अतिवृष्टीमुळे यंदा ज्वारीचे कोठार रिकामे...

Update: 2020-11-02 15:14 GMT

महाराष्ट्रात ज्वारी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल मंगळवेढ्यातील ज्वारीचे कोठार यंदा रिकामेच राहणार आहे. अतिवृष्टीमुळे हंगाम संपल्यानं ज्वारीची पेरणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळं यंदा मंगळवेढा येथे ज्वारीचा पेरा पूर्ण होऊ शकला नाही.

संपूर्ण महाराष्ट्रात मंगळवेढा ज्वारी उत्पादनासाठी अग्रेसर आहे. येथील मालदांडी ज्वारीला जी.आय मानांकन सुध्दा मिळाले आहे. मंगळवेढ्यात दरवर्षी ५० हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी केली जाते. दरवर्षी पोळा सणानंतर १० ते ३० सप्टेंबरपर्यंत ज्वारीची पेरणी केली जाते. पण यंदा जून पासूनच पाऊस सुरू होता. तो आत्ता ऑक्टोबर मध्यापर्यंत सुरूच राहिला.

रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्हय़ाचा नंबर पहिला असून त्यानंतर अहमदनगर व पुणे जिल्हय़ात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात नांदेड व लातूर जिल्हय़ात सर्वाधिक ज्वारी घेतली जाते. रब्बी हंगामातील शाळू जातीची ज्वारी सोलापूर जिल्हात घेतली जाते व तिला राज्यातील सर्वोत्तम दर्जा प्राप्त झाला आहे.

यंदा मंगळवेढ्यात दरवर्षीपेक्षा १२७ मिमी पाऊस जास्त झाला आहे. यामुळे ज्वारी पेरणीसाठी उपलब्ध असलेल्या शेतात पाणीच पाणी झाले. यामुळे हंगामात शेतकऱ्यांना ज्वारीची पेरणी करणे शक्य झाले नाही. ज्यांनी थोडीफार ज्वारी पेरली. ती देखील पावसाने वाहून गेली.

यंदा जेमतेम १९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यालाही पावसाचा फटका बसला आहे. यामुळे दरवर्षी ५० हजार हेक्टरवर ज्वारीचे उत्पादन घेणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात यंदा ज्वारीचं उत्पन्न घटणार आहे.

यासंदर्भात येथील शेतकरी सांगतात...

मंगळवेढा हे ज्वारीचे कोठार आहे. जून महिन्यापासून येथे पाऊस सुरु आहे. साधारण पोळा झाल्यापासून येथे पेरणी होते. माझी पंधरा एकर जमीन आहे. त्या पंधरा एकर जमीन मध्ये मी दोन-तीन एकर ज्वारी केलेली होती. पण पावसामुळे नुकसान झालं आहे. इथे शेतामध्ये पाणी खूप आहे. खूप चिखल साठलेला आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की, आता सिजन निघून गेल्यामुळे पेरणी होईल. त्यामुळे आता हरभरा, करडी अशी पिके घ्यावी लागतील. ती पिके येतील अशी मला शक्यता नाही. त्यामुळे बळीराजावर आता खूप मोठं संकट आलेलं आहे. याची शासनाने त्वरित दखल घ्यावी हीच आमची इच्छा आहे.

5 एकर शेती असलेले येथील एक शेतकरी सांगतो...

पाच एकर ज्वारी पेरली साहेब. त्यात पाऊस आणि अतिवृष्टी झाल्यामुळे वाहून गेलं सगळं. एक क्विंटल सुध्दा ज्वारी आली नाही. आता घर कसं चालवायचं? हा प्रश्न आहे. काय करायचं तुम्ही सांगा साहेब? दरवर्षी या वर्षापासून त्या वर्षापर्यंत पिकवून जगत होतो. यावर्षी कस जगायचं? दरवर्षी पाच एकर पेरतो. कधी 40 क्विंटल तर कधी 20 क्विंटल उत्पन्न येते. आता अशी परिस्थिती आहे की, पाण्यामुळे सगळे वाहून गेल्यामुळे काहीच नाहीये. जवळजवळ सगळेच नुकसान झालेले आहे. जवळ तीस चाळीस हजाराचं नुकसान झालेले आहे.

मंगळवेढ्याचे कृषी सहाय्यक अधिकारी श्रीरंग काटे सांगतात...

मंगळवेढा तालूका हे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखलं जाते. मंगळवेढा मध्ये एकूण 50 हजार हेक्टर एवढे क्षेत्र हे ज्वारीच्या पीकाखाली असतं. म्हणजे मंगळवेढा तालूक्याचं जे पेरणी क्षेत्र आहे. त्यापैकी एकूण क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्र हे ज्वारीच्या पिकासाठी असतं.

परंतू यावर्षी पाऊस झाला म्हणजे जून पासून आत्तापर्यंत त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना पेरणीसाठी अडथळे आले आहेत. यावर्षी 19 हजार हेक्टर क्षेत्र हे पीकाच्या लागवडीसाठी आलेलं आहे. त्यात पडलेल्या पावसामुळे काही उगवलेले पीक पाण्याखाली आहे. त्यामुळे त्यात क्षेत्र कमी होण्याची दाट शक्यता आहे.

मंगळवेढा तालूका हे ज्वारीचे कोठार म्हणून समजला जातो. पण पडलेल्या पावसामुळे या वर्षी हे कोठार रिकामं होतंय की काय? अशी भीती निर्माण झालेली आहे. मंगळवेढा ज्वारीला GI मानांकन हे मंगळवेढा तालूक्यामुळं मिळालेलं आहे. आज GI मानांकन मिळालेले रजिष्टर शेतकरी सुद्धा आता चिंतेत आहेत. कारण जो उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे तोच या पावसामुळे संकटात आहे.

या संदर्भात आम्ही स्थानिक आमदार भारत भालके यांच्याशी बातचित केली. ते म्हणतात...

मंगळवेढा हे ज्वारीचे कोठर म्हणून ओळखले जाते. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे सप्टेंबर मध्ये पेरणी केलेल्या ज्वारीचे नुकसान झाले आहे. तर पावसाचे पाणी अद्याप शेतामध्ये असल्याने पेरणी झाली नाही. या दोन्ही नुकसानाचे पंचमाने करुन या शेतकऱ्यांना १०० टक्के मदत केली जाईल. शेतात पाण्याचा निचरा झाल्यानंतरही पेरणी केली आणि पीक आले नाही तरी नुकसानभरपाई दिली जाईल.

ज्वारीची भाकरी महाराष्ट्रात आवडीने खाल्ली जाते. तसं जर पाहिलं तर ज्वारी हे पीक मुळात भारतातील नाही. आफ्रीकेत या पिकाचं उत्पादन घेतलं जातं. मात्र, ज्वारीला हवं असलेलं हवामान आपल्या देशात असल्यानं हे पीक आपल्या देशात मोठ्या प्रमाणात घेतलं जाऊ लागलं.

कोणत्या हंगामात घेतले जाते पीक...

खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते.

चारा म्हणून उपयोग...

Full View

ज्वारी हे पीक जनावरांना उत्तम चारा देणारे पीक असल्यामुळे जनावरांवर अवलंबून असणारी ज्यांची शेती आहे. तेथे ज्वारीचा पेरा अधिक केला जातो. मात्र, यंदा हे सर्व पीक वाहून गेल्यानं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे माणसं काही तरी खाऊन जगतील मात्र, जनावरांना काय खाऊ घालायचं असा सवाल आता या शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पन्न

ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. एकूण ज्वारीच्या क्षेत्रापकी ४० टक्के क्षेत्र महाराष्ट्रात असून ५७ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.

भारतात ज्वारीचं उत्त्पन्न

सध्या जगभरात ज्वारीचे क्षेत्र भारतात पहिल्या क्रमांकाचे आहे. भारतात मोठ्या प्रमाणात शेतकरी ज्वारीचा पेरा करतो. मात्र, देशात ज्वारीचा पेरा अधिक असला तरी उत्पन्नाच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो.

देशाच्या एकूण जमिनीच्या ११ टक्के क्षेत्रावर ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये ६५ टक्के खरीप तर ३५ टक्के रब्बीचे क्षेत्र असते. साधारणपणे खरीप पेरणी करताना शेतकरी संकरीत व सुधारित वाण मोठय़ा प्रमाणावर आल्यामुळे देशात खरिपाचे उत्पादन सर्वाधिक होते.

कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू प्रांतांतही ज्वारीचा पेरा केला जातो. सुमारे ५५ लाख हेक्टरवर ज्वारीचे क्षेत्र आहे व एकूण ४० लाख टन उत्पादन आहे. दर हेक्टरी १० क्विंटलच्या आसपास ज्वारीचे उत्पादन होते.

Tags:    

Similar News