नारळाच्या लागवडीतून शेतकरी करतोय मजूर मुक्त शेती
धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख असलेल्या गणेश चौधरी यांनी प्रयोगशील शेतीतून दोन वेगवेगळ्या प्रजातींच्या नारळाच्या झाडांची लागवड केली असून पारंपरिक पिकांना फाटा देत नारळाच्या शेतीतून आपण मजुरमुक्त शेतीचा प्रयोग करत असल्याचे सांगितले.;
धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील प्रयोगशील शेतकरी गणेश चौधरी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या अनोख्या प्रयोगातून वाफा खाचा यंत्राची निर्मिती केली होती, यानंतर गणेश चौधरी यांनी आता पारंपारिक शेतीला फाटा देत आपल्या तीन एकर शेतात नारळाच्या झाडांची लागवड केली असून या फळ पिकातून आपण उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गणेश चौधरी यांनी आपल्या तीन एकर शेतात कोलंबस आणि मलेशियन ग्रीन डार्क या दोन वेगवगळ्या प्रजाती असलेल्या नारळाच्या झाडांची लागवड केली असून, यातील कोलंबस या नारळाच्या झाडाचे आयुर्मान हे पन्नास वर्षे असून मलेशियन ग्रीन डार्क या नारळाचे आयुर्मान साठ वर्षे असल्याचे सांगितले. नारळाच्या झाडाच्या शेतीतून मजूर मुक्त शेती हा प्रयोग देखील आपण केला असून यातून शेतीच्या उत्पन्नातून होणारी घट ही देखील कमी होणार आहे. पारंपारिक पिकांमध्ये भावात होणारी चढ-उतार तसेच या पिकांना लागणारी कीड यामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते, मात्र या नारळाच्या झाडाच्या शेतीतून आपण उत्पन्नात होणारी घट वाचवणार असून या प्रयोगशील उपक्रमातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे.
नारळाचे पाणी बाजारात विक्रीसाठी आणून आपण त्यातून वेगळा प्रयोग करणार असून पारंपारिक पिकांना पर्याय म्हणून बहुवार्षिक पिकांची लागवड करणे ही काळाची गरज असल्याचे गणेश चौधरी सांगतात, त्यांनी केलेल्या नारळाच्या शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी या ठिकाणी भेट देत असून ही शेती सध्या जिल्ह्यात चांगला चर्चेचा विषय ठरली आहे.