वादळी वाऱ्याच्या तडाख्यात दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट लाखो रुपयांचे नुकसान

संकटापोठापाठ एका संकटाने शेती परवडेनासी झाली असताना बार्शी तालुक्यात शेतकऱ्याची तोडणीला आलेली द्राक्ष बाग अवकाळी वाऱ्याच्या तडाख्यात पडल्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वर्षभर पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेली बाग जमिनीवर झोपली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...;

Update: 2022-04-03 14:56 GMT

जिल्ह्यात अवकाळी वादळाचा तडाखा बसल्याने बार्शी तालुक्यातील इर्लेवाडी येथील शेतकरी शरद सरकाळे व अमोल सरकाळे या भावांची दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली आहे. यामध्ये 21 ते 22 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सातत्याने अवकाळी पावसाचे वातावरण होते. यामध्ये जिल्ह्यातील सांगोला,पंढरपूर,बार्शी या तालुक्यात अगदी अल्प प्रमाणात पावसाने हजेरी लावून द्राक्ष बागायतदारांना चिंतेत टाकले होते. अवकाळी पावसाच्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी सातत्याने द्राक्ष बागा वाचण्यासाठी फवारण्या करत होते. या अवकाळी पावसाच्या वातावरणात जिल्ह्यात कोठेही नुकसान झाल्याची घटना घडली नव्हती. त्याचवेळेस अवकाळी पावसाच्या वाऱ्यामुळे बार्शी तालुक्यातील इर्लेवाडी येथील दोन एकर द्राक्ष बाग जमिनीवर कोसळली असल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे शेतकरी शरद सरकाळे यांच्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. बँकेचे कर्ज काढून द्राक्ष बाग उभी केली होती. त्यात अवकाळी वाऱ्याच्या फटक्यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने बँकेचे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे. शासनाने तात्काळ मदत करावी,अशी अपेक्षा त्यांनी बोलताना व्यक्त केली.

कोरोनाच्या संकटानंतर शेतकऱ्याच्या बागेवर अवकाळी वाऱ्याचे आक्रमण




 


गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्व बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतातच पडून राहिला होता. काही शेतकऱ्यांनी कवडी मोल दराने केळी, टरबूज,कलिंगड विकले होते, तर काहींनी फुकटच वाटप केले होते. मार्केट बंद असल्याने कोरोनांच्या काळात शेतकरी मेटाकुटीला आला होता. कोरोनांच्या संकटातून बाहेर येत सध्या शेतकऱ्यांची शेती उभारी घेऊ लागली आहे. सर्वसामान्यांचे जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. सर्व बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू लागला आहे. गेल्या दोन वर्षात शेतकरी अडचणीत असल्याने त्याने यावर्षी शेतीत काबाडकष्ट करीत शेती पिकवली आहे. कोरोनाच्या काळात झालेले नुकसान भरून काढण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पण अशातच अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. या अवकाळी पावसाने जिल्ह्यात ज्वारी,गहू पिकांना अल्प प्रमाणात धोकाही झाला. याचमुळे द्राक्ष बागायतदार ही हवालदिल झाले होते. अवकाळीच्या तडाख्यातून द्राक्ष बागा वाचवण्यासाठी सातत्याने फवारण्या करण्यात येत होत्या. काही शेतकऱ्यांनी तर बागेवर अवकाळी पावसाचा व कडक उन्हाचा परिणाम होऊ नये यासाठी शेड-नेट अंथरली आहे. यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम द्राक्ष बागांवर झाला होता. पावसामुळे द्राक्ष बागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. फवारण्या करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. द्राक्षांचे पीक यावर्षी येईल का नाही याची त्यांना भीती वाटत होती. पण सुदैवाने पीक चांगले आले. त्याला चांगला भाव पण मिळू लागला आहे.पण बार्शी तालुक्यात शेतकऱ्याची तोडणीला आलेली बाग अवकाळी वाऱ्याच्या तडाख्यात पडल्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वर्षभर पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेली बाग जमिनीवर झोपली आहे. त्यामुळे शेतकरी शरद सरकाळे आणि अमोल सरकाळे यांचे दुःख अनावर झाले आहे. त्यांनी शासनाकडे मदतीची याचना केली आहे.

आठ ते दहा दिवसात द्राक्ष बागेतून उतरली जाणार होती

सध्या द्राक्षांचा हंगाम जोरात सुरू आहे. बागेतून उतरवलेल्या द्राक्षांना बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे काही ठिकाणी द्राक्ष व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन द्राक्षांची खरेदी करत आहेत. तर काही शेतकरी पुणे,मुंबई आणि बाहेरच्या राज्यात द्राक्ष विक्रीसाठी पाठवत आहेत. शेतकरी शरद सरकाळे यांच्या द्राक्ष बागेतील द्राक्ष 8 ते 10 दिवसात मार्केटला विकण्यासाठी जाणार होती. त्यात अवकाळी पावसाचे सावट बागेवर होते. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्याने शरद सरकाळे यांची द्राक्ष बाग जमिनीवर कोसळली. त्यामुळे हातातोंडाला आलेला द्राक्षांचा घास गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. द्राक्षांचे घड जमीवर पडले आहेत. 8 ते 10 दिवसात मार्केटला जाणारा माल जमिनीवर पडला असल्याने व्यापारी कमी दरात द्राक्ष माल मागू लागले आहेत. नाईलाजास्तव शेतकरी शरद सरकाळे द्राक्षांचा माल विकण्यास तयार झाले आहेत. बाग पडल्याच्या पहिल्या दिवशी व्यापाऱ्यांनी येऊन द्राक्षांची 30 रुपये किलो प्रमाणे खरेदी करून द्राक्षांचा एक टेम्पो घेऊन गेले आहेत. पण दुसऱ्या दिवशी व्यापारी बागेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे शेतकरी शरद सरकाळे चिंतेत आहेत. त्यांची राहिलेली द्राक्षे बेदाण्यासाठी वापरण्याचे ठरवले आहे. या द्राक्ष विक्रीतून बाग उभी करण्यासाठी थोडीफार मदत होणार असल्याचे शेतकरी शरद सरकाळे आणि अमोल सरकाळे यांनी सांगितले.




 


बँकेचे कर्ज काढून द्राक्ष बागेला केला खर्च

शेतकरी शरद सरकाळे यांनी सांगितले की, या पडलेल्या द्राक्ष बागेच्या झाडांना जास्त प्रमाणात द्राक्षे आली होती. त्यामुळे झाडांना वजन झाले होते. अचानक अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाल्याने जोराचा वारा आला. यामध्ये द्राक्ष बागेच्या संवर्धनासाठी बांधलेली तार तुटली गेली. त्यामुळे दोन एकर द्राक्ष बाग जमिनिवर झोपली गेली. या बागेच्या औषध फवारणी व खतांसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. हातातोंडाला आलेला द्राक्षांचा माल जमिनीवर पडल्याने कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न उभा राहिला आहे. बागेची छाटणी,औषध फवारणी आणि खतांसाठी 5 लाख रुपये खर्च आला होता. तर मजुरीसाठी 2 लाख रुपये खर्च आला होता. पडलेल्या बागेचा एक घड अंदाजे दीड ते दोन किलो भरला असता. या बागेमध्ये सुमारे 55 टन द्राक्षांचे उत्पादन निघाले असते. द्राक्षांना सध्या चांगले मार्केट असून 55 रुपये किलो प्रमाणे बाजारात विकली गेली असती. पण बाग जमिनीवर पडल्याने तोच माल नाइलाजास्तव 30 रुपये प्रमाणे विकावा लागत आहे. बाग पडल्यामुळे कमीत-कमी 21 ते 22 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पडलेली बाग पुन्हा उभा करायची झाल्यास 6 ते 7 लाख रुपये खर्च येणार आहे. सध्या आर्थिक अडचणीमुळे बाग लवकर उभा करता येणार नाही. पडलेल्या बागेचा द्राक्ष माल व्यापारी काही नेहतील ते नेहतील राहिलेल्या द्राक्षांचा बेदाणा तयार करू असे शेतकरी शरद सरकाळे यांनी सांगितले.




 


तलाठ्यांकडून द्राक्ष बागेचा पंचनामा

पडलेल्या बागेचा तलाठ्याकडून पंचनामा करण्यात आला आहे. बागेचे फाउंडेशन पडले असल्याने ते उभे करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यासाठी कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये लागतील असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी शासनाची आर्थिक मदत लवकर मिळाली तर बाग उभा करता येईल. सरकारी काम आणि सहा महिने थांब असे होऊ नये,असे या भागातील शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे शासन स्तरावरून या शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देण्यात यावी,असे या गावातील नागरिकांना वाटत आहे.

Full View

Tags:    

Similar News