कांद्याबरोबरच भाजीवाल्याकडे वळा
गतवर्षीच्या कांदा तेजी हंगामा मुळे यंदा कांद्याची लागवड वाढली असून भाजी पाला पिकांवर दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त कांदा उत्पादन न करता भाजीपाल्याकडे वळण्याचा सल्ला कृषी अभ्यासक दीपक चव्हाण यांनी दिला आहे.;
कांदा उत्पादक विभागात, खासकरून नाशिक, पुणे जिल्ह्यात कांद्याखाली जास्तीत जास्त क्षेत्र वळते होत असून, अन्य भाजीपाला वर्गीय पिकांचे क्षेत्र तुलनेने कमी राहत असल्याचे निरीक्षणे आहेत. याचा प्रभाव मार्चनंतर दिसेल. त्यावेळी भाजीपाल्याचा (मिरची, टोमॅटो, कोबी-फ्लावर आदी) पुरवठा तुलनेने कमी असेल.
कांद्याची रोपे फार चांगली (निरोगी) आली आहेत. पुरवठा वाढलाय. या आधी रोपे जगत नव्हती म्हणून अतिरिक्त ऊळे टाकले होते. ते सर्व आता लागणीला आलेय. रोपांचा वाढता पुरवठा हा क्षेत्रवाढीला मदतकारक ठरतोय. परिणामी, आजघडीला भाजीपाला पिकांकडे दुर्लक्ष होतेय.
मुद्दा असा की, सर्वच क्षेत्र कांद्यात गुंतवण्याऐवजी काही प्रमाणात भाजीपाल्याकडे वळते करणे गरजेचे आहे. आजपासून फेब्रुवारी अखेरपर्यंत टप्प्या टप्प्याने कांदा लागणी होत जाणार आहेत. मंहाराष्ट्रात 15 नोव्हेबरपर्यंत रांगडा कांद्याच्या लागणी दोन लाख हेक्टरवर पोचल्या असून, सरासरीच्या तुलनेत क्षेत्र दुपटीवर पोचलेय.
सध्याच्या प्रतिकुल नैसर्गिक स्थितीमुळे कांद्याचे प्रति एकरी उत्पादन कमी मिळेल हे खरे आहे. तथापि, याच वेळी वाढते क्षेत्रही लक्षात घेणे क्रमप्राप्त आहे. शेजारी, गुजरातमध्ये रब्बी कांद्याचे क्षेत्र 33 हजार हेक्टरवरून 53 हजार हेक्टरपर्यंत वाढलेय. देशभरात लागणींमध्ये वाढीचे चित्र आहे.
नैसर्गिक स्थिती अनुकूल राहिली तर फेब्रुवारीच्या मध्यानंतर आवका दाटत जातील. दरवर्षी मार्च मध्ये एकाच वेळी रांगडा आणि आगाप उन्हाळ कांद्याची आवकही दाटेल. आधीच प्रतिएकरी खर्च जास्त झाला आहे. प्रतिएकरी घटती उत्पादकतेची कसर ही वाढत्या क्षेत्रामधून भरून निघू शकते. वरील बाबींचा विचार करावा. यातले मुद्दे सर्व संबंधितांशी बोलून कन्फर्म केले आहेत.