शेतकरी आरक्षण चळवळीचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी लखिमपूर नरसंहारातील शहीद शेतकऱ्यांचे अस्थिकलश महाराष्ट्राची काशी म्हणून देशात ओळख असलेल्या पंढरपूरात शेतकऱ्यांचं दैवत विठ्ठलाच्या नामदेव पायरीवर भाविकांच्या दर्शनासाठी ठेवले. तेथून भजनदींडीने अस्थिकलशासह विठ्ठल नामाच्या गजरात मंदीराची परिक्रमा केली व चंद्रभागा नदीलगत शेतकरीसभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेला शैलेश अग्रवाल व विनायकदादा पाटील यांच्यासह अन्य शेतकरी नेते उपस्थित होते. विठ्ठल हा गरीबांचा व शेतकऱ्यांचा देव असल्याने अस्थिविसर्जन करन्यासाठी पंढरपूरची निवड केल्याचे यावेळी संयुक्त किसान मोर्चाचे नेते विनायकदादा पाटील म्हणाले. किसानोकी ये हालत नही सहेगा भारत या गर्जनेतून मार्गदर्शनाची सुरुवात करत भारताच्या गौरवशाली राजकीय व सामाजिक इतिहासाला काळीमा फासणारी ही घटना असून दिल्लीच्या सीमेवर सूरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा अद्याप तोडगा निघाला नाही, हेही देशातील शेतकऱ्याचं दूर्दैवच आहे.
कोणत्याही जाती, धर्म वा पक्षात असो परंतु संपूर्ण शेतकरी समाज देशातील एक मोठं कुटुंब आहे. मोक्ष प्राप्तीसाठी अस्थिविसर्जन ही समाजातील कौटुंबिक क्रिया असून कुटुंब या नात्यानेच हा विधी करत असल्याचे शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी मार्गदर्शनातून सांगितले. त्यांनी ईश्वर राज्यकर्त्यांना राजधर्म पालनाची सद् बुद्धी देवो आणि शहीद शेतकरी व पत्रकारांच्या आत्म्याला शांती देवो हीच विठ्ठलचरनी प्रार्थना असल्याचे यावेळी सांगितले.
विधीवत पूजनानंतर शैलेश अग्रवाल व विनायक पाटील यांनी वारकऱ्यांसह चंद्रभागा नदीपात्रात लखिमपूर घटनेतील शेतकरी व पत्रकारांच्या अस्थींचे विसर्जन केले.
देशभर अशा यात्रा काढून शेतकरी आंदोलन अधिक व्यापक करण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विविध संघटनांच्या वतीने ही यात्रा महाराष्ट्रात काढण्यात आली आहे. लखीमपूर खेरी येथील शहिदांच्या अस्थी असलेले कलश महाराष्ट्रात आणण्यात आले असून शेतकऱ्यांच्या चळवळीचे ऊर्जास्थान असलेल्या पुण्यातील महात्मा जोतीराव फुले यांच्या वाड्यातून या अस्थिंच्या कलशांच्या यात्रा दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू होतील. विविध संघटनांच्या माध्यमातून विविध मार्गांवरून राज्यभर मिरवणुका व सभा आयोजित करत, राज्यातील जनचळवळींच्या विविध शक्तिस्थानांना भेटी देत या यात्रा दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबईच्या हुतात्मा चौकात पोहोचतील व मुंबईत भव्य सभा घेऊन या अस्थी महाराष्ट्राच्या मातीत विलीन करण्यात येतील, असे किसानसभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवलेंनी सांगितले.
यात्रेचा मार्ग:
२७ ऑक्टोबर - पुण्याहून सुरुवात
२८ ऑक्टोबर - सातारा
२९ ऑक्टोबर - कोल्हापूर
३० ऑक्टोबर - सांगली
३१ ऑक्टोबर - सोलापूर
१ नोव्हेंबर - उस्मानाबाद/लातूर
२ नोव्हेंबर - बीड
३ नोव्हेंबर - औरंगाबाद
७ नोव्हेंबर - जालना
८ नोव्हेंबर - परभणी/हिंगोली
९ नोव्हेंबर - नांदेड
१० नोव्हेंबर - यवतमाळ
११ नोव्हेंबर - वर्धा/नागपूर
१२ नोव्हेंबर - अमरावती
१३ नोव्हेंबर - बुलडाणा
१४ नोव्हेंबर - नंदुरबार/धुळे
१५ नोव्हेंबर - नाशिक
१६ नोव्हेंबर - अहमदनगर
१७ नोव्हेंबर - ठाणे/पालघर
१८ नोव्हेंबर - मुंबईत समारोप