पीकविम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित, दखल घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना अमलात आणली. मात्र एक हंगाम संपून दुसरं हंगाम संपत आले तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याचा लाभ जमा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.;
अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेची सुरूवात करण्यात आली. मात्र खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचा विमा अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 2021-22 मध्ये खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला होता. तर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तुर आणि सोयाबीन ही प्रमुख पीके पाण्याखाली गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठीच्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र सध्या रब्बी हंगाम संपत आला तरी हिंगोली जिल्ह्यातील आजेगांव, नागा सिनगी, सेनगांव, औंढासह जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणचे शेतकरी या पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. तर यासंबंधी शेतकऱ्यांनी तहसिलदारांकडे विचारणा केली तर लवकरच जमा होईल, अशा प्रकारचे आश्वासन बऱ्याच दिवसापासून दिले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पीकविमा जमा न झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तहसिलदारांना निवेदन दिले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, मोल मजूरी करून पीकविम्याचे पैसे भरले. मात्र अजूनही पीकविम्याचा लाभ न मिळाल्याने आपण भरलेले पैसे वाया जातात की काय, अशी भीती वाटत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर पीकविम्याच्या पैशापेक्षा जास्त पैसे तहसिलच्या फेऱ्या मारण्यात जात आहेत. त्यामुळे या निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.