शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सोलापूर-नागपूर या महामार्गावरील चिखली तालुक्यातील पेठ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले...यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी 22 फेब्रुवारीपासून कोल्हापूर येथे याच मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. मात्र या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने, राजू शेट्टी यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलनाची हाक दिली होती.. त्याच पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात ठीकठिकाणी आंदोलने करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील सोलापूर - नागपूर महामार्गावरील पेठ येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.. यावेळी महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सरकारने वेळीच आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्यभरातील महावितरणचे कार्यालय उद्ध्वस्त करू असा इशाराही यावेळी तुपकर यांनी दिला आहे.