अठरा महिने झाले तरीही ऊस कारखाना घेऊन जाईना ; अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर

अडचणीतील बंद साखर कारख्यांन्यामुळे उसाच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केलं आहे. शेतकरी कारखान्याचे सभासद असतानाही त्यांचा ऊस कारखाने घेऊन जाईना झाले आहे. त्यामुळे सुद्धा शेतकरी हतबल झाले आहेत. सरकारने राहिलेल्या उसाचा प्रश्न मार्गी लावावा,अशी मागणी जनतेत आता जोर धरू लागली आहे. यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळत आहेत, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट

Update: 2022-03-27 14:49 GMT

सोलापूर जिल्हा ऊस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात 30 च्या आसपास साखर कारखाने आहेत. तरीही उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, करमाळा,बार्शी तालुक्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आला असून उसाच्या परिपक्वतेचा कालावधी पूर्ण होऊनही ऊस कारखान्याला जाईना गेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 18 महिन्यापासून ऊस शेतात उभा आहे. दीड वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांनी अनेक अडचणींचा सामना करत ऊस सांभाळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात भीमा आणि सीना नद्या असून या नद्यांना उजनी धरणातून बारमाही पाणी सोडले जाते. त्यामुळे या नद्यांच्या काठी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आढळून येते. ऊसाची लागण केल्यानंतर ऊस लहान असतानाच खुरपणी व वाढीसाठी खताचा डोस दिला जातो. एकदा ऊस बांधून झाला,की शेतकऱ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. फक्त वर्षभरात पाण्याचे व्यवस्थित नियोजन करावे लागते. या पिकाला जास्त पाणी लागत असल्याने ऊसाची बहुतांश शेती ठिबक सिंचनावर केली जाते. त्यासाठी काही प्रमाणात अनुदानही देण्यात येते. जिल्ह्यातील काही साखर कारखाने कर्जबाजारी झाले असल्याने बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या उसाचा प्रश्न गंभीर रूप धारण करताना दिसत आहे. शेतकरी कारखान्याचे सभासद असतानाही त्यांचा ऊस कारखाने घेऊन जाईना गेले आहेत. त्यामुळे सुद्धा शेतकरी हतबल झाले आहेत. सरकारने राहिलेल्या उसाचा प्रश्न मार्गी लावावा,अशी मागणी जनतेत आता जोर धरू लागली आहे. यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळत आहेत.

ऊसतोडणी टोळ्या निघाल्या गावाकडे

गेल्या 6 महिन्यापासून ऊस कारखान्याचे गाळप सुरू आहे. जिल्ह्यात ऊस तोडणी टोळ्या मध्य प्रदेश,बीड,परभणी जिल्ह्यातून आणल्या जातात. मजुरांकडे असणारी कारखान्याकडील उचल संपत आली असल्याने ऊसतोडणी टोळ्यांना गावाकडे परतीचे वेध लागले आहेत. त्यातच वाढत्या उन्हाने ऊसतोडणी कामगार हैराण झाले आहेत. जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. बऱ्याच ऊसतोड मजुरांच्या टोळ्या त्यांच्या गावाकडे निघून गेल्या आहेत. काही शिल्लक राहिलेल्या ऊसमजूर टोळ्यांच्या जीवावर ऊस तोडणी सुरू आहे. ऊस जास्त आणि ऊसतोड मजूर कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ऊसतोड मजुरांना विशेष असा भाव आला आहे. वाढत्या उन्हाचा त्रास ऊसतोड मजुरांना सहन होत नसल्याने उन्हाचा पारा कमी असेपर्यंतच ऊसाच्या फडात तोडणी करतात.उन्हाचा पारा वाढल्यानंतर ऊसाच्या फडात कामगार जात नाहीत,असे सध्या चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे फडातून दिवसाला कमी प्रमाणात ऊस कारखान्याकडे जात आहे.




 


ऊस जाळण्याचे वाढले प्रमाण

ऊसाच्या परिपक्कवतेचा कालावधी पूर्ण होऊन ही ऊस कारखान्याला जात नसल्याने ऊस पेटवून देण्याचे प्रमाण वाढले आहे. ऊस जाळल्यानंतर लागलीच कारखाने ऊस घेऊन जात आहेत. त्यामुळे ऊस पेटवून देण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या उन्हाच्या त्रासामुळे ऊसतोड कामगाराना ऊस तोडणी उरकत नसल्याने ऊस पेटवून तोडला जात आहे. परिपक्वतेचा कालावधी संपला असल्याने नाइलाजास्तव शेतकऱ्यांना ऊस पेटवून कारखान्याला द्यावा लागत आहे. ऊस पेटवून कारखान्याला पाठवल्याने वजनाला कमी भरत आहे. त्यात या जळालेल्या उसाला टनामागे भाव कमी देण्यात येत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी वर्ग कोंडीत सापडला आहे. ऊस कामगाराना गावाकडे परतीचे वेध लागले आहे तर शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला कधी जाईल याची चिंता सतावू लागली आहे. त्यात अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांवर घोंघावत आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी लाईट बिले भरली नसल्याने डीपीचे कनेक्शन तोडण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना काही दिवस ऊसाच्या शेतीला पाणी देता आले नाही. यामुळे ऊसाच्या वजनात घट झाली,असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ऊस तोडण्यासाठी एकरी सात हजार रुपयांची ऊसतोड टोळ्यांची मागणी

ऊस कारखान्याला घेऊन जाण्यासाठी ऊसतोड टोळ्या एकरी 7 हजार रुपयांची मागणी करत आहेत,तर एका खेपेसाठी ट्रॅक्टर ड्रायव्हर 500 रुपयांची मागणी करत आहेत. त्यामुळे ऊस कारखान्याला घालवणे खूपच कठीण झाले आहे, असे शेतकरी बालाजी चौधरी यांनी सांगितले.पुढे बोलताना त्यांनी सांगितले,की ऊसाची लागवड करण्यासाठी एकरी 45 हजार रुपये खर्च आला होता. माझा 15 एकरात ऊस आहे. हा सर्व ऊस आडसाली आहे. तरीही कारखान्याकडून दखल घेतली जात नाही. उन्हाचा कडाका वाढत असून ऊस तोडताना त्रास होत असल्याचे ऊस टोळ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऊस पेटवून तोडला जात आहे. याच कारणाने ऊसाच्या वजनात घट होत आहे. जळालेल्या ऊसाच्या बिलात साखर कारखाने कपात करत आहेत. त्यात लाईट कनेक्शन कट केल्याने उसाला पाणी मिळाले नव्हते. त्यामुळे ऊसाच्या वजनावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. ऊसाच्या बिलात साखर कारखान्यांनी कपात करू नये,असे बालाजी चौधरी यांनी सांगितले.



 


साखर आयुक्तांनी शिल्लक ऊसाची दखल घ्यावी

ऊसाच्या पिकाला 18 महिन्याचा कालावधी उलटूनही कारखान्यांनी ऊस नेहाला नाही. त्यामुळे साखर आयुक्तांनी याची दखल घेऊन ऊस लवकर कारखान्याला घेऊन जाण्याची व्यवस्था करावी. ऊसाच्या वजनात सातत्याने घट होत चालली आहे. तो वाळून जाण्याच्या स्थितीत चालला आहे. त्यामुळे नुकसान होणार आहे. यापूर्वी कारखान्याला एकरी 70 ते 80 टन ऊस जात होता,पण यावर्षी ती शक्यता मावळली आहे. पण शेतात उभा असलेला ऊस कधी कारखान्याला जाईल हा प्रश्न मोठा गंभीर होत चाललेला आहे. ऊसतोड टोळ्या जर गावाकडे गेल्या तर ऊस रानात असाच उभा राहील. त्यामुळे साखर आयुक्तांनी याची दखल घेऊन सर्व शिल्लक ऊस कारखान्याला घेऊन जावा. असे आवाहन शेतकरी बालाजी चौधरी यांनी प्रशासनाला केले आहे.

शिल्लक ऊस साखर कारखान्यांना गेल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत

कोणत्या तालुक्यात किती ऊस शिल्लक आहे,याची सविस्तर माहिती प्रशासनाकडे नाही. पण जिल्ह्यातील शिल्लक ऊस कारखान्याला गेल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत ,असे आश्वासन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली.


Full View

Tags:    

Similar News