बंधाऱ्यातील मत्स्यशेतीतून शेतकऱ्यांना लखपती करणारा जांबुळणी पॅटर्न

सुपीक मेंदू असेल तर जगातील कोणतेही क्षेत्र पडीक राहणार नाही. याच सुपीक मेंदूचा वापर करत जांबुळणी गावच्या तरुणांनी गावच्या बंधाऱ्यावर मत्स शेती सुरु केली... आणि आज लखपती झाले आहेत... पाहा बंधाऱ्यातील मत्स्यशेतीतून शेतकऱ्यांना लखपती करणारा जांबुळणी पॅटर्न नक्की काय आहे;

Update: 2021-04-24 17:10 GMT

सुपीक मेंदू असेल तर जगातील कोणतेही क्षेत्र पडीक राहणार नाही अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यक्षात उतरवण्याचे काम केले आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात येणाऱ्या जांबुळणी या गावाने. ग्रामीण भागातील उपलब्ध असलेल्या संसाधनांचा पुरेपूर वापर झाला तर गावाच्या सर्व गरजा भागवण्यासाठी ही संसाधने उपयोगी ठरणार आहेत. तसेच यामुळे गावाचा शाश्वत विकास होणार आहे.

आटपाडी हा तसा दुष्काळ माथी असणारा तालुका. पावसाची कमतरता. नदी नाले ओढे उन्हाळ्यात कोरडे पडायचे. टेंभू योजनेमुळे दुष्काळाचा हा दाह थोडा कमी झालेला आहे. या योजनेतून आलेल्या पाण्याने ओढे तलाव नाले भरले जात आहेत. पण यातील अनेक बंधारे नादुरुस्त असल्याने पाणी वाहून जात असते.

गावातील सामाजिक कार्यकर्ते शिवराम मासाळ हे गेले अनेक दिवस गावातील शेतीच्या पाण्याच्या प्रश्नांनी चिंतेत होते. गावात बंधारे आहेत. पण त्यात पाणी अडवले जात नाही. सरकारने कोल्हापूर पद्धतीचे बांधलेल्या बंधाऱ्यातून सर्रासपणे पाणी वाहून जात होते. यामध्ये पाणी अडवण्याचा दरवाजांची दुरावस्था झाली होती. यावर उपाय करण्याचा निर्धार त्यांनी गावाच्या सरपंचांना सोबत घेऊन केला. या कामासाठी गाव तयार झाला.

शासनाने बांधलेले सिमेंट बंधाऱ्यांची पाणी अडवण्याची क्षमता पूर्णपणे संपलेली होती. बहुतांश बंधाऱ्याचे दरवाजे मोडलेले होते. नाम फाउंडेशन ने मदतीचा हात दिला. आणि गावकऱ्यांनी या बंधाऱ्यांच्या वरच्या बाजूला श्रमदानातून बांध घालायला सुरवात केली. पाहता पाहता हे काम पूर्ण केले. या पावसाळ्यात हे बंधारे तुडुंब भरले. या बंधाऱ्या काठचे शेतकरी प्रल्हाद माने सांगतात....

या जमिनीत पाण्याचा थेंब नव्हता. पण हा बंधारा अडवल्याने आम्हाला या शेतात बागायती पिके करणे सोपे झाले आहे. परीसरात यामुळे पाण्याचे प्रमाण वाढले आहे. पाणी वाढले परंतू ग्रामपंचायतीद्वारे गावाचा विकास करायचा असेल तर निधीची आवश्यकता आहे. निधी असल्याशिवाय ग्रामपंचायतीचे व्यवस्थापन गावातील दिवाबत्ती पेयजल यांचे यांचे व्यवस्थापन करणे शक्य होत नाही. ग्रामीण भागात कर गोळा होणे हे कठीण असते. याचा विचार करत सरपंच संगीता मासाळ यांच्याशी चर्चा करत ग्रामपंचायतीचे उत्पन्न कसे वाढवायचे असा विचार शिवराम मासाळ केला.


या वेळी गावातील तरुण बेरोजगार तसेच त्यांचे रोजगारासाठी शहरात स्थलांतर होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या दोन गोष्टींचा विचार करत आपल्याकडे असलेल्या बंधाऱ्यात मत्स्य उत्पादन करता येऊ शकेल का? असा विचार शिवराम मासाळ यांनी केला. यानंतर त्यांनी पारंपरिक पणे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांशी यासंदर्भात चर्चा केली आणि बंधाऱ्यात मत्स्य शेती करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे मांडला.

यावर ग्रामसभा झाली. ग्रामसभेने एकमुखाने हा ठराव संमत केला पण हे बंधारे मत्स्यशेती करीता घेण्यास तयार कोण होणार हा प्रश्न उभा असतानाच ओमकार पंढरीनाथ गुरव हे पुढे आले आणि या बंधाऱ्याचा कर भरून मत्स्य शेती करायचा निर्णय त्यांनी घेतला याबाबत ते सांगतात

"मी रोजगाराच्या शोधात होतो तेंव्हा मत्स्य शेतीचा हा प्रस्ताव माझ्यासमोर आला. मी अनेक प्रोजेक्ट फिरलो तेंव्हा असे लक्षात आले की दीड रुपयाचे मत्स्यबीज मोठे होईपर्यंत कमीत कमी एक किलोचा मासा होईपर्यंत जास्तीत जास्त त्याचा खर्च तीस रुपये होतो आणि हे मासे कमीत कमी शंभर रुपये किलोने विकले जातात. केवळ तीस रुपयात सत्तर रुपये नफा आठ ते नऊ महिन्यात कोणती बँक सुद्धा देऊ शकत नाही त्यामुळे मी या बंधाऱ्यात मत्स्य शेती सुरू केली. आजपर्यंत आम्ही आठ लाख रुपयाचे मासे विकले आहेत".

उर्वरित मत्स्य उत्पादनातून किमान २५ लाख उत्पन्न मिळेल अशी आशा या तरुणांना आहे.


एकूण सहा बंधाऱ्यात हा प्रकल्प सुरू आहे. मासे ज्या दिवशी विक्रीस काढणार आहे. ती वेळ सोशल मीडियातून जाहीर केली जाते. काही मत्स्य व्यावसायिक तसेच गावातील इतर लोक ते विक्रीसाठी होल सेल दराने नेतात. उर्वरित माल जिल्हाभरातील व्यापाऱ्यांना पाठवला जातो. अशा प्रकारे या प्रकल्पामुळे लोकांचे अर्थार्जन होत आहे.

शेत तळ्यांमध्ये केल्या जाणाऱ्या मत्स्य शेतीमध्ये १०० टक्के खाद्य हे वरून द्यावे लागतात. या खाद्याचा खर्च वाढतो. याचबरोबर माशांचे आरोग्याची देखील देखभाल जास्त करावी लागते. याउलट बंधारे हे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असल्याने माशांचे बहुतांश खाद्य हे पाण्याच्या तळाशी निर्माण होत असते. यामध्ये खाद्याचा खर्च किमान पन्नास टक्क्यांनी कमी येतो. आणि माशांची वाढ सुद्धा तुलनेत जलद होते. असा या तरुण व्यावसायिकांचा अनुभव आहे.

गावात असणाऱ्या बारा बंधाऱ्यांपैकी सहा बंधारे हे भाडे तत्वावर गावातील बेरोजगार तरुणांच्या गटांना दिले आहेत. यातून प्रती महिना प्रती बंधारा एक हजार रुपयाचा कर ग्रामपंचायतीला मिळतो. ग्रामपंचायतीला एकूण ७२ हजार रुपयाचे उत्पन्न या प्रकल्पापासून मिळते. या प्रकल्पामुळे हे उत्पन्न वाढले आहे. याचबरोबर बंधारे दुरुस्त झाल्याने लगतच्या कोरडवाहू शेतीचे बागायत मध्ये रुपांतर झाले आहे.

काही शेतकरी ऊस तसेच इतर बागायती पिके घेत आहेत. लॉकडाउन काळात गावातील अनेकांना होलसेल दराने मासे या तरुणांनी विकले. या माशांची विक्री करून गावातील लोकांनाही यापासून रोजगार उपलब्ध झाला होता.


या बंधाऱ्यात रोहू, कटला, चीलाफ या प्रकारचे मासे आहेत. या माशांची आता पूर्णपणे वाढ झालेली आहे.

जांभूळनी या आकाराने अगदी लहान असलेल्या गावातील या प्रकल्पाची चर्चा अगदी विधानपरिषदेत झाली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकल्पाची माहिती विधान परिषदेत दिली. तसेच या गावाचा हा स्तुत्य पथदर्शी प्रकल्प इतर बंधारे असणाऱ्या गावांनी त्यांच्या गावात उभारावा असे आवाहन त्यांनी केले.


महाराष्ट्रात असे अनेक छोटे मोठे बंधारे आहेत. ज्याची सद्यस्थितीत पाणि अडवण्याची क्षमता नाही. ते नादुरुस्त आहेत. अशा बंधाऱ्यांची डागडुजी करून त्यामध्ये ग्रामपंचायतीने व्यवस्थापन करत असे प्रकल्प उभारले तर हे एक अर्थार्जनचे दुसरे साधन उभे राहील. ग्रामीण भागातून स्थलांतरीत होणाऱ्या तरुणांना यामध्ये रोजगार मिळेल.या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.

Tags:    

Similar News