घरगुती बियाणांची मोहीम हाती घेण्यास शासनाची उदासीनता !

शेतकऱ्यांची संभ्रमी अवस्था... बियाणं कोणती वापरावी? घरगुती बियाणांची चळवळ का काळवंडली? घरगुती बियाणे वापरायचे म्हटले, तर बीजप्रक्रिया कशी करावयाची? शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन खरचं मिळतंय का? घरगुती बियाणांचे शेतकऱ्यांना का वाटते भिती? घरगुती बियाणांच्या चळवळीचा थोडक्यात आढावा घेतलाय डॉ. सोमिनाथ घोळवे यांनी वाचा...

Update: 2024-06-28 10:20 GMT

घरगुती बियाणे चळवळीला गारठा आल्याचे पाहण्यास मिळत आहे. कंपन्यांचे की घरगुती नेमके कोणते बियाणे वापरायचे याबाबतीत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असल्याचे प्रत्यक्ष भेटीतून जाणवले. शेतकऱ्यांच्या मतानुसार, घरगुती बियाणापासून उतार कमी मिळत आहे. शिवाय पाऊसाचा खंड पडला तर तग धरून रहात नाही. त्यामुळे घरगुती बियाणापेक्षा वेगवेगळ्या कंपन्यांच्या बियाणे खरेदी करून पेरण्या करण्यावर भर आहे. मात्र दुसरीकडे गेल्या वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी बियाणांच्या किंमती वाढवने कंपन्यांना पैसे कमविण्यासाठी सुगीचे दिवस आले आहेत. मात्र काही शेतकऱ्यांनी बियाणावर फारसे पैसे खर्च करायला नको म्हणून हलक्या, मुरमाड आणि खडकाळ शेतीसाठी घरातील बियाणे वापरले आहे. तर चांगल्या शेतीसाठी कंपन्यांचे बियाणे वापरत आहेत. गेल्या वर्षाच्या हंगामात जशी घरगुती बियाणाची चळवळ जोमात होती तशी आता पाहण्यास मिळत नाही. यामध्ये मार्गदर्शन, शेतमालाच्या किंमती, नियोजन, व्यवस्थापन असे राजकीय व्यवस्थात्मक अनेक कारणे हे नाकारता येत नाही.

एकंदर घरगुती बियाणांची चळवळ काळवंडलेली आहे. यास कारणही तसेच गेल्या वर्षभरापासून सोयाबीनला चांगला भाव नाही, हमीभावापेक्षा कमी आहेतच. शिवाय किफायतशीर भाव नसल्याने अनेक मध्यम आणि मोठ्या शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन तसेच जतन करून ठेवलेले आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणी करण्यास शेतकरी फारसे उत्साही नाहीत. मात्र नाइलाज आहे, दुसरे कोणते पीक गुंतवणुकीचा परतावा नफ्यात देईल? याबाबत शेतकऱ्यांमध्ये स्पष्टता नाही. सोयाबीन पेरणी केली आणि विक्रीवेळी भाव मिळाला नाही तर काय करायचे? हा सर्वात मोठा प्रश्न भेडसावत आहे. दुसरे, घरातील जतन केलेल्या सोयाबीनचे काय करायचे? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहेत.

गेल्या चार वर्षापासून घरगुती बियाणांच्या चळवळीचा थोडक्यात आढावा घेतला तर काय दिसते.

२०२० साली अनेक बियाणे कंपन्यांनी सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करायला लावले होते. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी कारणी लागली होती. बोगस बियाणांमुळे बियाणांचा खर्च, रासायनिक खतांचा खर्च, मेहनत, पेरणीचा खर्च, वेळ, मानसिक त्रास असे सर्व शेतकऱ्यांना सहन करावा लागला. त्यामुळे जागृत असलेल्या शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे जतन करणे आणि पुढील वर्षी हंगामात पेरणीसाठी वापरणे चालू केले. दुसरे, सोशल मीडियाद्वारे घरगुती बियाणे जतन करून वापरण्याची मोहीम चालू आहे. जे शेतकरी सोशल मिडियाचा वापर करतात, त्यांना या मोहिमेचा फायदा होत आहे.

बियाणे जतन करणे, संवर्धन करणे या बाबतीत प्रशिक्षण-प्रात्यक्षित असे अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी पारंपारिक पद्धतीने बियाणे जतन करावे लागत आहे. या संदर्भात कृषी विभागाकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले असल्याचे कागदोपत्री दाखवत असतीलही. पण वास्तवात असे प्रयत्न कृषी विभागाकडून झाले नसल्याचे अनेक गावातील शेतकऱ्यांच्या भेटीतून दिसून आले. त्यामुळे घरगुती बियाणांच्या मोहिमेला शासकीय पातळीवरून पाठबळ मिळताना दिसून येत नाही.

पुरेसे मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि जागृती अभावी बीजप्रकिया किंवा उगवण क्षमता न तपासता घरगुती बियाणांची पेरणी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. कारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाच्या कृषी विभागाकडून बीजप्रकिया आणि बीज उगवण क्षमता तपासणी मार्गदर्शक आणि जागृतीसाठी मोहीम हाती घेण्याची गरज आहे. मात्र ही मोहीम हाती घेण्यास शासनाकडून खूपच उदासीनता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घरातील बियाणे काढून तिफनीवर मुठ धरावी लागणार आहे. त्यामुळे घरगुती बियाणांची मोहीम ही शेतकऱ्यांनी स्वतःसाठी चालवलेली मो हीम आहे.

दुसरे, नेमके कोणते बियाणे दर्जेदार असेल? हा प्रश्न आहेच. विविध कंपन्यांचे बियाणे दर्जेदार असेल असा विश्वास शेतकऱ्यांना नाही. कारण गेल्या हंगामातील दुबार पेरणीच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. दुसरे असे की घरगुती बियाणे वापरायचे म्हटले, तर बीजप्रक्रिया कशी करावयाची हे माहीत नाही, प्रशिक्षण-मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळे घरगुती बियाणे बिनाप्रकियाचे वापरले आणि उगवण क्षमता कमी असली किंवा उत्पन्नाचा उतार कमी मिळाला, तर काय करावयाचे? अशा दुहेरी कोंडीत राहून यावर्षीची पेरणी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.


Tags:    

Similar News