नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्याची लाखो रुपयांची कमाई

रासायनिक आणि जैविक शेतीला फाटा देत चक्क आधुनिक युगातही माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील शेतकरी प्रमोद इंगळे ( promd Ingale) हे नैसर्गिक पद्धतीने शेती ( natural farming)पिकवत असून हे फायदेशीर प्रयोगाचा प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट...;

Update: 2022-06-14 05:30 GMT

जागतिकीकरणाचा ( globalization) सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला असताना त्याला शेती क्षेत्र ही अपवाद राहिले नाही. या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. कमी वेळात जास्त पैसे मिळवून देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्याचा कल वाढला असून त्यामुळे शेती क्षेत्रात रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे. याच कारणाने जमिनी नापीकतेकडे झुकल्या असून त्यांचा पोत कमी होत चालला आहे. या रासायनिक खतांच्या अती वापराचा परिणाम भाजीपाला आणि धान्यावर झाला असून परिणामी हे अन्न मानवाने ग्रहण केल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. रासायनिक खतापासून तयार झालेली फळे आणि भाजीपाला खाल्ल्याने लोकांच्या पोटात दररोज विष जात असल्याचे तज्ञ सांगतात. या रासायनिक शेतीतून जरी लाखो रुपयांची कमाई होत असली तरी त्याचे परिणाम ही गंभीर होत आहेत. त्यामुळे लोकांचा कल सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या फळे,भाजीपाला आणि धान्य खरेदीकडे वाढला आहे. या पद्धतीच्या फळांना आणि भाजीपाल्याला बाजारात चांगली मागणी आहे.

रासायनिक आणि जैविक शेतीला फाटा देत चक्क आधुनिक युगातही माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील शेतकरी प्रमोद इंगळे हे नैसर्गिक पद्धतीने शेती पिकवत असून ते गेल्या अनेक वर्षापासून देशी गाईंचे गोमूत्र आणि शेणखताचा वापर करून द्राक्ष बाग पिकवत आहेत. या बागेत आलेले गवत देखील ते काढत नाहीत. या बागेवर आणि गवतावर कोणत्याही रासायनिक औषधांची फवारणी केली नाही. या गवताचा बागेला फायदा होत असून विशेष म्हणजे त्यांनी अत्यंत खडकाळ माळरानावर द्राक्ष बाग फुलवली आहे. या बागेवर जनावराच्या गोमुत्राच्या फवारण्या केल्या जातात. बागेवरील रोगांचे नियंत्रण होण्यासाठी त्यांनी बागेत तुळस,झेंडू यासह अनेक गवताची लागवड केली आहे. त्यामुळे ह्युमस तयार होऊन जमीन भुसभुशीत होण्यास मदत झाली असून त्यांच्या बागेत बारा ही महिने गांडूळ दिसून येतात. त्यांच्या या नैसर्गिक द्राक्ष बागेच्या देखभालीसाठी वर्षाकाठी 81 हजार रुपये खर्च येत असून त्यांना दीड एकर बागेच्या विक्रीतून वर्षासाठी 5 लाख रुपयांचा फायदा होत आहे. त्यांच्या बागेत तयार झालेला नैसर्गिक बेदाणा पुणे,मुंबई. उस्मानाबाद,सोलापूर,नांदेड,लातूर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने विकला जात असून ग्राहकांना बेदाणा कुरिअर ने पाठवला जात आहे.

द्राक्ष बाग छाटणीच्या वेळेस झाडांना दिले जाते घन जीवामृत

शेतकरी प्रमोद इंगळे यांनी द्राक्ष बाग खडकाळ जमिनीवर पिकवली आहे. द्राक्षाची झाडे लावत असताना त्याला माणिक चमन व्हरायटीचे कलम करून या झाडांना दर 10 दिवसाला 1 लिटर जीवामृत देत आहेत. द्राक्ष बागेची वर्षातून दोन वेळेस छाटणी होते. पहिली एप्रिल महिन्यात आणि दुसरी ऑक्टोबर महिन्यात होते. त्यावेळेस देशी गाईच्या शेणापासून बनवलेले घन जीवामृत प्रती झाड दोन किलो टाकले जाते. या झाडांना सेंद्रिय किंवा रासायनिक खतांचा उपयोग केला जात नाही.

कीड नियंत्रणासाठी अग्नी अस्त्र,ब्रम्ह अस्त्राची केली जाते फवारणी

बागेवरील कीड नियंत्रणासाठी अग्नी अस्त्र आणि ब्रम्ह अस्त्रची फवारणी केली जाते. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी सप्त कडधान्य अंकुर येइपर्यंत भिजू घातले जाते. त्यानंतर पाट्यावर त्याला वाटून बारीक केले जात असून हे बारीक केलेले अन्नद्रव्य 200 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम घेवून झाडांवर फवारले जाते. त्यामुळे अन्नद्रव्याची कमतरता भरून निघते. जीएसाठी नारळ पाण्याचा वापर केला जातो. पण याचे जास्त स्प्रे घेतले जात नाहीत. कीड नियंत्रणासाठी झाडांवर सप्त अंकुर,नारळ पाणी,देशी गाईचे दूध याचे मिश्रण करून फवारण्या केल्या जात आहेत.




 


कीड नियंत्रणासाठी बागेवर अमावस्या आणि पौर्णिमेला निमास्त्र आणि दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान किडींचा अंडी घालण्याचा काळ असतो. त्यामुळे या काळात झाडांवर दशपर्णी अर्क आणि निमास्त्र याची फवारणी केली तर बऱ्यापैकी अंडी गंड होतात. त्यामुळे त्यातून पिल्ल बाहेर पडत नाहीत. शिल्लक राहिलेल्या अंड्यातून पिल्ल अष्टमीच्या दरम्यान बाहेर पडतात. त्याकाळात बागेवर आलटून पालटून अग्नी अस्त्र,ब्रम्ह अस्त्र आणि दशपर्णी अर्क फवारले जाते. त्यामुळे राहिलेली पिल्ल विकलांग होतात. त्यांची होणारी उत्पती थांबली जाते म्हणून अमावस्या,पौर्णिमा आणि अष्टमीला फवारण्या न चुकता शेतकरी प्रमोद इंगळे करत आहेत.

च जीवामृत आणि ताकाची केली जाते फवारणी

बागेवर चतुर्थी आणि द्वादशीला देशी गाईचे आंबट ताक आणि जीवामृताची फवारणी केली जाते. देशी गाईच्या आंबट ताकाचा संजीवक म्हणून वापर केला जातो. तर जीवामृत मध्ये शेण,गोमूत्र,गूळ,बेसन याचे मिश्रण असते. यापासून नत्र द्रव्याची कमतरता भरून काढली जाते. जीवामृताची फवारणी एखाद्या झाडांवर केली तर त्या झाडांच्या पानांचा आकार वाढतो. पानाचा आकार वाढल्याने प्रकाश संशलेशनाची प्रक्रिया वेगाने वाढते. त्यामुळे अन्न निर्मिती होण्यास मदत होत असून बागचे सरासरी उत्पन्न वाढले जाते.

द्राक्ष बागेतील गवत काढले जात नाही

या द्राक्ष बागेतील गवत हे सहजीवन असल्याचे शेतकरी सांगतो. प्रत्येक वनस्पतीत वेगवेगळी अन्नद्रव्य असतात. जे गवताला लागते ते बागेला लागत नाही आणि जे बागेला लागते ते गवताला लागत नाही. या बागेत गवताचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये चवळी,तुळस आणि झेंडू याचा समावेश आहे. चवळी ही बागेसाठी उपयोगी असून ती नत्र स्थिरीकरनाचे काम करते. या चवळीची फुले आणि पाने मित्र किड्यांना आकर्षित करण्याचे काम करतात. हवेत 78 प्रकारचे नत्र द्रव्य असून त्याचा डायरेक्ट पिकाला उपयोग होत नाही. त्याची एक यंत्रणा असते. त्यामध्ये एकदल आणि द्वीदलिय वनस्पतींचा समावेश असतो. एकदल वनस्पतीमध्ये झाडांच्या मुळावर लहान गाठी असतात. त्यामध्ये नत्र द्रव्य असते. हवेतील नत्र जमिनीत सोडण्याचे काम या वनस्पती करतात.

तुळस आणि झेंडूमुळे बागेचे होते संरक्षण

या द्राक्ष बागेत मोठ्या प्रमाणात तुळशीची झाडे आहेत. तुळस ही चोवीस तास ऑक्सिजन देणारी वनस्पती असून या झाडाच्या मंजुळा आणि पाने मित्र किड्यांना आकर्षित करण्याचे काम करतात. त्यामुळे बागेतील रोग किड्यांचे मोठ्या प्रमाणात नियंत्रण होते. तर या बागेतील देशी झेंडूची झाडे आणि फुले मधमाशाना आकर्षित करतात. झेंडूच्या मुळातून एक विशिष्ट प्रकारचा स्त्राव जमिनीत सोडला जातो. या स्त्रवाचा बागेला चांगला फायदा होत आहे.

बारा महिने बागेत दिसतात गांडुळांच्या हालचाली




 


मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी प्रमोद इंगळे यांनी सांगितले,की या बागेतील गवत कुजवले जाते. त्यामुळे त्यातून ह्युमसची निर्मिती होते. गांडुळांच्या हालचाली होण्यासाठी अंधाराची गरज असते. त्यामुळे या बागेतील कुजलेल्या गवताला वर्षातून दोन वेळेस झाकून टाकले जाते. जनावरांच्या मागील जो काडी कचरा असतो तोही बागेतील झाडांना टाकला जातो. तसेच तुरी, उडीत, मूग याचे भुसकट बागेत टाकले जात असून त्यावरही आच्छादन केले जाते. त्यामुळे जमिनीवर अंधार होवून या बागेत बारा महिने गांडुळांच्या हालचाली दिसतात. या बागेतून सरासरी 12 ते 13 टनाच्या आसपास द्राक्षे निघत असून ती बाजारात 70 ते 80 रुपये किलोने विकली जाते तर राहिलेल्या द्राक्षेचा बेदाणा तयार केला जातो. बेदाणा वाळवत असताना त्यावर गंधक वगैरे टाकले जात नाही. त्याला उन्हात वाळवले जाते. बेदाणा पूर्ण वाळण्यासाठी 29 दिवसाचा कालावधी लागत असून तो नैसर्गिक रीत्या तयार होतो. त्याला पुणे,मुंबई,सोलापूर,उस्मानाबाद,नांदेड या ठिकाणावरून मागणी असून तो ग्राहकाना कुरिअर द्वारे पाठवला जातो. या नैसर्गिक द्राक्षेच्या देखभालीसाठी वर्षाकाठी 81 हजार रुपये खर्च आला असून तिच्या उत्पन्नातून वर्षाला 5 लाख रुपयांचा फायदा झाला आहे.

Full View

Tags:    

Similar News