मान्सून पुन्हा सक्रिय; दहा दिवस विलंबाने पोहोचला तेलंगणात..

दहा दिवस विलंबाने पोहोचला तेलंगणात; महाराष्ट्रात, इतर राज्यात केव्हा होणार आगमन..

Update: 2023-06-21 11:49 GMT


बिपरजॉय चक्रीवादळामुळे कमजोर पडलेला मान्सून अखेर पुन्हा सक्रिय झाला आहे. दहा दिवस विलंबाने आता मान्सून तेलंगणात पोहोचला आहे महाराष्ट्रात, इतर राज्यात केव्हा होणार आगमन, ते आपण जाणून घेऊया. भारतीय हवामान खात्याचे (IMD) मान्सून ट्रॅकर (Monsoon Tracker) आता नैऋत्य मोसमी पाऊस आणखी पुढे सरकत असून “आयएमडी’ने आता महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

भारताच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत हलका आणि काही भागात गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. देशातील अनेक भागात आता विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिण द्वीपकल्पीय भारतातील आणखी काही भाग, ओडिशाचा काही भाग, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

दिल्लीत पावसाला सुरुवात

आज सकाळी दिल्लीच्या काही भागात हलका पाऊस झाला. त्यामुळे दिल्लीकरांना कडाक्याच्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. प्रादेशिक हवामान अंदाज केंद्राने (RWFC) दिल्लीलगतच्या काही भागात हलका ते मध्यम तीव्रतेचा पाऊस आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज, 21 जून रोजी, दिल्ली परिसरात 30-40 किमी प्रति तास वेगाने हलका ते मध्यम तीव्रतेचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहू शकेल, असे ट्विट RWFC ने केले आहे.

हिमाचल प्रदेशात यलो अलर्ट

हिमाचल प्रदेशातील हवामान खात्याने 21 ते 24 जून दरम्यान बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि पहाडी प्रदेशात काही ठिकाणी हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. 24 जून रोजी हिमाचल प्रदेशात मान्सून तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

ईशान्य आणि पूर्व भारत :

IMD ने 19-21 जून दरम्यान हिमालयीन प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

21 आणि 22 जून रोजी बिहार, झारखंडमध्येही एकाकी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 19, 21 आणि 22 जून रोजी पश्चिम बंगाल आणि 21-23 जून दरम्यान ओडिशात पावसाला सुरुवात होईल.

वायव्य आणि लगतचा मध्य भारत :

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांत उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

22 आणि 23 जून रोजी उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दक्षिण भारत :

IMD ने 19-21 जून दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.3 जूननंतर महाराष्ट्राच्या घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता

मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने याआठवड्याच्या शेवटी महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या अपेक्षित पुनरुज्जीवनाचा 23 जूननंतर पुण्याच्या आसपासच्या धरण पाणलोट क्षेत्रांना फायदा होण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.

IMD पुणेचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, “मान्सून 23 जूननंतर पुनरुज्जीवित होण्याची अपेक्षा आहे. कोकणातील बहुतांश भागांमध्ये आणि पुणे शहरालगतच्या घाट भागात 23 ते 26 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25 जून रोजी पुण्याच्या आसपास घाट भागांसाठी अलर्ट दिले जाण्याची शक्यता आहे. पुणे शहर परिसरात त्या कालावधीत फक्त हलका ते मध्यम पाऊस पडेल.”

कश्यपी म्हणाले की, मान्सूनच्या पुनरुज्जीवनामुळे पुणे जिल्ह्यातील शहर आणि घाट भागातील कोरड्या जमिनीचे पुनर्भरण होण्यास मदत होईल. 24 जूनपासून किमान काही दिवस, पुण्याच्या आसपासच्या धरण पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस पडू शकतो. पश्चिमेकडील वारे आता हळूहळू बळकट होत आहेत आणि उत्तर महाराष्ट्रावर ऑफशोअर ट्रफ तयार होण्याची शक्यता आहे. सह्याद्री पर्वतरांगांवर दाब (प्रेशर ग्रेडियंट)निर्माण होऊन कोकणातदेखील या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

27 जूनपासून धरणाच्या पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात वाढ होऊ शकेल. मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो.

दक्षिण कोरियातील जेजू नॅशनल युनिव्हर्सिटीतील टायफून रिसर्च सेंटरचे हवामान संशोधक विनीत कुमार सिंग यांनी सांगितले, की पुणे घाटांवर 25-26 जून रोजी सुमारे 40-50 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 27-28 जून रोजी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. लोणावळा, खंडाळा आणि ताम्हिणी येथे 27 आणि 28 जून रोजी 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. सततच्या मुसळधार पावसाची शक्यता नसल्यामुळे धरणे लगेच भरू शकत नाहीत. मात्र, काही अंशी पाणी पातळीत वाढ होऊ शकेल.

पश्चिमी वारे वाहू लागले आहेत आणि आम्हाला आशा आहे की ते त्यांचा जोर वाढेल आणि मान्सूनचा पाऊस लवकरच बरसेल. २३ जूनपर्यंत शहरात पाऊस पडेल, अशी आशा आम्हाला आहे, असं IMD मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितलं. पण, मुसळधार पावसाला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. २७-२८ जूनपर्यंत मुंबई शहरात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे, असंही IMD अधिकाऱ्यांनी सांगितले.


Tags:    

Similar News