पंधरा दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यानं शेतकरी चिंतेत
एकीकडे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महापूराचं थैमान पाहायला मिळालं असतांना महाराष्ट्रातील असा एक जिल्हा आहे. जिथे मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
बीड : एकीकडे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महापूराचं थैमान पाहायला मिळालं असतांना महाराष्ट्रातील असा एक जिल्हा आहे. जिथे मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या खरिपाच्या पिकांनी आता माना टाकण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस हवामानात होणारे बदल आणि पावसाने मारलेली दडी या दुहेरी संकटाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाला मात्र, त्यानंतर मधल्या काही दिवसांत पावसाने उघडीप दिली त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलं होतं. मात्र यातून शेतकरी सावरत असतानाच आता पुन्हा पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
बीडच्या रामनगर येथील आजिनाथ कुटे या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतात 25 हजारांचा खर्च करून तुरीचं पीक घेतलं, त्यात आंतरपीक म्हणून मुगाची लागवड केली. मात्र हवामान बदलाचा परिणाम या पिकांवर दिसून येतोय. त्यामुळे आता पुढे काय करावं ? असाच प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
कापसासाठी मजूर मिळत नसल्याने, त्याबरोबरच होणारा खर्च लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाकडे आपला मोर्चा वळवला आहे, अशातच यंदा सोयाबीनला भाव देखील चांगला मिळत आहे. आणि याच आशेवर शेतकरी पिकाची जोपासना करतोय, मात्र पावसाचा मोठा खंड पडल्यानं सोयाबीनचे पीक पिवळं पडू लागलं आहे.
शेतीमध्ये नव - नवीन प्रयोग करुन मराठवाड्यातील शेतकरी देखील आता आधुनिक शेतीची कास धरतोय, मात्र निसर्गासमोर शेतकरी हतबल होऊ लागलेत. येणाऱ्या दोन दिवसात वरूनराजाने हजेरी लावली नाही, तर मात्र या शेतकऱ्यांच्या हातून खरीपाचा पूर्ण हंगाम जाण्याची भीती व्यक्त होत आहे.