माढा तालुक्यातील परिते येथील शेतकरी दादासाहेब देशमुख यांनी शेतात सेंद्रीय खतांचा आणि रासायनिक खतांचा वापर करून मिश्र प्रकारची शेती केली आहे.एकीकडे रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले असताना दादासाहेब देशमुख यांनी सेंद्रिय खते आणि रासायनिक खतांचा वापर करून केलेल्या शेती यशस्वी झाली आहे.शेतात सेंद्रिय खतांचा वापर केल्याने दादासाहेब देशमुख यांचे वर्षाला लाखो रुपयांची बचत होत आहे.त्यांच्या या अनोख्या शेतीची अनेकांनी दखल घेतली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट
सध्या सोलापूर जिल्ह्यात शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले जात आहेत.बदलत्या बाजारपेठेचा अंदाज घेऊन शेतकरी पिकांची लागवड करू लागले आहेत.कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.त्यातच शेती करत असताना शेतकऱ्यांना रासायनिक खतांची गरज भासते.या रासायनिक खतांच्या वापरामुळे कमी कालावधीत जास्त उत्पादन शेतकरी घेऊ लागले.पण या रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत.शेतजमिनीच्या मातीवर त्याचा परिणाम होऊ लागला असून त्यामुळे जमिनीतील नैसर्गिक कस कमी होत चालले आहे, असे शेती तज्ञांचे मत आहे.त्यामुळे सेंद्रिय शेती करा असा सल्ला कृषी तज्ञ नेहमीच शेतकऱ्यांना देतात.अलीकडे पूर्ण सेंद्रिय खतांच्या सहाय्याने पिकवलेल्या शेतीला व त्यातून निघालेल्या फळांना,धान्यांना महत्व प्राप्त झाले आहे.अशी धान्य,फळे विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढू लागला आहे.
70 ते 80 गाईच्या गोमूत्रापासून तयार केले जातेय सेंद्रिय खत
शेतकरी दादासाहेब देशमुख यांनी बंदिस्त गाय पालन केले असून त्यांचाकडे 70 ते 80 देशी गाई आहेत.त्यासाठी त्यांनी प्रशस्त गोटा तयार केला आहे.गाईचे संगोपन करताना त्यांनी आधुनिक साधनांचा उपयोग केला आहे.जनावरांना चारा मशीनने बारीक करून टाकला जातो.यासाठी शेतातील घास गवताचा वापर केला जातो. दादासाहेब देशमुख जनावरांची योग्य काळजी घेत असल्याने त्याचा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.या जनावरांच्या गौमूत्राचा उपयोग करत असताना त्यांनी त्याचे नियोजन केले आहे.जनावरे दावणीला बांधल्यानंतर त्यांचे पडणारे मूत्र एका टँकमध्ये जाण्यासाठी नाली बांधली आहे.त्या नालीतून जनावरांचे मूत्र हौदात जाते.जनावरे ज्या ठिकाणीच्या दावणीला बांधली जातात तेथे मूत्र नालीत वाहून जाण्यासाठी त्या जागेला नालीच्या दिशने उतार दिला आहे.साठलेले गौमूत्र हौदातून विद्युत मोटारीच्या सहाय्याने शेतातील पाण्याच्या वॉलमधून सुरू केलेल्या पाण्यामधून पिकाला दिले जाते.या हौदात शेण,ताक यांचे ही मिश्रण टाकले जाते.शेतीचा कस वाढण्यासाठी याचा उपयोग होत असल्याचे शेतकरी दादासाहेब देशमुख यांनी सांगितले.70 ते 80 गाईंचे दररोज मोठ्या प्रमाणात शेणखत निघते.या गाईच्या दुधापासून तूप तयार केले जात असून ते 2 हजार 500 रुपयाला विकले जात आहे.या गाई सॊबतच त्यांनी खिलार गाईंच्या वळुंचे संगोपन केले आहे.या वळुंचा उपयोग धावण्याच्या शर्यतीत केला जात आहे.या वळूला स्पर्धेत बक्षीसे ही मिळाली आहेत.
सेंद्रिय खतांचा वापर केल्याने पिकाच्या उत्पादनात झाली वाढ
यावेळी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना दादासाहेब देशमुख यांनी सांगितले की,गाईंच्या गोमूत्रापासून जीवामृत तयार केले जाते.ते स्लरीमधून पिकांना दिले जाते.स्लरीच्या हौदात सरकी पेंड,गूळ-बेसन यांचे ही मिश्रण टाकले जाते.या हौदातून शेतात पाईपलाईन केली आहे.ते पाण्यामधून पिकाला दिले जाते.जेथे पाणी चालते तेथे वॉल खोलून मडपंपाद्वारे स्लरी ऊसाला सरिद्वारे दिली जाते.त्यामुळे द्राक्ष,डाळींब यांच्या बागा चांगल्या स्थितीत आहेत.ज्या बागांना ठिबक सिंचन केले आहे.त्यांना जीवामृत ड्रीपमधून दिले जात आहे.यामुळे 4 एकरात 423 टन ऊस कारखान्याला गेला आहे.एकरात सरासरी 111 टन ऊस निघाला आहे.तर 10 एकर ऊसाचा वापर बेण्यासाठी केला आहे.या वर्षी 60 ते 65 एकरात ऊसाची लागण केली आहे.सेंद्रिय खतांचा उपयोग ऊसाचे उत्पन्न वाढवण्यासाठी निश्चितच होणार आहे.
खतासाठी 6 ते 7 लाख रुपये खर्च होत होता,परंतु सेंद्रिय खतांच्या वापरामुळे तो खर्च 3 लाखावर आला
शेतकरी दादासाहेब देशमुख म्हणाले की,मला 110 एकर शेती असून शेती जास्त असल्याने ऊसाचा पोत पण चांगला आहे.यावर्षी उसाचे क्षेत्र वाढवले असून ऊसाची लागण 60 ते 65 एकरात केली आहे.तर 56 एकरात डाळींब लावले आहे.5 एकरमध्ये द्राक्ष बाग लावली आहे. या बागांच्या खतासाठी वर्षाला काही वर्षांपूर्वी 6 ते 7 लाख रुपये खर्च होत होते.परंतु सेंद्रिय खतांच्या वापरामुळे तो खर्च 2 ते 3 लाखावर आला होता.सध्याचा घडीला खतांच्या किमती वाढल्याने 15 लाख रुपयांचा आसपास खर्च गेला असता.द्राक्ष बागेतून द्राक्षांचा 20 ते 22 टन कच्चा माल निघतो.त्यातून बेदाणा तयार केला जात असून एकरात सव्वा पाच टन बेदाणा निघतो,तर 5 एकरमध्ये 20 ते 25 टन बेदाणा होतोय.या बेदाण्याची विक्री चांगली होत असून 200 ते 250 रुपये किलो विकला जात आहे.गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊन असल्याने द्राक्ष बागायतदार,डाळींब बागायतदार अडचणीत आले होते.पण आम्ही घरीच बेदाणा तयार केला असल्याने दर वाढल्यानंतरच विकला.त्यामुळे आर्थिक फायदा झाला.या बेदाण्याची साठवणूक केली असल्याने विकण्यासाठी अडचण येत नाही.अशा प्रकारे शेतीची रुटिंग चालू आहे.
गाईच्या तूप विक्रीतून मिळतात पैसे
शेतकरी दादासाहेब देशमुख यांच्याकडे 70 ते 80 गाई असल्याने त्यातील अनेक गाईना पिल्लं झाली आहेत.गाईंचे 8 ते 10 लिटर दुध निघत असून त्यापासून 8 ते 9 किलो तूप तयार केले जात आहे.ते तूप अडीज ते 3 हजार रुपये किलो विकले जात आहे.दुधापासून लोणी तयार केली जात असून राहणाऱ्या ताकाचा उपयोग शेतीसाठी केला जात आहे.राहिलेले ताक स्लरीच्या टँकमध्ये टाकून पिकांना दिले जात आहे.या ताकाचा उपयोग जमिनीत बँक्ट्रिया वाढवण्यासाठी होतो.त्यामुळे रासायनिक खतांच्या खरेदीसाठी होणाऱ्या खर्चात बचत झाली आहे.सेंद्रिय खतांच्या वापरामुळे शेतकरी दादासाहेब देशमुख यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्यास मदत झाली आहे.
सेंद्रिय खतामुळं शेतकऱ्याची लाखो रुपयांची बचत
शेतकरी दादासाहेब देशमुख यांची शेती परिते या गावच्या हद्दीत असून हे गाव उजनी धरणापासून काही अंतरावर आहे.या उजनी धरणाच्या पट्ट्यात ऊसाची शेती जास्त प्रमाणात केली जाते.ऊसाच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर शेतकरी करतात.त्यासाठी महागडी खते शेतकऱ्यांना खरेदी करावी लागतात.पण शेतकरी दादासाहेब देशमुख यांनी सेंद्रिय खते व रासायनिक खतांचा मेळ घालत केलेल्या शेतीमुळे पैशांची बचत होत आहे.दिवसेंदिवस खतांच्या किंमती वाढू लागल्या आहेत.तर कधी खतांचा तुटवडा निर्माण होते.त्यामुळे योग्य खते शेतीला मिळत नाहीत.अशातच शेतात सेंद्रिय खतांच्या वापरला महत्व आले आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खते व रासायनिक खतांचा वापर करून आपल्या आर्थिक उत्पन्नात भर टाकावी,असे आवाहन शेतकरी दादासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांना केले आहे.