पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 8 जुलैपर्यंत जोरदार पाऊस

गुजरात आणि आजूबाजूच्या परिसरावर असलेली चक्रीय वातस्थिती, पूर्व-पश्चिम वाऱ्याचे क्षेत्र, गुजरात ते केरळ किनारपट्टीवर असलेली ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे कोकणातील पावसाला चालना मिळत असून, कालपासून मुंबई आणि ठाण्यामध्ये ऑरेंज अॅलर्ट (orange alert) देण्यात आलेला आहे. सध्या पश्चिमेकडून येणारे वारेही तीव्र असून त्यामुळेही पाऊस पडण्याची शक्यता आहे.;

Update: 2023-07-06 09:43 GMT

हवामान खात्याकडून पुढचे ४ दिवस मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तर विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपुर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मंगळवारी दिवसा मध्य मुंबईमध्ये पडलेल्या पावसाने ७० ते १०० मिमीचा टप्पा गाठला. कुलाबा येथे मात्र सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या कालावधीत १८ मिलीमीटर तर सांताक्रूझ येथे केवळ ९ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. दक्षिण मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये दिवसभरात पावसाचे प्रमाण अधिक नव्हते.

मुंबई, ठाण्यामध्ये काही ठिकाणी बुधवारपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचाही अंदाज आहे. पूर्व-पश्चिम वाऱ्याची प्रणाली सिंधुदुर्गाजवळ असून, ती अधिक सक्रिय झाल्यास पावसाचा जोर वाढू शकतो.

सह्याद्रीला धडकून कोकणामध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने प्रादेशिक हवामान विभागाने ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरीमध्येही तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय पुणे, नाशिक, पालघर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाला सुरुवात झाल्याचं चित्र आहे. अजूनही मराठवाडा विभागात जोरदार पावसाची प्रतीक्षा देखील शेतकरी करत आहेत. मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या सरासरीत अद्याप तूट आहे.

या आठवड्यात ती भरुन निघण्याची शक्यता आहे. तर, कोकणातील पावसाची तूट सोमवारी झालेल्या पावसानं भरुन निघाली आहे. भारतीय हवामान विभागानं पावसाचे इशारे जारी केले असून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Tags:    

Similar News