श्रमांच्या चोरीची गोष्ट :डॉ.रुपेश पाटकर

कापूस कसा बनतो?""कापसाचे बीज + जमीन, पाणी, खते वगैरे + शेतकर्‍याचे श्रम." नुकतेच इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी 70 तास आठवड्याला कामाचा मुद्दा मांडला आणि श्रमाच्या मूल्याची आणि चोरीची चर्चा सुरू झाली त्याला उदाहरणाच्या माध्यमातून उलगडून दाखवला आहे डॉ.रुपेश पाटकर यांनी..

Update: 2023-11-01 05:46 GMT

कामगार चळवळीत आमचे एक मित्र सक्रिय आहेत. त्यांचे नाव सुकुमार दामले. गम्मत म्हणजे त्यांनी IIT मधून इंजिनिअरिंग केलेय. पण लठ्ठ पगाराची नोकरी सोडून सुमारे ४० वर्षापूर्वी ते कामगार चळवळीत आले. उच्च शिक्षण, गाढा अनुभव असतानादेखील ते अतिशय साधे आहेत. त्यांच्याशी कोणीही सहज बोलावे. प्रश्न विचारावेत. ते सहजपणे समजावून देतात. ते कम्युनिस्ट चळवळीत असल्यामुळे त्यांना आम्ही कॉम्रेड म्हणतो. त्यांच्यासोबतच्या चर्चेचा हा एक किस्सा!

-

माझ्या मित्राचे म्हणणे कॉम्रेड कसे खोडून काढेल, याबाबत मला उत्कंठा लागून राहिली होती. कॉम्रेडकडे याचे निश्चित उत्तर असेल याची मला खात्री होती. दोन-तीन दिवसांनी कॉम्रेडशी बोलायला मी त्याच्या ऑफिसात गेलो. नेहमीप्रमाणे दिलखुलास हसून कॉम्रेडने माझे स्वागत केले. त्यालाही मागच्यावेळची चर्चा पूर्ण करण्यात रस असल्याचे मला जाणवले. मी गेल्या गेल्या तो म्हणाला, "बरं झालं तू आज आलास. त्यादिवशी आपलं बोलणं अर्धवट राहीलं. कोणताही मुद्दा अर्धवट राहू नये. नाहीतर अभिमन्यूसारखे व्हायचे. चक्रव्यूहात शिरायचे कसे ते कळले, पण बाहेर कसे पडायचे ते कळले नाही."

"हो कॉम्रेड, मी मुद्दामच त्यासाठी आलोय," मी म्हणालो. माझा इंटरेस्ट पाहून त्याला खूप समाधान वाटले.

"मित्रा, तुझा तो मित्र म्हणाला होता की भांडवलदार भांडवल गुंतवतो, म्हणून नफा घेण्याचा त्याला अधिकार आहे," काॅम्रेड म्हणाला.

"होय काॅम्रेड!"

"आपण त्याच्या म्हणण्याची तपासणी करूया. मला सांग भांडवल म्हणजे काय रे?" त्याने विचारले.

"भांडवल म्हणजे पैसा," मी म्हणालो.

"बरं, मग पैसा म्हणजे काय?"

"नोटा, नाणी," मी.

"नोटा आणि नाणी म्हणजे काय?"

"ज्याच्या बदल्यात वस्तू मिळतात ते," मी.

"कागदाच्या नोटा किंवा नाण्यांच्या बदल्यात वस्तू का मिळतात?"

"काॅम्रेड, मी कधी याचा विचारच केला नाही," मी म्हणालो.

"ठिक आहे. आता विचार कर. पैसे दिले की पैशांच्या किमतीएवढ्या वस्तू मिळतात. आता मला सांग वस्तूची किंमत कशी ठरते?"

"ज्या त्या वस्तूची जशी किंमत असते, त्यावरून," मी.

माझ्या उत्तरावर कॉम्रेड हसला आणि म्हणाला, "चॉकलेटची गोळी एक रुपयाला मिळते. मोबाईल हँडसेट पाच हजार रुपयांना मिळतो. बाईक सत्तर हजारांना मिळते. या किमती कशा ठरतात? समजा दुकानदाराने चॉकलेटच्या गोळीची किंमत पाच हजार रुपये सांगितली, तर तू घेशील का?" कॉम्रेडने विचारले.

मला हसू आले. मी म्हणालो, "दुकानदाराला वेड लागले तरंच तो इतकी किंमत सांगेल."

"पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीस की वस्तूची किम्मत कशी ठरते?"

"नाही सांगता येत कॉम्रेड," मी म्हणालो.

"ठीक आहे. समजा तू नदीवर गेलास आणि नदीतील ओंजळभर पाणी घेतलेस आणि प्यायलास तर तुला पैसे द्यावे लागतील का?" कॉम्रेडने विचारले.

"छे काॅम्रेड, नदीतील पाण्याचे कसले पैसे आणि ते देणार तरी कोणाला? नदी नैसर्गिक आहे. तिथे ओंजळभर पाणी प्यायलो काय किंवा आंघोळ केली काय किंवा कपडे धुतले काय, ते सगळे मोफत."

"हं. पण समजा, तुला तुझ्या घरी पिण्यासाठी, आंघोळीसाठी, स्वयंपाकासाठी पाणी हवं. म्हणून दुसर्‍या कोणाला तू तुझ्या घरी पाणी आणून द्यायला सांगितलंस तर ते पाणी तुला फुकट मिळेल का?"

"छे. ते पाणी आणून देणार्‍याला मला काहीतरी द्यावे लागेल," मी म्हणालो.

"का?" काॅम्रेडने विचारले.

"त्याने पाणी आणण्याचे कष्ट केले म्हणून," मी म्हणालो.

"म्हणजे तू पाण्याचे नव्हे, घरी घेऊन येण्याच्या कष्टासाठी त्याला काही देशील, बरोबर ना?" त्याने विचारले.

"हो."

"म्हणजे मुल्य कष्टाचे असते, नैसर्गिक वस्तूचे नाही!" कॉम्रेड म्हणाला.

कॉम्रेडचे म्हणणे मला थोडे थोडे पटले. मी त्याला तसे म्हंटले देखील.

त्यावर तो म्हणाला, "आपण दुसरे उदाहरण घेऊ. तू अंगात घातलेला शर्ट विचारात घेऊ. कशापासून बनलाय तुझा शर्ट?"

"कापडापासून," मी म्हणालो.

"शर्ट बनवायला कापडाशिवाय आणखी कोणकोणत्या गोष्टी लागतात?" कॉम्रेडने विचारले.

"शिलाई मशीन, दोरा, बटणे आणि काॅलर," मी म्हणालो.

"आपण कापड आणि या गोष्टी घेतल्या आणि एका जागी ठेवल्या तर शर्ट तयार होईल का?"

"शिंपी देखील हवा!" मी म्हणालो.

"हं. म्हणजे वस्तू व कष्ट हवेत. या वस्तू दोन प्रकारच्या असल्याचे लक्षात आले का तुझ्या? एक प्रकार म्हणजे कच्चा माल. शर्टाच्या बाबतीत कापड, दोरा, बटणे, काॅलर हा कच्चा माल आणि दुसरा प्रकार म्हणजे अवजारे. शर्टाच्या बाबतीत शिलाई मशिन हे अवजार. आता मला सांग कापड कसे बनले?"

"कापड कापसापासून."

"फक्त कापसापासून? कापूस टोपलीत ठेवून दिला तर कापड तयार होईल का?"

"नाही. कापसापासून दोरा बनवावा लागेल. दोऱ्यापासून कापड."

"मग दोरा टोपलीत ठेवून दिला तर कापड तयार होईल का?" कॉम्रेडने विचारले.

"कॉम्रेड, तुम्ही असे फालतू प्रश्न का विचारताय? एखादी वस्तू नुसती टोपलीत ठेवून दिली तर तिच्यापासून दुसरी वस्तू कशी काय बनेल? हे तर मतिमंद देखील सांगेल," मी म्हणालो.

"मित्रा, वैतागू नकोस. हे वाटते तेवढे सहज लक्षात येत नाही. म्हणून मी असे प्रश्न विचारतोय. थोडं सहन कर," काॅम्रेड म्हणाला.

मी होकारार्थी मान डोलावली.

"दोऱ्यापासून कापड बनवण्यासाठी 'माग' हवा. आणि तो 'माग' चालवण्यासाठी विणकर हवा. म्हणजे दोरा + माग + विणकराचे कष्ट.

आता सांग, दोरा कसा बनतो?" त्याने विचारले.

"कापूस + चरखा + चरखा चालवणार्‍या माणसाचे कष्ट." मी म्हणालो.

कॉम्रेड हसला आणि म्हणाला, "आता सांग कापूस कसा बनतो?"

"कापसाचे बीज + जमीन, पाणी, खते वगैरे + शेतकर्‍याचे श्रम," मी म्हणालो.

"जमीन कशी बनली?" त्याने विचारले.

"ती नैसर्गिक असते. ती कोणी बनवली नाही," मी म्हणालो.

त्यावर कॉम्रेड म्हणाला, "तू कोणतीही वस्तू घे आणि ती कशापासून बनली, ते शोधत शोधत मागे जा. शेवटी तुझ्या लक्षात येईल की 'नैसर्गिक पदार्थ आणि कष्ट' या दोनच गोष्टींपासून ती बनली आहे. मघाशी आपण शर्टापासून मागे गेलो. तू त्यातील शिलाईमशीनचे उदाहरण घेऊन मागे जा. शेवटी तू खाणीतल्या लोखंडापर्यंत पोचशील. म्हणजे 'नैसर्गिक पदार्थ आणि कष्ट' हेच घटक तुला मिळतील. जगात ज्या ज्या म्हणून वस्तू आहेत, त्या त्या सर्व 'नैसर्गिक पदार्थ आणि कष्ट' या दोन बाबींपासून बनलेल्या आहेत. यातील नैसर्गिक पदार्थ हे नैसर्गिक आहेत. कष्ट करून त्या पदार्थापासून वस्तू बनतात. त्यामुळे वस्तूची किम्मत म्हणजे त्यातील कष्टाची किम्मत.

नैसर्गिक पदार्थ + कष्ट = वस्तू

मोफत + मूल्य = वस्तूचे मूल्य."

"कॉम्रेड, आले लक्षात. वस्तूची किम्मत म्हणजे त्यातील कष्ट."

" एखादी वस्तू जास्त किंवा कमी किमतीची का असते?" कॉम्रेडने विचारले.

"जी वस्तू बनवण्यासाठी जास्त कष्ट, ती जास्त किमतीची आणि जी वस्तू बनवण्यासाठी कमी कष्ट ती कमी किमतीची वस्तू," मी म्हणालो.

"मग पैसे म्हणजे काय?" कॉम्रेडने विचारले.

"पैसे म्हणजे किम्मत म्हणजे कष्ट!" मी म्हणालो.

"मग भांडवल म्हणजे काय?" कॉम्रेडने विचारले.

"कष्ट!" मी म्हणालो.

"कष्ट कोण करते?" कॉम्रेडने विचारले.

"कामगार," मी म्हणालो.

"कारखान्यात कामगार कष्ट करतो, शेतात शेतकरी कष्ट करतो. मग आता सांग भांडवल कोणी निर्माण केले?" काॅम्रेडने विचारले.

"कष्ट करणार्‍यांनी!" मी म्हणालो.

"मग ते भांडवलदाराच्या ताब्यात कसे? जर भांडवलदारने भांडवल तयार केले नाही, तर त्यावर नफा मिळवण्याचा भांडवलदाराला अधिकार आहे का?" काॅम्रेडने विचारले.

"कॉम्रेड, तुम्ही आणखी एक भ्रम नाहीसा केलात. पण भांडवलदाराकडे भांडवल आले कसे?" मी विचारले.

"तू एखाद्या भांडवलदाराला हा प्रश्न विचारलास तर तो तुला सांगेल की त्याच्या वडिलांकडून वारशाने त्याला मिळाले. तू त्याला विचारलेस की त्याच्या वडिलांकडे भांडवल कसे आले तर, तो सांगेल आजाकडून, पणज्याकडून वगैरे वगैरे. तुला दुसरे उत्तर असे मिळेल की आपण कष्ट केले, काटकसर केली, बचत केली आणि भांडवल जमवले," कॉम्रेड म्हणाला.

"हं. अशीच उत्तरे मिळतील," मी दुजोरा दिला.

"आता आपण पाहिले उत्तर तपासू. आपण जर वडिलोपार्जित भांडवल तपासत गेलो तर आपल्या लक्षात येईल की त्याचे पूर्वज जमीनदार होते. जमिनदारांकडे संपत्ती कशी गोळा होई? कुळांचे कष्ट लुटून. याचा अर्थ भांडवल म्हणजे लुटलेले कष्ट."

"आणि जो म्हणतो की मी कष्ट केले, काटकसर केली, बचत केली आणि भांडवल जमवले, त्याचे काय?" मी विचारले.

"समजा, आपण असे म्हणु की एखादा कारागीर आहे. त्याने स्वतः कष्ट केले, वस्तू तयार केल्या आणि विकल्या. त्यातून जे पैसे आले, त्यातील थोडे पैसे त्याने न वापरता साठवून ठेवले. त्याने जे पैसे साठवले ते त्याचे कष्ट. त्या पैशांनी त्याने आपले काम वाढवले. त्याने चार मजूर कारागीर कामाला ठेवले. त्याने वस्तू बनवल्या आणि विकल्या. आपल्याला कसा हिशोब मिळेल?" कॉम्रेडने विचारले.

{कच्चा माल आणि अवजारांवर झालेला खर्च} + {कामगारांच्या मजुरीवरचा खर्च} = {त्या कारागीराने गुंतवलेले भांडवल}

"त्या कारागिरीने बचत केलेले पैसे त्याने भांडवल म्हणून गुंतवले हे भांडवल म्हणजे त्याचे स्वतःचे कष्ट. म्हणुन

{त्याच्या वस्तू विकून मिळालेले पैसे} - {त्याने गुंतवलेले भांडवल} = {नफा}"

"हा नफा त्या कारागिराच्या कष्टातून निर्माण झाला म्हणून त्या कारागिराचा. बरोबर ना?" मी विचारले.

"नाही!" कॉम्रेड म्हणाला.

"कसे काय?" मी विचारले.

"त्यासाठी दोन गोष्टी तू समजून घेतल्या पाहिजेत. एक मूल्याचा सिद्धांत आणि दुसरा जुने व नवे श्रम" काॅम्रेड म्हणाला.

"आपण एक मातीचे मडके घेतले आणि सोनाराकडे गेलो आणि त्याला म्हणालो की हे मडके घे आणि सोन्याची अंगठी दे,तर तो देईल का?" काॅम्रेडने विचारले.

"नाही," मी म्हणालो.

"का नाही?" त्याने विचारले.

"कारण मडक्याची किम्मत खूप कमी आहे. ती सोन्याच्या अंगठीएवढी नाही," मी.

"बरोबर. म्हणजे विनिमय किंवा देवाणघेवाण समान किमतीच्या वस्तूंमध्येच होते. हाच मुल्याचा सिद्धांत आहे," तो म्हणाला.

"हं. आणि जुने-नवे श्रम म्हणजे काय?" मी विचारले.

"आपण शर्टाचे उदाहरण घेऊ. शर्टासाठी कापड, कैची, शिलाई मशीन वगैरे वस्तू लागतील. या वस्तू देखील श्रमांनी बनलेल्या आहेत की नाही?"

"हो."

"यात असलेल्या श्रमांना 'जूने श्रम' म्हणतात. या वस्तूंवर शिलाईचे श्रम करू लागले की त्या श्रमांना 'नवे श्रम' म्हणतात. जेव्हा हे शिलाईचे श्रम पूर्ण होतील तेव्हा तेदेखील जुन्या श्रमात सामील होतील. शर्टाची किम्मत म्हणजे जुने श्रम अधिक नवे श्रम यांची बेरीज होय."

"होय. बरोबर."

"शर्ट बनवण्यासाठी जेव्हा कापड आणले जाईल तेव्हा कापड विकणार्‍याला त्याची किम्मत अदा केली जाईल. त्यात जे एकूण कष्ट घातलेले असतील, तितकी किम्मत दिली जाईल. कमी किम्मत दिली तर तो कापड विकेल का?"

"नाही."

"म्हणजे प्रत्येक वस्तू विकताना किंवा विकत घेताना मूल्याच्या सिद्धांतानुसार देवाणघेवाणीच्या दोन्ही बाजू समान किमतीच्या किंवा समान मुल्याच्या असतील. हो ना?"

"हो."

"आता आपण त्या बचत करून भांडवल जमवलेल्या कारागिराचा विचार करू. त्याने भांडवल गुंतवले म्हणजे 'जुने श्रम' गुंतवले. त्याने चार मजूर कारागिरांकडून वस्तू बनवून घेतल्या आणि विकल्या. वस्तू विकल्यावर त्याला जे पैसे मिळतील, त्यातून त्याने गुंतवलेले पैसे त्याला परत मिळतील. म्हणजे त्याचे जुने श्रम परत मिळतील. ते त्याचेच श्रम आहेत, त्यामुळे ते परत घेण्याचा त्याला अधिकार आहे. पण त्याला जे जादा पैसे मिळाले, जो नफा मिळाला तो घेण्याचा त्याला अधिकार आहे का?" त्याने विचारले.

मी फक्त प्रश्नार्थक भुवया उंचावल्या.

"नफा कशातून तयार झाला? जेव्हा तो नव्याने भांडवलदार झालेला कारागीर बाजारात वस्तू विकायला गेला, तेव्हा त्याच्या वस्तूला जे पैसे मिळतील ते त्या वस्तूच्या किमतीएवढे असतील की जास्त असतील?" कॉम्रेडने विचारले.

"मूल्याच्या सिद्धांतानुसार वस्तूंच्या किमतीएवढेच," मी म्हणालो.

"आणि वस्तूत घातलेले एकूण श्रम म्हणजे तिची किंमत," तो म्हणाला.

"हो."

"आता या वस्तूत घातलेले श्रम तपासू.

कच्चा माल (जुने श्रम)

+

अवजारे (जुने श्रम)

+

मजूर कारागीरांचे कष्ट (नवे श्रम)

=

नवी वस्तू

जुन्या श्रमांची किम्मत देऊन कच्चा माल आणि अवजारे विकत घेतली. आता त्या जुन्या श्रमांची किम्मत वाढेल का? नाही. मग उरतात ते नवे श्रम. नव्या वस्तूची वाढलेली किम्मत कशामुळे? नव्या श्रमांमुळे. म्हणजे मजूर कारागिरांच्या श्रमांमुळे.

मालक कारागीर मजूर कारागीरांच्या कष्टाचे संपूर्ण मूल्य देतो का? नाही. तो फक्त त्याचा ठराविक भाग देतो. त्या भागाला मजुरी म्हटली जाते. मग मालक कारागीराला जो नफा मिळाला तो कुठून झाला? त्याने मजूर कारागिरांच्या कष्टांचे संपूर्ण मूल्य न दिल्यामुळे झाला. बरोबर ना?"

"हो."

"पण प्रश्न इथेच थांबत नाही."

"म्हणजे?"

"मालक कारागीर मजूर कारागिरांकडून चोरलेले श्रम घालून भांडवल वाढवतो. जसजसे तो वस्तू निर्माण करून घेतो, तसतसे त्याचे भांडवल वाढत जाते. जसजसे भांडवल वाढते, तसतशी त्याची कामगारांना वेठीस धरण्याची ताकद वाढते," काॅम्रेड म्हणाला.

काॅम्रेड आणखी काही सांगणार होता, पण त्याच्याकडे कामगार भेटायला आले म्हणून आम्हाला चर्चा आटोपती घ्यावी लागली. पण एक मात्र कळले की भांडवल म्हणजे कष्टकऱ्यांचे श्रम. ते या ना त्या प्रकारे चोरून भांडवलदाराने साठवलेले असतात. एक तर त्याच्या पूर्वज जमीनदाराने कुळांचे श्रम लुटून साठवलेले असतात किंवा कामगारांचे श्रम लुटून.

एखादा कारागीर काटकसर किंवा बचत करून छोटेसे भांडवल साठवू शकतो. पण त्या भांडवलाला देखील श्रमचोरीशिवाय नफा मिळवणे शक्य नसते. त्यामुळे सर्वच्या सर्व मोठी भांडवले ही श्रमांच्या लुटीनेच तयार झालेली असतात.

ताजा कलम: जर मालक त्याच मजुरीत कामाचे जास्त तास करू पाहत असेल तर त्याचा काय अर्थ होतो?

त्याचा अर्थ होतो की तो श्रमांची लूट वाढवू इच्छितो! कारण जितके कामगारांचे श्रम तो मोफत लुटेल, तितका त्याला अधिक नफा होईल.

पण कोणीही शहाणा माणूस आपली चोरी काबूल करेल का?

नाही करणार. उलट तो अधिक शेंड्या लावेल.

जसे देश महासत्ता बनण्यासाठी आठवड्याला सत्तर तास काम करा, असे एक मूर्ती नावाचा भांडवलदार म्हणाला.

भांडवलदाराला जादा श्रम लूटू दिले तर सत्ता कोणाची वाढेल? मालकाची की कामगारांची?

आणि मालकाची सत्ता वाढणे म्हणजे देश महासत्ता होणे नव्हे. जसे जमीनदाराची श्रीमंती वाढणे, सत्ता वाढणे म्हणजे गावाची श्रीमंती आणि सत्ता वाढणे नव्हे!

......

डॉ. रुपेश पाटकर


Tags:    

Similar News