पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू

Update: 2021-08-29 14:40 GMT

भारतीय किसान यूनियन चे नेते गुरनाम सिंह चड़ूनी यांनी करनाल पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचा ह्रद्य विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

चड़ूनी यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये सुशील काजल नावाच्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी या ट्वीटमध्ये दिली आहे. ते गेल्या 9 महिन्यांपासून शेतकरी आंदोलनात सक्रीय होते.

असं गुरनाम सिंह चडूनी यांनी म्हटलं आहे.

करनाल टोल प्लाजा वर झालेल्या लाठीचार्जमध्ये ते जखमी झाले होते. काल रात्री त्यांना ह्रद्य विकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी त्यांच्या या बलिदानाला कधीही विसरु शकत नाही.

शनिवारी हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या लाठीचार्ज मध्ये जवळपास दहा लोक जखमी झाले. होते. त्या दरम्यान शेतकऱ्यांनी हरियानातील कर्नालकडे जाणारा महामार्ग रोखला होता. शेतकरी भाजपच्या सभेला विरोध करत होते. ज्यात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, प्रदेश भाजपा प्रमुख ओम प्रकाश धनखड़ आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.

काय आहे संपुर्ण प्रकरण?

हा लाठीचार्ज होण्यापूर्वी, व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, कर्नाल जिल्ह्याचे उपविभागीय दंडाधिकारी आयुष सिन्हा, पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांचे डोके फोडण्याची सूचना करताना दिसत आहेत. ते पोलिस कर्मचाऱ्यांना सूचना देत आहेत की, कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही किंमतीत मर्यादेच्या पुढे जाण्याची परवानगी देऊ नये, मग त्यांची डोकी फोडावी लागली तरी चालेल.

व्हिडीओमध्ये आयुष सिन्हा यांना असं बोलताना ऐकू येतं की, "जर मला तिथे एकही आंदोलक दिसला तर मला त्याचं डोकं फुटलेले पाहिजे आणि हात तुटलेले पाहिजे."

ते म्हणतात, " गोष्ट खूप सोपी आहे. कोणीही असो, कुठलाही असो, कोणालाही तिथे पोहोचण्याची परवानगी नाही. आपल्याला कोणालाही ती सीमा पार करू द्यायची नाही.

ज्याठिकाणी भाजपची बैठक होती. त्या ठिकाणी हरियाणा पोलिसांनी शनिवारी महामार्गावर धरणे लावून वाहतूक बंद करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला.

दरम्यान, केंद्रातील भाजप सरकारने नवीन शेतकरी कायदे आणल्यापासूनच शेतकरी भाजप नेत्यांचा विरोध करत आहेत. या सोबतच ते भाजपच्या सभांचा देखील विरोध करत आहेत. आणि यामुळेच जेव्हा शनिवारी भाजप नेत्यांची बैठक होणार होती. त्यावेळी शेतकरी नेत्यांनी महामार्ग रोखला. आणि याबाबतच एसडीएमने शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

जेव्हा एसडीएमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अधिकाऱ्याच्या त्या आदेशावर टीका झाली. या निषेधाचा परिणाम असा झाला की, सत्ताधारी भाजपच्या लोकांनीही अधिकाऱ्याच्या आदेशावर टीका करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, भाजप खासदार वरुण गांधी यांनी ट्विट केले,

"मला आशा आहे की हा व्हिडिओ एडिट केलेला आहे आणि डीएमने तसं काहीही म्हटलेलं नाही. अन्यथा भारतासारख्या लोकशाही देशात स्वतःच्या नागरिकांशी अशी वागणूक स्वीकारली जाऊ शकत नाही."

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्विट करत म्हटलं की,

"खट्टर साहेब, आज तुम्ही हरियाणाच्या आत्म्यावर लाठ्यांचा वर्षाव केला आहे. येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील की हरियाणातील शेतकऱ्यांचे रक्त रस्त्यावर सांडले होते."

त्यांनी शेतकऱ्यांवरील या कारवाईची तुलना जनरल डायरच्या कारवाईशी केली.

दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महामार्ग आणि अनेक रस्ते अडवले. हरियाणातील इतर अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. तसेच अनेक किलोमीटरपर्यंत रस्ता जाम असल्याने दिल्ली-अमृतसर महामार्गाच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मात्र, पोलिसांनी शेतकऱ्यांच्या अटक केलेल्या साथीदारांना रात्री सोडले आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी जाम केलेला रस्ताही उघडला.

संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे की, पोलिसांनी क्रूरपणे लाठीचार्ज केला आहे. संयुक्त किसान मोर्चाने सर्व शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्यास सांगितले आहे. शेतकरी नेते गुरनाम सिंह चढ़ूनी यांनी म्हटले आहे की, पोलीस गुंडगिरी करत आहे आणि आम्हाला त्याचा ठामपणे विरोध करावा लागेल.

त्यांनी म्हटलं आहे की, आजूबाजूचे सर्व रस्ते आणि टोल जाम करून टाका.

Tags:    

Similar News