#Sugar ऊस गेला नाही तर ऊस पेटवून देऊन आत्मदहन करणार :शेतकऱ्याचा संतप्त इशारा...

बीड जिल्ह्यात उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांना आपला ऊस कारखाने घेऊन जावा, याच्यासाठी जिवाचं रान करत कारखान्याचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. एवढेच नाही तर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. यामुळं शेतकऱ्यांमधून आता संतापाची लाट पहायला मिळत आहे, प्रतिनिधी हरिदास तावरेंचा स्पेशल रिपोर्ट;

Update: 2022-06-03 09:17 GMT

बीड जिल्ह्यात उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांना आपला ऊस कारखाने घेऊन जावा, याच्यासाठी जिवाचं रान करत कारखान्याचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. एवढेच नाही तर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. यामुळं शेतकऱ्यांमधून आता संतापाची लाट पहायला मिळत आहे.

 बीडच्या माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील शेतकरी संग्राम थावरे यांनी आपल्या शेतात ऊस लावला होता. मात्र कारखान्याकडे एफआरपीवरील व्याजाची रक्कम मागितल्यामुळे कारखान्यांनी यांचा ऊस नेला नाही. विशेष म्हणजे यांच्या गाव परिसरात 3 साखर कारखाने आहेत. त्यापैकी दोन सहकारी आणि एक खासगी तत्त्वावर चालणारा कारखाना आहे. मात्र यापैकी एकाही कारखान्याने संग्राम तावरे यांचा ऊस नेला नाही. त्यामुळे आता त्यांच्यापुढे हा ऊस कसा घालावा ? आणि जगाव कस ? असा प्रश्न निर्माण झाला आहे




 


पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. तळहाताच्या फोडासारखं जपलेला ऊस उभा आहे. कारखान्याकडे अनेक वेळा चकरा मारल्या, मात्र कारखान्याच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे माझ्या शेतातील ऊस कारखाना घेऊन जात नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभा केलेला ऊस, आज शेतात उभा आहे. काही दिवसांवर खरिपाचा हंगाम आलाय, बी-बियाणे कसे आणावे ? असा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. त्यामुळे येणाऱ्या चार दिवसात माझा ऊस नेला नाही, तर मी ऊसाचा फड पेटवून, त्यामध्ये आत्मदहन करणार आहे. असा संतप्त इशारा बीडच्या माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील शेतकरी संग्राम थावरे यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळा अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपला आहे, मात्र आजही जिल्ह्यातील जवळपास दीड हजार शेतकऱ्यांचा 1100 हेक्‍टरवर ऊस शेतात उभा आहे. जिल्ह्यात 28 मे पर्यंत 48 लाख 64 हजार 837 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर 93 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप अद्याप बाकी आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात आतापर्यंत 7 कारखाने सुरू होते. मात्र त्यापैकी 4 कारखाने बंद झाले असून उर्वरित 3 कारखाने एकट्या माजलगाव तालुक्यात सुरू आहेत.




 


दरम्यान मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात अनेक भागात हजेरी लावली आहे. मात्र आजही जिल्ह्यातील दीड हजार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊस उभा आहे. त्या गाव खेड्यातील शेतकऱ्यांच्या परिसरामध्ये पाऊस झाला, तर शेतातील ऊस शेताबाहेर काढावा कसा ? असा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासन आणि साखर आयुक्तांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढावा. अशी मागणी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.

Tags:    

Similar News