यवतमाळच्या प्रथेमुळे गाय पुन्हा चर्चेत !
तुम्ही घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना बसायला चटई टाकलेली पाहिली असेल. पण यवतमाळ जिल्ह्यात चक्क गायींना बसायला चटया टाकल्या आहेत. याचं नेमकं कारण काय आहे? जाणून घेण्यासाठी हा बातमी वाचावीच लागेल...
भारत देशात गाय कुठे श्रध्देचा तर कुठे वादाचा विषय आहे. पण सध्या गाय वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. ते कारण आहे लंपी या संसर्गजन्य रोगाचं. लंपी रोगाची सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. मात्र तरीही यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद इजारा येथील पशूपालक गायींना बसण्यासाठी चटई टाकत आहेत. ही प्रथा वर्षानुवर्षाची असल्याचे शेतकरी सांगतात.
दिवाळी सण देशात उत्साहात साजरा करतात. पण यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद इजारा, काळी दौरलखान, दिग्रस तालुक्यातील वरंधळी या गावात गायी चटईवर बसवण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. त्यासाठी आधीच सराव केला जातो, अशी माहिती तुकाराम या पशूपालकाने दिली.
वागद इजारा गावात दिवाळीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरासमोर हलगीच्या कडकडाटात सात गायी बसवण्याची स्पर्धा असते. ही स्पर्धा या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आकर्षण असते. मात्र यंदा लंपी आजार आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मात्र आम्ही नियम पाळून प्रथा जपत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
या स्पर्धेच्या आणि परंपरेच्या माध्यमातून आम्ही दिवाळीचा पुरेपूर आनंद लुटत असल्याचे या भागातील शेतकरी सांगतात.