचं निवारण करण्यासाठी वापरण्यात येणारी भरमसाट कीटकनाशकं पाहून त्याला प्रश्न पडतो.. एवढ्या कीटकनाशकांची गरज आहे का.. आणि पिकावर नक्की कोणता रोग पडला आहे हे समजण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा वापरता येणार नाही का? त्याला प्रश्न पडतो, आणि उत्तरदेखील तोच शोधतो. यातून जन्म होतो प्लांटमएआय या ॲपचा. आज या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकावरील हजारो रोगांची माहिती तर मिळतेच. शिवाय त्यांचे कीटकनाशक वापरण्याचं प्रमाणदेखील कमी झालं आहे.
अमेरिकास्थित नितीन आणि लिनी देशमुख यांचा नील हा मोठा मुलगा. सर्वप्रथम कृत्रिमप्रज्ञा या विषयाकडं नील नाईलाज म्हणून वळाला होता. घरामध्ये त्याच्या छोट्या भावाच्या दिवसभर खटपटी चालू असतात, या भावापासून आपली रूम आणि त्यातील आपली व्हिडिओगेम कशी सुरक्षित करता येईल याचा विचार करताना त्याने चेहरा ओळखणारं ॲप बनवलं, जेणेकरून जेव्हा त्याचा भाऊ दारासमोर असेल, तेव्हा दार उघडणारंच नाही. घरच्यांचा विरोध पत्करून हे ॲप बनवलं तेव्हा नील केवळ १४ वर्षाचा होता, कृत्रिम प्रज्ञा या विषयात तसा कच्चा लिंबूच होता. मात्र यातूनच त्याला पुढं कृत्रिम प्रज्ञा हा विषय आवडत गेला, आणि जगात अशक्य असं काहीच नाही हा विश्वास देखील त्याला लाभला.
अमेरिकेत पेनसिल्व्हेनिया या राज्यातील मॅकंजी या शहरात नील लहानाचा मोठा झाला. त्याचे आजी आजोबा महाराष्ट्रात राहतात. २०१६ मध्ये तो जेव्हा त्यांना भेटायला आजोळी आला होता, तेव्हा परत जाताना दोन विषय डोक्यात घेऊन गेला. त्याच्या आजीची दृष्टी कमी होत चालली होती. अशा व्यक्तींना आपल्याला कशी मदत करता येईल याचा विचार त्याच्या डोक्यात घोळत होताच. याशिवाय आजोबांच्या शेतीमधील पिकावर रोगानं थैमान घातलं होतं. ग्लोबल वार्मिंगमुळे जगभर ऋतुचक्र वेळापत्रक बिघडलं आहे. या बदलत्या ऋतूचक्रामुळे शेतकऱ्यांना यापूर्वी कधी न भेडसावलेल्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. आणि आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी अधिक हतबल होत आहे. हे चित्र पाहून नील व्यथित झाला.
पुढच्या वर्षी नील पुन्हा भारतात आला, मात्र या वेळेस त्याच्याकडे वरील दोन्ही समस्यांवर उपाय होता. कृत्रिम प्रज्ञेच्या मदतीने या दोन्ही समस्यावर मात कशी करता येईल, याचा विचार करून त्याने दोन ॲप बनवले होते. शेतकऱ्यांसाठी तसेच घरी परसबागेत भाज्या पिकविणाऱ्या लोकांसाठी नीलनं प्लांटमएआय हे ॲप अतिशय उपयुक्त तयार केलं आहे. आपण झाडाचा, रोपांचा फोटो काढायचा, पिकाची स्थिती कशी आहे, पिकावर पडलेला रोग कोणता आहे, पिकाची तहानभूक व्यवस्थित भागली आहे की नाही हे प्लांटमएआय ॲप लगेच ओळखतं आणि त्यावर उपाय देखील सुचवतं.
आज १००० पेक्षा जास्त रोगांची माहिती या ॲपमध्ये असून सध्या प्रायोगिक तत्वावर २७ गावातील ८५०० शेतकरी याचा लाभ घेत आहेत. या प्रयोगात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचीदेखील मदत आहे. माहिती संकलनाचे महत्वाचे काम विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे. खेडोपाडी, दुर्गम ठिकाणी इंटरनेटची सोय नसली तरी हरकत नाही, हे ॲप ऑफलाईन देखील चालतं. फोटो काढताना विशिष्ट कोनातूनच काढलेला असावा किंवा पुरेसा प्रकाश असावा अशीदेखील अट नाही. अगदी अल्पशिक्षित व्यक्तीला देखील हे ॲप वापरता येईल पा पद्धतीने त्याला युजर फ्रेंडली ठेवलं आहे.
पिकांवर वेगवेगळे रोग पडून दरवर्षी साधारण ३० टक्के धान्य वाया जात असतं.. यासाठी भारतामध्ये किटकनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.. त्याचा परिणाम आपल्याला मिळणाऱ्या अन्नावर तर होत आहेच, शिवाय आपला शेतीमाल जागतिक बाजारपेठेत निर्यात करताना देखील खूप अडचणी येतात. शेतीमध्ये फवारलेली भरमसाठ कीटकनाशकं पुन्हा पावसाळ्यात आपल्या जलस्रोत्रात मिसळली जातात, आणि पिण्याचं पाणी देखील दूषित होतं. भविष्यात हे चित्र नक्कीच कमी होईल. आवश्यक तेव्हाच आणि आवश्यक तीच कीटकनाशके, खते आवश्यक तेवढ्याच प्रमाणात वापरली जातील.
'वोकलआईज' या ॲपमध्ये त्याने पूर्णतः किंवा अंशतः अंधत्व आलेल्या व्यक्तींसाठी सहायक म्हणून कृत्रिम प्रज्ञेचा वापर केला होता. या ॲपमध्ये समोरील वस्तूचा फोटो काढला जातो,आणि स्पीकरमधून सांगितलं जातं की समोर नक्की काय आहे. टेडटॉकमध्ये भाषण देताना नील याबाबत अनुभव सांगतो, "जेव्हा या ॲप्सचं पहिलं जाहीर प्रदर्शन होतं, तेव्हा माझ्या मनात थोडी शंका होती, मात्र ॲपने अगदी अचूकपणे समोरील सर्व वस्तू आणि प्राणी ओळखले." आज दृष्टीदोषाची समस्या भेडसावणाऱ्या जगभरातील २५ कोटी लोकांना या ॲपचा फायदा होऊ शकतो. केवळ वस्तूच नाही तर रोज भेटणारी माणसंदेखील हे ॲप ओळखतं, शिवाय समोर ठेवलेला मजकूरही वाचून दाखवतं.
या दोन ॲपबरोबरच नीलनं 'बेमॅक्स' नावाचं उपकरण तयार केलं आहे. अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध असलेलं हे उपकरण कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून आजारांचं निदान करतं. त्यात वापरण्यात आलेल्या अल्गोरिदम तुमच्या लक्षणांचं, त्वचेचं, हृदयाचे ठोके तसेच अनुवंशिक आजारांच्या इतिहासाचं विश्लेषण करून रोगनिदान करतं. पाच मिनिटाची तुमची चाचणी घेतली जाते, आणि १५०० पेक्षा जास्त रोगांपैकी नक्की कोणता/कोणते आजार झाला आहे का? याचं निदान होतं. रोग अधिक गंभीर स्थितीत असेल तर तेदेखील समजतं, जेणेकरून व्यक्ती तातडीनं वैद्यकीय मदत घेऊ शकेल. होऊ घातलेल्या व्यंगांचं निदानदेखील आधीच झाल्यानं त्यावर वेळीच मात करता येते. हे उपकरण ऑफलाइनदेखील वापरता येतं.
याचा डेमो जेव्हा एका विज्ञान स्पर्धेमध्ये नील देत होता, तेव्हा मी लगेच वय बघून आणि तो करत असलेले दावे पाहून तेव्हा एका परीक्षकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला नकार दिला. मात्र जेव्हा या उपकरणाची चाचणी खुद्द त्या परीक्षकांवर घेतली, आणि त्यांच्या दंडावर असलेल्या चट्ट्यामागे कोणता आजार आहे आणि तातडीने त्याचा इलाज करायचा आहे हे त्यांना समजलं तेव्हा त्यांना या उपकरणाचं महत्व पटलं..अर्थात नीलला आपल्या संशोधनावर पूर्ण विश्वास होता, आणि नेहमीच असतो. अगदी आश्वासक पद्धतीने तो आपलं संशोधन जगापुढे मांडत असतो.
नील चांगला संशोधक असण्याबरोबरच कुशल उद्योजक देखील आहे. तो म्हणतो, "तुम्हाला एखादा उद्योग चालू करायचं असेल तर हजारो कारणं तुमच्याजवळ असतील, माझ्याकडं मात्र एकच कारण आहे, मला हे जग बदलायचं आहे." नील प्लांटमएआय कंपनीचा संस्थापक आणि सीईओ आहेच शिवाय वोकलआईज एआय कंपनीचा सहसंस्थापक आहे. एमआयटीमध्ये त्याचं शिक्षण पूर्ण करत असतानाच तो कृत्रिम प्रज्ञा, उद्योजकता, बदलते तंत्रज्ञान यासारख्या विषयावर अनेक कार्यशाळा घेत असतो, व्याख्यानं देत असतो.
कृत्रिम प्रज्ञा हा विषय शिकणं अजिबात अवघड नाही असं नील युवकांना आवर्जून सांगतो. तसेच कृत्रिम प्रज्ञेच्या वाढत्या वापराबद्दल घाबरायचं कारण नाही असं सांगताना तो म्हणतो, " कृत्रिम प्रज्ञा मानवाला पर्याय कधीच होऊ शकणार नाही, ती केवळ मानवाच्या हातातील एक उपकरण आहे, आणि भविष्यात देखील राहील. आजवर नीलचे चार संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत. नीलच्या संशोधनाची दखल राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. गुगल आणि जनरल मोटर्स सारख्या मोठ्या कंपन्यांनीदेखील त्याच्या कार्याचा गौरव केला आहे.
त्याच्या प्लांटमएआय ॲपला २०१९ मध्ये ग्लोरिया 'बॅरन यंग हिरो पारितोषिक' मिळाले आहे. त्याला २०२० मध्ये ग्लोबल टीन लीडर ॲवार्ड तसेच टाईम नियतकालिकाचं यंग इनोव्हेटर पारितोषिक मिळालं आहे. याशिवाय युनायटेड स्टेट प्रेसिडेन्शिअल स्कॉलर, नॅशनल जिओग्रफिक यंग एक्सप्लोरर, कोकाकोला स्कॉलर यासारखे विविध पुरस्कार मिळाले आहेत. इंटेल इंटरनॅशनल सायन्स अँड इंजिनिअरिंग फेअरच्या २०१७ आणि २०१९ वर्षात त्याच्या प्रकल्पांना बक्षीस मिळालं आहे. तेच इंटरनॅशनल बायो जिनियस बायोटेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धेमध्ये देखील त्याच्या प्रकल्पानं पहिलं बक्षीस मिळवलं आहे. याशिवाय त्याला अनेक पुरस्कार, शिष्यवृत्ती मिळाल्या आहेत. आज एका मिटीऑर म्हणजे उल्केला त्याचं नाव देण्यात आलं आहे.
संशोधन, व्याख्यानं आणि त्याने सुरू केलेल्या कंपन्यामध्ये नील व्यग्र असला त्याचं सामाजिक भान जागृत आहे. अमेरिकेत चाललेल्या ब्लॅक लाइव्हज मॅटर चळवळीस तो पाठिंबा देतो, भारतात झालेल्या कृषी आंदोलनास तो पाठिंबा देतो. नुकत्याच मागे घेतलेल्या कृषी कायद्याबद्दल नील म्हणाला आहे, "कायदा हा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असावा, मुठभर भांडवलदारांच्या फायद्यासाठी नाही. आधीच बदलत्या वातावरणामुळं शेती करणं जोखमीचं झालेलं असताना कृषीमालाला किमान आधारभूत किंमतीची हमी तरी दिली पाहिजेच. माझ्या संपर्कात आलेले बहुतेक शेतकरी उदरनिर्वाहाची शेती करतात, त्यांचं वार्षिक उत्पन्न खूप कमी आहे. कायदे बनवताना अशा शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे."
लहान मुलांना योग्य प्रोत्साहन मिळणे गरजेचं असतं. नील देखील कबूल करतो की असे साथ देणारे, प्रेरणा देणारे आईवडील भेटले आहेत म्हणूनच त्याला बरंच काही शक्य झालं आहे, सगळ्यांनाच असे आईवडील मिळत नाहीत. संशोधनात गर्क असलेल्या नीलला कधी कधी वेळेच भान राहत नाही, अगदी रात्री उशीरापर्यंत काम करत बसतो.. आणि म्हणून तर आई-वडिलांची बोलणी खात असतो. आई वडील म्हणतात की नील करत असलेल्या संशोधनाचा आम्हाला अभिमान आहेच, मात्र त्याच्या मोठ्या अंतःकरणाचं, जगाचं भलं करायच्या त्याच्या ध्यासाचं आम्हाला जास्त कौतुक आहे.
"तंत्रज्ञानाचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी व्हायला हवा" हा कृत्रिम प्रज्ञा विषयाकडे पाहायचा नीलचा दृष्टिकोन खूपच आश्वासक आहे. भविष्यात अधिकाधिक समस्यांवर कृत्रिम प्रज्ञेच्या साहाय्याने त्यानं उत्तर नक्की शोधलं असेल. त्याच्याबद्दल हा लेख लिहिताना मला वामनदादा कर्डक यांच्या कवितेची आठवण होत आहे..
माणसा इथे मी तुझे गीत गावे,
असे गीत गावे तुझे हित व्हावे.
मानवाच्या हितासाठी तंत्रज्ञान राबवणं आणि त्याच्या भुकेचं कोडं सोडवणं यापेक्षा सुंदर काव्य कोणतंच नसेल. नीलला त्याच्या पुढील संशोधनासाठी खूप खूप सदिच्छा.. त्याच्या हातून अतिशय सुंदर काव्य रचलं जावं.
जय विज्ञान .. जय तंत्रज्ञान.
#richyabhau
#neil_deshmukh