यशस्वी शेतकरी उद्योजकाची यशस्वी प्रयोगशाळा: विष्णू पाटील

सर्वत्र शेती हा आतबट्टयाचा व्यवहार ठरत असताना उद्योजक होऊन शेती करणारे विष्णु पाटील यांनी शेतीची यशस्वी प्रयोगशाळा उभी केली आहे, याबाबत यशोगाथा मांडली आहे महाजनसंपर्क विभागाच्या सहाय्यक संचालक मीरा ढास यांनी;

Update: 2021-03-29 09:46 GMT


 



भारत देशाची ओळख कृषिप्रधान देश म्हणून जगात आहे, ती येथील वातावरण ,पीकपद्धती आणि उदरनिर्वाहचे प्रथम साधन  म्हणून शेती असल्यामुळेच काळानुरूप शेती बदलत गेली. शेती काहींच्या विचारातून आतबट्ट्याचा व्यवसाय ठरतो, तर काहींच्या विचार आणि कृतीतून आदर्श व्यवसायाचे उदाहरण ठरते. काही माणसे मातीतूनच नाहीतर खडकाला पाझर फोडून माळरानावर देखील नंदनवन फुलवतात. त्यांच्या या भगीरथ प्रयत्नाला सलाम केला पाहिजे.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा  जवळ साधारणपणे 2 की .मी  अंतरावर   प्रयोगशील शेतकरी श्री विष्णू पाटील. यांच्या कार्याचा आलेख बघितला तर अज्ञानाने, अपयशाने, नाउमेदीने खचून गेलेल्या शेतकरी बांधवांसाठी यशस्वी प्रयोग शाळा म्हणजे पाटील यांची शेती आणि या शेती मध्ये त्यांनी केले प्रयोग.

 मोठी माणसं नेहमीच जमिनीवर असतात, आभाळाएवढा कर्तृत्त्व ज्यांना मातीच्या ऋणावर मिळवता येतं, तेच व्यक्तिमत्व यशस्वी झालेले आहेत, हाच शेतकरी जीवनाचा इतिहास सांगतो. असंच काहीसं जिद्दी व्यक्तिमत्त्व म्हणजे विष्णू पाटील.

विष्णू पाटील यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असल्याने शेती लहानपणापासूनच बघत आणि राबत असल्याचा अनुभव, सध्याच्या प्रगत तंत्रज्ञान पद्धती यांचा वापर करून खडकाळ जमिनीवरून हिरवेगार शेत बहरताना आपल्याला दिसते. कुटुंबातील मेहनत, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर व कुटुंबातील आईचे सहकार्य, पत्नी आणि मुलांचे प्रेम यावर आज ही त्यांनी यशाची पायरी चढली आहे. आपण सहसा ऐकतो किंवा बोलत असतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशात महिलेचे योगदान असते, असं म्हटले जाते,येथे तर विष्णू पाटील यांच्या यशात आई आणि पत्नी दीपाली पाटील यांचे मोलाचे योगदान आहे,आणि ते प्रांजळपणे नव्हे तर अभिमानानं मान्य करतात.विष्णू पाटील यांच्या पत्नी श्रीमती दीपाली पाटील ह्या उच्च शिक्षित असून त्यांनी कृषी विषयातील एम.एससी ही पदवी संपादन केलेली आहे.



 

त्यांच्या या ज्ञानाचा आणि शिक्षणचा उपयोग त्या शेती,आणि व्यवसाय बरोबरच घरातील जबादारी उत्तमपणे पार पाडतांना दिसून येतो,याबरोबरच त्या एक स्वतंत्र उद्योजक म्हणून डेक्कन फँसिलिटी मॅनेजमेंट सर्वेसिस प्रा. लि. कंपनीच्या त्या संचालक या पदांची जबाबदारी यशस्वी संभाळत आहेत .सर्वात महत्वाचे म्हणजे घर आणि मुलांची जबाबदारी यशस्वी पारपाडत असल्याने दोघांचेही शेती आणि उद्योगात बरोबरीचे पाऊल सोबत आहे,परस्परपूरक कार्य आणि सामंजस्य यांमुळे पाटील दाम्पत्य यांनी केलेला हा यशस्वी शेतकरी ते यशस्वी उद्योजक हा प्रवास ऊन, वादळ, सुख -दुःख, आयुष्यात अलेले चढ- उतार,बघत आणि शिकत केला .हा पाटील कुटूंबाचा प्रवास एक प्रेरणादायी प्रवास म्हणावा लागेल.

पैसा व प्रतिष्ठेचा कोणताही अहंकार जाणवू न देता सामान्यातल्या सामान्य शेतावर राबणाऱ्या मजुरावर तेवढ्याच आपुलकीने व्यक्त होणारे, हे व्यक्तीमत्व .शिक्षण घेत असताना शाळेत एनसीसीचे पारितोषिक मिळवून सोलापूर जिल्ह्याचा आणि शाळेचा मान उंचावण्याचे प्रथम श्रेय विष्णू पाटील यांना जाते.

शिक्षणातील एनसीसी मुळे आयुष्यात शिस्त आणि कष्ट करण्याचे बाळकडू व अनुभव आजही आफाट उपयोगी पडतो असं त्यांचं वैयक्तिक मत आहे. शिक्षणानंतर मुंबईतील नोकरी आणि अनंत अडचणीवर मात करीत त्यांच्या आयुष्यात मुंबईतील एका आजीच्या बहुमोल सहकार्याने आणि आशीर्वादाने मुंबईतील प्रवास दिल्लीला घेऊन गेला. दिल्लीत व्यवसायात प्रथम पाऊल ठेवलं. व्यवसायात अस्तित्व टिकवण्यासाठी जवळपास वीस वर्षाचा संघर्ष आणि यातून डेक्कन ग्रुपच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी बरोबरच दिल्लीत महाराष्ट्रातुन गेलेल्या  सहकाऱ्याचे संघटन "  महाराष्ट्र मंडळाचा " माध्यमातून करण्याच मोलाचं यांचं कार्य आहे. महाराष्ट्राची नाळ, शेतीवरील प्रेम, माणसातील माणूसकी व ऋणानुबंध जोडण्याच्या वृत्तीमुळे एक अफलातून व्यक्तिमत्त्व घडले आहे विष्णू पाटील यांचे.

18 वर्षापासून डेक्क्न फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा.लि. त्याचप्रमाणे रॉयल डेक्कन कन्स्ट्रक्शन, डेक्क्न प्रिसिशन टुलिंग कंपनी, डेक्कन एक्सपोर्ट आणि डेक्कन ॲग्रो याच्या माध्यमातून साडेतीन हजार लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, रायपूर, हरिद्वार, अहमदाबाद, रुद्रापूर, वडोदरा, नोएडा, या शहरांमध्ये त्यांचा उद्योग व्यवसाय विस्तारलेला आहे. एक शेतकरी असलेल्या व्यावसायिक आपल्या मेहनत, तंत्रज्ञान, कामाप्रती प्रामाणिक, जिद्द याच्या जोरावर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो याच उदाहरण म्हणजे विष्णू पाटील यांचे जीवनकार्य. या बरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील काही शाळा मुलांच्या शिक्षणासाठी दत्तक घेतल्या आहेत.

खडकाळ जमिनीवर भगीरथाच्या प्रयत्नाने नंदनवन फुलावे त्या प्रयत्नाने मंगळवेढा मध्ये    आपल्या शेतावर या ध्येयवेड्या शेतकऱ्याने आंब्याचे उत्पादन घेतले आहे .यामध्ये हापूस, केशर, तोतापुरी तसेच बदामी,इमाम पसंत  या जातीच्या आंब्याचे उत्पादन घेत आहेत. उत्पादन केलेले विशेषतः केसर  आंब्याची परदेशात अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, या देशात निर्यात होते. जवळपास तीन ते चार देशांमध्ये यांच्या शेतातील आंबा विक्रीसाठी पाठवला जातो.त्याचप्रमाणे देशातील दिल्ली, मुंबई, पुणे या बाजरपेठेत देखील आंबा विक्रीसाठी उपलब्ध केला जातो .



 यामध्ये पाटील यांनी शेतात केलेले त्यांच्या शेतीविषयी आणि जोडव्यवसायाशी संबंधित जसे की पशुपालन, शेळी पालन, पोल्ट्री व सेंद्रिय खत निर्मिती असे प्रयोग यशस्वी राबविल्याने इतर शेतकरी बांधवांसाठी प्रेरणादायी आणि शेती ही प्रयोगशाळाच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विष्णू पाटील यांचे कार्य आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी तर प्रेरणादायी आहेच, शेतक-यांबरोबर अनुभवा ची देवाणघेवाण करताना वयाने लहान असलेल्या शेतकऱ्यांचा सल्ला देखील तेवढ्याच आपुलकीने स्वीकारतात व त्याचा उपयोग करतात. अहंकार आणि गर्व या दोन्ही गोष्टीचा लवलेशसुद्धा पाटील यांच्यात नाही. तो सहसा शेतकरी बांधवात नसतो.  

दिवसाची सुरुवात पहाटे पाच वाजता होते. सोलापूरला शेतीवर आल्यानंतर ते पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत असतात. ज्याप्रमाणे राज्यात कामानिमित्त फिरत असतात, त्याचप्रमाणे व्यवसायासाठी देखील इतर राज्यात त्यांचा वावर असतो. व्यवसाय म्हटलं की नफा-तोटा येतोच पण ती रिस्क पचवणं आणि त्यातून पुन्हा उभा राहणे तितकच महत्त्वाचं मानतात .म्हणून कोणतीही गोष्ट स्वतःच्याच प्रयोगशाळेत तपासणारा हा शेतकरी उद्योजक. शेतकरी आजचा तरुण शेतकरी बांधवांसाठी रोल मॉडेल म्हणायला हरकत नाही. आज सहा वर्षापासून केशर आंबा परदेशात पाठवून " पिकेल ते विकेल " तसेच विकेल ते पिकवेल याचे नियोजन त्यांच्याकडे असते. दहा ते पंधरा यक्कर शेतीवरील यावर्षी 60 ते 70 टन आंबा उत्पादन विक्रीचे उत्पादन अपेक्षित असल्याचं पाटील यांनी सांगितले.

शेती करणे म्हणजे आई ज्याप्रमाणे आपल्या तान्ह्या बाळाची काळजी घेते त्याचप्रमाणे शेतात आलेल्या कोणत्याही पिकाची काळजी घ्यावी लागते, तेव्हा कुठे मेहनत फळाला येते. हा अनुभव पाटील घेतात तेव्हा प्रत्येक झाडाची पाहणी करताना बघितल्यावर येतो.

आज डेक्कन ग्रुपच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. हा व्यवसाय न राहता तो विकास प्रक्रियेतील घटक आहे, असं म्हणून वेळ प्रसंगी स्पर्धा, नफा-तोटा अशा गोष्टींना सामोरं गेलं तर यशस्वी होतो. तसेच प्रामाणिकपणा हा शेती आणि व्यवसाय करताना पाळल्याने त्यातच समाधान लाभते अशा विचारांमधून महाराष्ट्रातील एक शेतकरी विविधांगी जिल्ह्याचे ,राज्याचे नेतृत्व करताना पाहून अभिमान वाटावा असं कार्य विष्णू पाटील यांचा आहे, म्हणून  अवलिया शेतकरी ही संकल्पना सार्थ ठरवणारे अफलातून व्यक्तिमत्व सर्वांसाठी ओपन टू माईंड म्हणायला लागेल.,    

श्री.विष्णू पाटील यांचा व्हॉटस्ॲप संपर्क क्रमांक- 9312405302

ई-मेल आयडी : vishnuspatil@yahoo.co.in

  -मीरा ढास,

सहायक संचालक,

माहिती, विभागीय माहिती कार्यालय

लातूर

Tags:    

Similar News