हे आहे आंब्याच्या सघन लागवडीचं जुगाड

पारंपारिक शेतीला पर्याय आहे का? वैज्ञानिक दृष्टी स्वीकारली तर नक्कीच आहे. माळरानावरील पडीक फळबाग लागवडीखाली घेतली. आंब्याची लागवड करताना केशर निवडला त्यामध्येही इजरायली पद्धतीने सघन पद्धतीची लागवड केली. पाहूयात कृषी पदवीधर शिक्षक आणि प्रगतिशील शेतकरी तुषार आहेर यांच्या प्रयत्नांचा ग्राउंड रिपोर्ट फक्त मॅक्स किसानवर...;

Update: 2023-08-20 02:30 GMT

काय आहे सगन आंबा लागवडीचे तंत्रज्ञान

Full View

सघन पद्धतीने आंब्याची लागवड ५ × ५ किंवा ५ × ६ मीटर अंतराने करण्यात येते. त्यामुळे एकरी चार पट झाडांची संख्या वाढते. झाडांची संख्या वाढल्याने ४ ते ५ वर्षांत एकरी ३ ते ४ टन उत्पादन घेणे शक्य होऊ लागले. आठ वर्षांच्या बागेपासून हेच उत्पादन ६ ते ७ टनांपर्यंत पोचू शकते. आपल्याकडे अतिघन पद्धतीने लागवड शक्य आहे. ती लागवड करताना चौरस पद्धतीने न करता आयताकृती पद्धतीनेच करावी. म्हणजे एकीकडून अति कमी अंतर ठेवावे, तर दुसरीकडून सर्वसाधारण अंतर ठेवावे. दक्षिणोत्तर ओळी झाल्यास दिवसभर कलमांना उन्हाचा चांगला फायदा होतो. अतिघन लागवडीमध्ये झाडाचा घेरनियंत्रित ठेवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने छाटणी, तसेच वाढरोधकांचा वापर इ. बाबींचा वापर करावा लागतो.

अतिघन लागवडीचे फायदे

- ठराविक क्षेत्रातून अधिक उत्पादन. झाडे लहान असल्याने फळांची विरळणी, फवारणी, छाटणी, आंतरमशागत इ. कामे करणे सोपे होते.

- आंबा फळे झेल्याऐवजी हाताने व्यवस्थित काढता येतात.

- फळांची निर्यातयोग्य गुणवत्ता येण्यासाठी सहज उपाय करता येतात.

- दोन ओळींत अंतर असल्याने फवारणी, खते देणे, आंतरमशागत तसेच फळांची अंतर्गत वाहतूक इ. कामे ट्रॅक्टरने सहज करता येतात.

अतिघन लागवड पद्धत नाली खोदणे

आंबा लागवडीसाठी साधारणतः १ बाय १ बाय १ मीटरचा खड्डा खोदून भरून घेणे आवश्यक असते. मात्र अतिघन लागवडीत दोन झाडांतील अंतर अतिशय कमी असल्याने जेसीबी यंत्राने एक मीटर रुंद व एक मीटर खोल नाली खोदून घ्यावी. जमीन हलकी असेल तर ६० टक्के गाळ आणि ४० टक्के नालीतील मुरमाड माती अशा मिश्रणाने भरून घ्यावी.

नाली भरताना जेथे कलम लावायचे आहे, त्या ठिकाणी दोन टोपले शेणखत एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शिफारशीत कीडनाशक पावडर मिसळून भरून घ्यावा. चांगला पाऊस पडून किंवा पाणी देऊन भरलेली मोकळी माती दाबल्यानंतर कलमांची किंवा इनसीटू पद्धतीने लागवड करावी.

लागवडीच्या ठिकाणी कलमाची पिशवी बसेल असा लहानसा खड्डा खणावा. त्यामध्ये ५०० ग्रॅम लिंबोळी पेंड, २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा, २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धक मिसळून कलम लागवड करावी.

आच्छादनाचा वापर

अतिघन लागवड केलेल्या बागेत दरवर्षी कलमाखालील संपूर्ण सावलीत उसाचे पाचट, वाळलेले गवत, साळीचे तणसाचे आच्छादन करावे. आच्छादन करताना त्यात शिफारशीत कीडनाशक पावडर धुरळावी. जेणेकरून वाळवीचा त्रास होणार नाही. सेंद्रिय पदार्थ नसल्यास प्लॅस्टिकचे आच्छादन करावे.

वारा प्रतिबंधक झाडांची लागवड

कलमांना हिवाळ्याच्या शेवटी फळधारणा सुरू होते. फळांची संपूर्ण वाढ ही भर उन्हाळ्यात होते. या काळात ऊन तसेच गरम हवेपासून बाग व फळांचे संरक्षण करण्यासाठी बागेभोवती सुरू, महागणी या उंच वाढणाऱ्या वाराप्रतिबंधक वृक्षांची लागवड करावी.

कलमांना वळण

लागवडीनंतर कलमांना शिफारशीप्रमाणे खत, पाणी द्यावे. प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीड, रोगनियंत्रण करावे. कलम दीड ते दोन फूट उंचीचे होईपर्यंत एकच खोड राहू द्यावे. नंतर शेंडा मारावा. त्या ठिकाणाहून ३ ते ४ फांद्या निघतील. त्यातील चांगल्या व भरघोस वाढलेल्या तीन फांद्या ठेवाव्यात. परत या फांद्यांचा दोन ते तीन पेरानंतर शेंडा मारावा. अशाप्रकारे कलमांचा सांगाडा तयार करून घ्यावा. सांगाडा तयार झाल्यानंतर तिसऱ्या वर्षाच्या सुरवातीला कलमांची चांगली वाढ होऊन भरपूर मोहोर येतो. योग्य खत व पाणी व्‍यवस्‍थापन केल्‍यास तिसऱ्या वर्षी व्यापारीदृष्ट्या फळांचे चांगले उत्पादन मिळू शकते.

Tags:    

Similar News