राज्य सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

सध्या परमबीर सिंग प्रकरणामुळे राज्य सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिल्याने जनतेचे प्रश्न कोण सोडवणार असा सवाल उपस्थित होतो आहे.

Update: 2021-03-23 11:25 GMT

गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला आहे. एकीकडे शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट आले आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार मात्र खंडणींच्या आरोपांमुळे अडचणीत आले आहे. त्यामुळे सामान्यांना भेडसावणाऱ्या या समस्यांकडे सरकारचे अजिबातच लक्ष नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गारपीटीमुळे वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील टरबूज, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अल्पभूधारक शेतकरी गजानन चोपडे यांनी दोन एकरात टरबूजची आणि खरबूजाची लागवड केली होती. पण गेल्या दोन दिवसांपासून अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे त्यांची दोन एकरातील टरबूज, खरबुजाचे फळपीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. यामुळे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर नुकसानची पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी चोपडे यांनी केली आहे. खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक हातच गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकटात अडकले होते. पण तरीही चार महिन्यांपूर्वी सोनं विकून त्यांनी टरबूज, खरबूजाची लागवड केली होती. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झाले असून आमच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असल्याचे चोपडे यांनी सांगितले आहे.

वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने गहू, हरबरा, पपई, केळी कांदाबीज उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 6 हजार 697 शेतकऱ्यांचे 4 हजार 880 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे. दरम्यान हा प्राथमिक अहवाल असून, येत्या काही दिवसांत प्रत्यक्षात नुकसान किती झालं हे समजणार आहे, असे सांगण्यात येत आहे.

गेल्या वेळची नुकसान भरपाई नाहीच

वाशिम जिल्ह्यात सुरुवातीला बोगस बियाणे, त्यानंतर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करून अहवाल तयार करून सरकारला पाठवले आले होते. मात्र अजूनही मदत मिळालेली नाही, त्यातच आता अवकाळी पावसासह गारपिटीमुळे झालेली नुकसान भरपाई केव्हा मिळेल असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

Full View
Tags:    

Similar News