शेतकऱ्याने पिकवली काळ्या मक्याची शेती

शेतकरी आपल्या शेतात तांबडी,पांढरी मक्का लावतात हे माहीत होते. पण काळ्या मका वाण ही असतो व त्याची लागण करण्यात आली असल्याचे आजपर्यंत कधी ऐकण्यात आले नव्हते. या दुर्मिक अशा काळ्या मक्केचे उत्पादन घेण्याची किमया करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांने साधली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...;

Update: 2022-04-04 12:48 GMT

त्यांनी ऊसाच्या पिकात आंतरपीक म्हणून याची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांने यापूर्वीही दुर्मिळ अशा काळ्या गव्हाचे उत्पादन सेंद्रीय पद्धतीने घेतले होते. काळा गहू दुर्मिळ असून तो त्यांनी पंजाब राज्यातून मागवला होता. आताही त्यांनी काळ्या मक्केचे उत्पादन घेऊन एका नव्या प्रयोगाची यशस्वी चाचणी केली आहे. त्यांच्या या शेतीमुळे या भागातील शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. करमाळा तालुक्याच्या काही गावाच्या विकासात उजनी धरणाचे अनन्य साधारण महत्व आहे. उजनी धरणाच्या आजूबाजूला प्रामुख्याने ऊसाची आणि केळीची शेती केली जाते. उसाचे पीक कारखान्याला जाण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागत असल्याने शेतकरी पर्यायी शेतीच्या शोधार्थ आहेत. त्यामुळे येथील शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. त्यांच्या या प्रयोगाला यश ही येऊ लागले आहे. अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्यांने काळ्या मक्केचे उत्पादन घेतले आहे. त्या शेतकऱ्याचे नाव राम चौधरी असे आहे. ते करमाळा तालुक्यातील कवितगावचे रहिवाशी आहेत. त्यांच्या या काळ्या मक्केच्या शेतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

बारा महिने काळ्या मक्केचे उत्पादन घेता येते

महाराष्ट्राच्या विविध भागात तांबड्या आणि पांढऱ्या मक्केचे उत्पादन घेतले जाते. या मक्क्यांच्या पिकांना उन्हाळ्यात काही मर्यादा पडतात. याचे कणीस भरत असताना पूर्णपणे भरत नाही. अर्धवट अवस्थेत भरते. पण या काळ्या मक्केचे कणीस उन्हाळ्यातही पूर्णपणे भरते. त्यामुळे याचे उत्पादन चांगल्या प्रकारे निघते. तांबड्या आणि पांढऱ्या मक्केच्या उत्पादनाला काही मर्यादा पडत असताना काळी मक्का 12 महिने चांगले उत्पादन देते. या काळ्या मक्केचे उत्पादन तांबड्या आणि काळ्या मक्केपेक्षा 4 ते 5 क्विंटलने जास्त निघते. या मक्केला जास्त प्रमाणात पाणी लागत नाही. ऊसाच्या आंतरपीकातही चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येते. उसाला जी रासायनिक खते वापरली जातात. त्यांचाच या मक्केसाठी उपयोग होतो. प्रामुख्याने तांबड्या आणि पांढऱ्या मक्केचे उत्पादन ऊसाच्या शेतात घेतले जाते. असे शेतकरी राम चौधरी यांनी बोलताना सांगितले.





 


 


काळ्या मक्केची वैरण जनावरांना खायला घातल्यास दुधात वाढ होते

शेतकरी राम चौधरी यांनी सांगितले की, काळी मक्का जनावरांना खाण्यासाठी अतिशय पौष्टिक अशी आहे. याची वैरण जर जनावरांना खायला घातल्यास 1 ते 2 लिटरने जनावरांच्या दुधात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या मक्केच्या उत्पादनाकडे वळावे. दूध वाढीच्या संदर्भाने याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. सामान्यपणे तांबडी आणि पांढरी मक्का ज्याप्रमाणे उगवून येते त्याप्रमाणे काळी मक्काही उगवून येते. तांबडी आणि पांढरी मक्का जेवढी उंच जाते तेवढीच काळी मक्काही उंच जाते. या काळ्या मक्केला तांबड्या आणि पांढऱ्या मक्केप्रमाणे दोन कणसे लागतात. या मक्केचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो. या मक्केचे उत्पादन प्रामुख्याने उडीसा राज्यात घेतले जाते. आपल्या महाराष्ट्रात याचे उत्पादन अतिशय दुर्मिळ आढळते. या काळ्या मक्केच्या उत्पादनाकडे राज्यातील शेतकऱ्यांनी वळावे. त्याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. असे शेतकरी राम चौधरी यांचे म्हणणे आहे.

काळ्या मक्केत कॅल्शियम, मिनरल्स, आयर्न,प्रोटीन याचे प्रमाण जास्त




 


शेतकरी राम चौधरी यांनी सांगितले,की काळी मक्का लावण्या मागचा उद्देश असा आहे,की काळ्या मक्केचे बियाणे दुर्मिळ होत चालले आहे. ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काळ्या मक्केचे बियाणे प्राचीन आहे. याची लागण करण्यामागचा उद्देश असाही आहे,की जनावरांच्या आहारामध्ये याचा जर समावेश केला तर याच्यापासून जनावरांच्या दुधामध्ये 2 ते 3 लिटरने वाढ होते. मनुष्याने याची भाकरी जर बनवून खाल्ली तर ही मक्का आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. या मक्केमध्ये कॅल्शियम, मिनरल्स, आयर्न, प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे या मक्केचा कलर काळा आहे. प्राचीन काळापासून लोक मक्केची भाकरी वगैरे खात होते. परंतु अलीकडे लोकांचा मक्केकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे लोक मक्केची भाकरी खात नाहीत. या काळ्या मक्केचे संवर्धन व्हावे,यासाठी या मक्केची 2016 पासून लागवड करत आहे. या मक्केचे बियाणे उडीसा राज्यातून मागवले आहे. शेतकऱ्यांना या काळ्या मक्केची माहिती नसल्याने याची लागवड अत्यंत दुर्मिळ आहे.

काळ्या मक्केच्या बियाणाचे संवर्धन व्हावे

तांबड्या आणि पांढऱ्या मक्केची लागवड जून ते जुलै महिन्यात करतात. या दोन्ही मक्का सिझनेबल आहेत. उन्हाळ्याच्या हंगामात तांबडी मक्का येत नाही. उष्ण हवामानामुळे या मक्केची कणसे पूर्णपणे भरत नाहीत. त्यामुळे म्हणावे तेवढे तांबड्या मक्केचे उत्पादन निघत नाही. काळ्या मक्केची लागवड उन्हाळ्याच्या हंगामात केली तरीही चांगली येते. या मक्केला चांगल्या प्रतीची दोन कणसे येतात. या मक्केचे उत्पादन साडेचार महिन्यात निघत असून हेक्टरी 50 ते 60 क्विंटल पर्यंत मक्का निघू शकते. काळ्या मक्केचे उत्पादन तांबड्या आणि पांढऱ्या मक्केच्या उत्पादनापेक्षा जास्त निघते. या काळ्या मक्केची लागवड कोणत्याही हंगामात करता येते. काळ्या मक्केच्या बियाणाचे संवर्धन व्हावे, यासाठी या मक्केची लागवड शेतकरी राम चौधरी यांनी केली आहे.



 

यापूर्वी काळ्या गव्हाची केली होती लागवड

शेतकरी राम चौधरी यांनी यापूर्वी सेंद्रिय पद्धतीने काळ्या गव्हाचे उत्पादन घेतले आहे. या काळ्या गव्हाचे उत्पादन त्यांनी सीताफळाच्या बागेत आंतरपीक म्हणून घेतले होते. हा गहू रासायनीक खताच्या गव्हापेक्षा उंचीला जास्त आला होता. त्याची उंची साडेतीन ते चार फूट होती. त्यांच्या या दुर्मिळ काळ्या गव्हाच्या शेतीला अनेक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या होत्या. त्यांच्याकडून काळ्या गव्हाच्या शेतीसंबंधी माहिती जाणून घेतली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार हा काळा गहू 10 हजार रुपये क्विंटल विकला जातो. त्यांच्या या नवीन शेती प्रयोगाची सातत्याने चर्चा होते.

Tags:    

Similar News