एकीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपाची धुळवड ; तर दुसरीकडे गारपिटीने शेतकरी उद्धवस्त

Update: 2021-03-27 09:22 GMT

 कोरोना संकटातील होळी आणि धुलिवंदनात राज्याच्या राजकारणात सत्ताधारी विरोधकांचा आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला सुरु असताना राज्यातील अवकाळी पावसाकडे मात्र प्रशासन आणि प्रसारमाध्यमाचं साफ दुर्लक्ष झालयं. गेल्या दोन दिवसांत जालन्यातील वादळी वाऱ्यासह गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना चांगलाच फटका बसून उभी पिकं आडवी झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल आहे. पिकांच्या या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.

जालन्यातील आसरखेडा गावात परवा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला आणि गारपीटही झाली आहे. या गारपीटीमुळे गावातील द्राक्ष उत्पादक शेतकरी जनार्धन बोडखे यांची दोन एकरच्या द्राक्षबागेतील द्राक्ष जमिनीवर कोसळून पडली. बोडखे यांनी यंदा चार लाख रुपये द्राक्ष बागेवर खर्च केला आहे. पण गारपीटीमुळे विक्रीला आलेली द्राक्ष जमीनीवर कोसळून पडली त्यामुळे त्यांना १५ लाखांचा फटका बसलाय आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनने द्राक्ष विकली गेली नाही आणि यंदा गारपीटीने हातचं उत्पन्न हिसकावून नेल्याने जनार्धन बोडखे हतबल झाले आहेत.

आसरखेडा गावातील एकट्या जनार्धन बोडखे यांची ही स्थिती नाही, तर गारपिटीने गावातील प्रत्येक शेतकऱ्यांची अशीच अवस्था केली आहे. विष्णू काकडे यांनी पावणे चार लाख रुपये खर्चून 10 गुंठे जमिनीवर शेडनेट उभं केलं होतं. गारपीटीने ते जमिनीवर कोसळून पडलं हे शेडनेट पुन्हा उभं करण्यासाठी अडीच लाखांचा खर्च येणार आहे. गावातीलच गणेश हिवाळे यांनी 30 हजार रुपये खर्चून एक एकरावर ज्वारी पेरली होती. गारपिटीने ही ज्वारी जमिनीवर आडवी झालीय.या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

गारपीटीमुळे झालेलं नुकसान मोठं आहे. त्यामुळे तातडीने शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होणं गरजेचं आहे. राज्य सरकार या नुकसानीच्या पंचनाम्यांना कधी सुरुवात करण्याचे आदेश देणार यांची शेतकरी वाट पाहत आहे.धुळवड

Tags:    

Similar News