पीक वाचवण्यासाठी आवर्तन सोडा; पंढरपूर सातारा रोडवर शेतकर्यांचा रास्तारोको
सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील पश्चिम भागातील गावांमधील पिके पाण्यावाचून करपु लागली आहेत, शेतकऱ्यांसमोर आपली हिरवी पिके तसेच जनावर जगवणे मोठी समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळेच या भागातील शेतकरी पाण्याच्या आवर्तनासाठी आक्रमक झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील पश्चिम भागातील पंढरपूर-सातारा रोडवर गादेगाव सातारा नाला येथे शेतकर्यांकडुन शेती पिकाला 3-डी कालव्यामार्फत पाण्याचे आवर्तन सोडले जावे या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केलं.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांसह शेतकर्यांनी आंदोलन केलं.स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी, यावेळी बोलताना प्रशासनाने शेतकरी प्रश्नांवर गांभीर्य बाळगावे व पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देऊन पिके व पशुधन वाचवण्याचे काम करावे, शेतकऱ्यांसमोर असलेल्या या भीषण संकटात प्रशासनाने शेतकरी हिताची भुमिका न घेतल्यास येत्या काळात आक्रमक आंदोलन करू, असा इशारा दिला.
शेतकरी नेते समाधान फाटे यांनी बोलताना सांगितलं की आजपर्यंत प्रत्येक वर्षी या प्रश्नांवर आम्हाला आंदोलने करावी लागतात, उपोषण करावे लागते तरीही प्रशासन सुस्त आहे, तालुक्यातील लोकप्रतिनिधी आपले कर्तव्य विसरलेत, त्यांना जनतेचे काही पडलेले नाही, जनता देखील त्यांना भविष्यात बेदखल निश्चीत करेल, आम्ही कालवा सल्लागार समितीचा धिक्कार करतो, समितीने पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा ईशारा दिला.
यावेळी बोलताना शिवसेना युवासेनेचे रणजित बागल यांनी लोकप्रतिनिधींना धारेवर धरत पाण्याच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी चकार शब्द काढत नाहीत अशा निष्क्रिय लोकप्रतिनिधींना जनता पाणी पाजल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, आगामी काळात सर्वांनी मिळुन ही पाण्याची लढाई लढुया व हक्काचे पाणी मिळवुया असे आवाहन केले. विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांसह गादेगाव, उपरी, वाखरी, भंडीशेगाव, खेडभाळवणी, पळशी, शेळवे, यांसह इतर गावातील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.