मनसे आता शेतकऱ्यांच्या पाठीशी
बोगस बियाण्यांच्या विक्रीवर कृषी विभागाने कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे.
नागपुरात सुरू असलेल्या बोगस बियाण्याच्या विक्रीवर दोन दिवसात कारवाई केली नाही तर मनसे आपल्या स्टाईलने दुकानात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना निवेदन देत कारवाईची मागणी मनसेकडून करण्यात आली. यावेळी आयुक्त कार्यालयासमोर मनसेतर्फे जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. मोठ्या प्रमाणात उगवण क्षमता नसलेलं बियाणं कृषी विभागाच्या कृषी केंद्रांमध्ये विकले जात आहे. त्यामुळे बियाणं पेरल्यावर उगवत नसल्याने शेतकऱ्यांचं मात्र नुकसान होत आहे. हा सगळा प्रकार कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहित असून सुद्धा आर्थिक व्यवहारांमुळे कारवाई होत नसल्याचाही आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांनी केला आहे.