सातारा जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर तर अनेक ठिकाणी भूस्खलन होते आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हा दुर्गम मानला जातो. याच तालुक्यात अतिवृष्टीमुळे डोंगर खचल्याने अनेकांची शेती उध्वस्त झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात गावी परतलेल्या एका तरुणाने आपल्या वडिलेपार्जित शेतीत काम करायला सुरूवात केली. याच जागेवर त्यांनी आंब्याची झाडे लावली होती. दोन वर्ष त्यांनी या झाडांची निगा राखून मेहनत घेतली. पण १५ दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेताजवळचा डोंगर खचला आणि त्यांची सर्व शेती त्या डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. एवढे मोठे नुकसान झाले असले तरी या शेतकऱ्याला कोणतीही मदत मिळालेली नाही आणि त्यांच्या नुकसानीचा पंचनामाही झालेला नाही, असे त्यांनी सांगितले आहे.