जलयुक्त शिवार अभियान 2.0 मधील कामे तातडीने पूर्ण करावी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जलयुक्त शिवार अभियान 2.0’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.;

Update: 2024-01-24 17:58 GMT

मुंबई  : ‘जलयुक्त शिवार अभियान 2.0’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान 2.0 चा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे (दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे),मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपस्थित होते.



उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जो जिल्हा अधिक वेगाने कामे करेल, त्या जिल्ह्याला अधिक निधी दिला जाईल.

लातूर, भंडारा, सोलापूर, सांगली, पुणे या 5 जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा वेगाने प्रगती झाली आहे. इतर जिल्ह्यांनीही कामे अधिक वेगाने करावीत.



जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश लक्षात घेता, राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार अभियान 2.0’ चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. ज्यामध्ये पाणलोट विकास उपक्रमांच्या विविध कामांचा समावेश आहे, यामुळे पावसावर आधारित शेतीच्या समस्या कमी होण्यास मदत होऊन शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यास मदत होणार आहे.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेत धरणातील व गावतळ्यातील साठलेला गाळ काढून टाकून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याबरोबरच या गाळाचा वापर शेतशिवारामध्ये करून, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी फायदा होईल, ज्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होईल.


 



या वर्षात, आत्तापर्यंत, 565 तलावातून सुमारे 83.39 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे, ज्यामुळे जवळपास 6000 लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा झाला आहे.

या योजनेसाठी शांतीलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे तसेच इतर स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेत आहोत.

त्यांना जिल्हा प्रशासनाने पूर्ण सहकार्य करावे असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी दिले




Tags:    

Similar News